नांदेड : भाजपचे खासदार आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा विधानसभा मतदारसंघ राहिलेल्या भोकरमध्ये ४२ किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी ५५० कोटींचा निधी जाहीर करण्यात आला आहे. त्यावर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत, पण बांधकाम खात्याने त्याबद्दल मौन बाळगले आहे.

‘भोकर तालुक्यात ९०० कोटी रुपयांच्या विकासकामांचा धडाका’ या लक्षवेधी मथळ्याखाली शनिवारी एका कार्यक्रमाचा भाजपने मोठा गाजावाजा केला होता. एका तालुक्यातील ४२ कि.मी. लांबीच्या रस्तासुधारणेसाठी ५५० कोटी रुपये मंजूर करणाऱ्या यंत्रणेबद्दल अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. भोकर विधानसभा मतदारसंघाचे दीर्घकाळ प्रतिनिधित्व केलेले अशोक चव्हाण आपल्या कन्येला उभे करण्याची तयारी करत आहेत. याअंतर्गत शनिवारच्या कार्यक्रमास पालकमंत्री गिरीश महाजन यांनी हजेरी लावली.

हेही वाचा >>>कोणतीच बहीण लाडकी नसल्याचा अधिक अनुभव! सुप्रिया सुळे यांच्याकडून अजित पवार लक्ष्य

‘भोकर बाजार समिती’चे संचालक सुभाष किन्हाळकर आणि बारड येथील ‘निर्भय बनो चळवळी’चे संदीपकुमार देशमुख यांनी ५५० कोटींबाबत शुक्रवारी काही प्रश्न उपस्थित करून बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. पण अधिकाऱ्यांनी टोलवाटोलवी केल्यानंतर वरील दोघांनीही हा विषय समाजमाध्यमांतून समोर आणला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भोकर फाटा ते राहटी या ५५ कि.मी. लांबीच्या रस्त्याचे नूतनीकरण व विस्तारीकरण कामासाठी २०० कोटी रुपयांचे टेंडर निघालेले असताना ४२ किलोमीटर लांबीच्या अंतर्गत रस्त्याच्या सुधारणेसाठी ५५० कोटी रुपये कसे काय मंजूर झाले, याची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी सुभाष किन्हाळकर यांनी केली आहे. वरील कामांचा संपूर्ण तपशील समोर आल्यानंतर देशमुख यांनी भोकरच्या कार्यकारी अभियंत्याशी संपर्क साधून काही माहिती त्यांना विचारली; परंतु त्यांनी हा प्रश्न उपअभियंता भायेकर यांच्याकडे टोलवला. भायेकर यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.