चंद्रपूर : विधानसभेत सलग सातव्यांदा विजयी ठरलेले विदर्भातील भाजपचे एकमेव आमदार तथा राज्याचे वन व सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या आजवरच्या अनुभवाचा लाभ राज्याला व विदर्भाला व्हावा यासाठी चांगल्या खात्याच्या मंत्रिपदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवावी, अशी मागणी स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये जोर धरत आहे.

भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार चंद्रपूरमधून सलग तीन, तर बल्लारपूर मतदारसंघातून सलग चारवेळा विजयी झाले आहेत. विदर्भातून सलग सात निवडणुका जिंकणारे भाजपचे ते एकमेव आमदार आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात भाजप तळागाळात पोहचवण्यात त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. प्रदेशाध्यक्ष म्हणूनही मुनगंटीवार यांची कामगिरी अतिशय उत्तम होती. १९९५ मध्ये भाजप-शिवसेना युती सरकारच्या कार्यकाळात मुनगंटीवार अवघ्या सहा महिन्यांसाठी सांस्कृतिक खात्याचे मंत्री झाले होते. मात्र या अतिशय कमी कालावधीतदेखील मुनगंटीवार यांनी झाडीपट्टी महोत्सवाच्या माध्यमातून स्वतःची छाप सोडली होती. त्यानंतर २०१४ ते २०१९ असे सलग पाच वर्ष राज्याचे अर्थमंत्री म्हणून त्यांची कामगिरी दखलपात्र ठरली. अर्थमंत्री या नात्याने त्यांनी प्रथमच शिलकीचे अंदाजपत्रक सादर केले होते. विरोधकांनीही त्यांच्या या कामगिरीचे कौतुक केले होते.

हेही वाचा >>>अकोला जिल्ह्यात भाजपचे निर्विवाद वर्चस्व, ‘अकोला पश्चिम’मध्ये बंडखोरीचा भाजपला मोठा फटका; दोन दशकानंतर जिल्ह्यात पंजाला संधी

वनमंत्री म्हणून राज्यातील जंगलक्षेत्र वाढविण्यात त्यांची महत्त्वपूर्ण कामगिरी राहिली. ५० कोटी वृक्ष लागवड या अभिनव, कल्पक उपक्रमाची तर जागतिक पातळीवर दाखल घेतल्या गेली. त्यांना या उपक्रमाबद्दल सर्वत्र सन्मानितदेखील केले गेले. २०२२ ते २४ या महायुती सरकारच्या काळात वन, सांस्कृतिक कार्य तथा मत्स्य व्यवसाय मंत्री म्हणून कामगिरी अतुलनीय अशीच आहे. या काळात त्यांनी ताडोबा महोत्सवापासून विविध उपक्रम राबविले. वाघांचे अन्य राज्यात यशस्वी स्थलांतरण हा कल्पक उपक्रम मुनगंटीवार यांच्यामुळेच यशस्वी होऊ शकला. सांस्कृतिक कार्य मंत्री म्हणून मुनगंटीवार यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या राज्याभिषेकाचा सोहळा राज्यभर साजरा केला. काश्मीरमध्ये शिवाजी महाराज पुतळा उभारणे, लंडन येथून शिवाजी महाराजांची वाघनखे भारतात आणणे, यासोबतच मराठी चित्रपट अनुदान वाढविणे, मराठी चित्रपट व कलावंतांच्या पुरस्काराची रक्कम वाढविणे, मत्स्य व्यवसाय करणाऱ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.

हेही वाचा >>>प्रस्थापितांची शेती पडीत ठेवून मतदारांनी कमळ शेती फुलविली, भाजपच्या पदरात भरभरून मतदान

अजातशत्रू अशी मुनगंटीवार यांची ओळख आहे. या जिल्ह्यातही मुनगंटीवार यांनी जागतिक दर्जाची वन अकादमी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात, सैनिक शाळा, विसापूर येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडांगण, बॉटनीकल गार्डन, एस.एन.डी. टी. विद्यापीठ तसेच मोठ मोठी विकास कामे केली आहेत. त्यांच्याच पुढाकाराने चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यासाठी स्वतंत्र गोंडवाना विद्यापीठ निर्मिती झाली.

मुनगंटीवार यांच्या अनुभवाचा लाभ संपूर्ण राज्य तथा विदर्भाला होईल. त्यामुळे मुनगंटीवार यांच्याकडे चांगल्या खात्याची जबाबदारी सोपविण्यात यावी, अशी मागणी आता जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये जोर धरत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सुधीर मुनगंटीवार अभ्यासू नेते आहेत. त्यांच्यातील नेतृत्व व कर्तृत्वाची जाणीव पक्षाला आहे. त्यांच्या कामाची दखल वेळोवेळी घेतल्या गेली आहे. त्यामुळे पक्ष त्यांना योग्य स्थान देईलच. पक्षाकडे काही मिळावे ही विनंती करण्यापेक्षा पक्ष त्यांना संधी देतील, असा विश्वास आहे.- राहुल पावडे, भाजप महानगर अध्यक्ष.