अविनाश कवठेकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात काँग्रेसनेही ताकद वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून काँग्रेस प्रांताध्यक्ष नाना पटोले येत्या गुरुवारी बारामतीचा दौरा करणार आहेत. बारामतीत काँग्रेसच्या ओबीसी विभागाच्या वतीने कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाबरोबरच काँग्रेसनेही ‘मिशन बारामती’ सुरू केल्याची चर्चा आहे.

हेही वाचा… आमदारकीच्या दोन जागा कायम राखण्याचे भाजपपुढे आव्हान

राज्यात नव्याने स्थापन झालेल्या महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेसोबतच काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचा मित्र पक्ष आहे. बारामतीत अनेक वर्षांपासून अजित पवार यांचे निर्विवाद आणि एकहाती वर्चस्व आहे. मात्र मित्र पक्ष असूनही काँग्रेसनेही राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ल्यातच आघाडी उघडली असल्याचे चित्र दिसून येत आहे. नाना पटोले यांच्या बारामती दौऱ्यामुळे काँग्रेसनेही बारामतीमध्ये ताकद वाढविण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न सुरू केल्याची चर्चा आहे. ओबीसी समाजाच्या मेळाव्याच्या निमित्ताने नाना पटोले कोणती राजकीय भूमिका घेतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. प्रमुख राजकीय विरोध असलेल्या भारतीय जनता पक्षाबरोबरच काँग्रेसनेही मिशन बारामती मोहीम सुरू केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसकडून काय भूमिका घेतली जाणार, याबाबतही चर्चा सुरू झाली आहे.

हेही वाचा… चंद्रपूर मतदारसंघ पुन्हा काबीज करण्यासाठी भाजपची मोहिम; मुनगंटीवार की अहिर ?

सन २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकांची तयारी भाजपने आतापासूनच सुरू केली आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात नियोजित ‘भाजप बारामती लोकसभा मतदारसंघ मिशन’ मोहीमही सुरू झाली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि राज्यमंत्री प्रल्हाद सिंग पटेल काही महिन्यांपूर्वी बारामतीच्या दौऱ्यावर आले होते. पक्षाची संघटनात्मक ताकद वाढविण्यासाठी या दौऱ्यात मेळावे आणि बैठका घेण्यात आल्या होत्या. त्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही बारामतीचा दौरा केला होता.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After bjp congress is also mission of baramati print politics news asj
First published on: 04-01-2023 at 13:32 IST