Asaduddin Owaisi Criticism on Pakistan : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची विधानं कायमच चर्चेचा विषय ठरतात. नुकतंच त्यांनी ‘आय लव्ह पाकिस्तान’ असं विधान केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या. पाकिस्तानला नेहमीच कडक शब्दात इशारे देणाऱ्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना अचानक त्यांच्याविषयीचा प्रेमाचा उमाळा का आला? असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण झाला. डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडातून आपल्या देशाचे गोडवे ऐकल्यानंतर पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर हे लगेचच्या त्यांच्या भेटीला गेले. यानंतर दुसऱ्याच दिवशी पाकिस्तान सरकारने चक्क शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी ट्रम्प यांच्या नावाची शिफारस करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयाची एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी खिल्ली उडवली आहे.
नेमके काय म्हणाले ओवैसी?
हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल शांती पुरस्कारासाठी शिफारस केल्याबद्दल पाकिस्तानवर जोरदार टीका केली. ही शिफारस वॉशिंग्टनने इराणमधील अणुऊर्जा प्रकल्पांवर हल्ला केल्यानंतर लगेचच करण्यात आली होती. ओवैसी म्हणाले, “भारत-पाकिस्तान यांच्यातील संघर्ष मिटविल्याचा वारंवार दावा करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांचं पाकिस्तान सरकारने कौतुक केलं. तसेच त्यांचं नाव शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठीही सुचवलं; परंतु, ट्रम्प यांनीच आता इराणमधील फोर्डो, इस्फहान आणि नतांझ येथील अणुऊर्जा स्थळांवर हवाई हल्ले सुरू केले आहेत. त्यांची ही कृती आंतरराष्ट्रीय कायदा आणि संयुक्त राष्ट्रांच्या नियमांचा भंग करणारी आहे.”
ओवैसींची पाकिस्तानवर टीका
डोनाल्ड ट्रम्प यांना खरंच शांततेचा नोबेल पुरस्कार देता येईल का? याची विचारणा आपण पाकिस्तानकडे केली पाहिजे. ट्रम्प यांनी पाकिस्तानकडेच याची शिफारस तर केली नाही ना? अशी उपाहासात्मक टीकाही ओवैसी यांनी केली. यावेळी एमआयएम प्रमुखांनी हेही निदर्शनास आणून दिले की, इस्रायलकडे ७०० ते ८०० अण्वस्त्रांचा गुप्त साठा आहे. तरीही त्यांच्यावर अण्वस्त्र न प्रसार कराराअंतर्गत (NPT) कोणतीही चौकशी केली जात नाही. ही गोष्ट अतिशय गंभीर असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
आणखी वाचा : अभिनेत्रीशी लग्न करणाऱ्या भाजपा नेत्याला पक्षाने पाठवली नोटीस; नेमकं काय आहे कारण?
पाकिस्तानची केली कानउघडणी
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यापूर्वी भारत-पाकिस्तान दरम्यान निर्माण झालेल्या तणावाला कमी करण्याचे श्रेय स्वतःकडे घेतले होते. मात्र, भारत सरकारने त्यांचा हा दावा अनेकदा भेटाळून लावला आहे. तरीही पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्रमंत्री इशाक दार यांनी नॉर्वेतील नोबेल समितीला पत्र लिहून ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार देण्याची शिफारस केली होती. यावरूनही खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी पाकिस्तानची चांगलीच कानउघडणी केली.
पाकिस्तानने केली होती ट्रम्प यांच्या नावाची शिफारस
- डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतल्यानंतर लगेचच पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांनी त्यांचं नाव २०२६ च्या नोबेल शांतता पुरस्कारासाठी सुचवलं.
- विशेष म्हणजे नोबेल शांतता पुरस्कारासाठी डोनाल्ड ट्रम्प यांचं नाव सुचवण्यामागचं कारणही त्यांनी सांगितलं.
- असीम मुनीर यांनी असा दावा केला की, ट्रम्प यांच्यामुळे भारत-पाकिस्तान यांच्यातील तणाव कमी होऊन शांतता प्रस्थापित झाली.
- त्यानंतर दुसऱ्याच दिवशी पाकिस्तान सरकारने २०२६ च्या नोबेल शांतता पुरस्कारासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे औपचारिक नामांकन केले.
- दोन अण्वस्त्रधारी राष्ट्रांमधील संभाव्य विनाशकारी संघर्ष रोखण्याचे श्रेय पाकिस्तानने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना दिले.
- मात्र, त्यानंतर अमेरिकेकडून इराणच्या फोर्डो, इस्फहान आणि नतांज इथल्या अणु केंद्रावर झालेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची चांगलीच गोची झाली.
- पाकिस्तानातील काही प्रमुख नेते आणि मान्यवरांनी सरकारने या निर्णयाचा फेरविचार करावा अशी मागणी केली.

हेही वाचा : Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल राज्यसभेत जाणार? ‘आप’च्या विजयानंतर माजी मुख्यमंत्री काय म्हणाले?
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यांवर औवैसींची टीका
दरम्यान, इराणच्या फोर्डो, इस्फहान आणि नतांज इथल्या अणु केंद्रावर केलेल्या हवाई हल्ल्यांचा एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी तीव्र निषेध केला. त्यांनी इशारा दिला की या हल्ल्यांमुळे पश्चिम आशियात अण्वस्त्र शर्यतीचा धोका वाढू शकतो. ओवैसी म्हणाले, “जर इराणने अण्वस्त्र तयार करण्याच्या पातळीपर्यंत युरेनियम संवर्धन सुरू केले, तरी त्याला लष्करी कारवाईद्वारे थांबवणे शक्य नाही आणि त्यासाठी अनेक वर्षे लागतील.” दुसरीकडे, पाकिस्ताननेही अमेरिकेच्या हल्ल्याचा निषेध करताना म्हटले की, हे हल्ले आंतरराष्ट्रीय तत्वांच्या विरोधात आहेत आणि त्यामुळे प्रचंड तणाव निर्माण होऊ शकतो.
अमेरिका युद्धात उतरल्यानंतर पाकिस्तानला चूक उमगली
दरम्यान, इस्रायल व इराणमधील युद्धात अमेरिका उतरल्यानंतर पाकिस्तानला चूक उमगल्याचं दिसून येत आहे. अमेरिकेनं रविवारी इराणवर हल्ले केल्यानंतर सोमवारी पाकिस्तानमधील अनेक आजी-माजी नेतेमंडळी व देशातील मान्यवर व्यक्तींकडून ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार मिळावा यासंदर्भातल्या देशाच्या शिफारसीचा पुनर्विचार करण्याची मागणी केली जात आहे. पाकिस्तान सरकारदेखील या मागणीचा पुनर्विचार करण्यासंदर्भात आढावा घेत असल्याचं सांगितलं जात आहे. “इस्रायलच्या सलग हल्ल्यांनंतर आता अमेरिकेने इराणच्या अणुऊर्जा केंद्रांवर केलेले हल्ले निषेधार्ह आहेत. या भागात तणाव वाढण्याची शक्यता आम्हाला गंभीरपणे जाणवते,” असं पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने त्यांच्या निवेदनात म्हटलं आहे. इस्रायल व इराण यांच्यातील युद्धात अमेरिकेने उडी घेतल्यानंतर पाकिस्तानने तिन्ही देशांना संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे.