पुणे : विधानसभा निवडणुकीच्या प्रक्रियेबाबत संशय निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांनी आत्मक्लेश आंदोलन सुरू केल्यानंतर त्यांना भेटण्यासाठी महाविकास आघाडी आणि महायुतीतील नेत्यांनी आंदोलनाच्या ठिकाणी शनिवारी रीघ लावली. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी निवडणुकीतील गैरप्रकाराबाबत लोकांमधून उठाव होण्याची गरज व्यक्त केली, तर राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी ईव्हीएम फेरफार केल्याने पराभव झाल्याचा आरोप करणाऱ्यांनी तो सिद्ध करून दाखविण्याचे आव्हान दिले.

विधानसभा निवडणूक प्रक्रियेबाबत संशय निर्माण झाल्याने डॉ. आढाव यांनी महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी गुरुवारपासून महात्मा फुले वाडा येथे आत्मक्लेश आंदोलन केले होते. तीन दिवसांचे हे आत्मक्लेश आंदोलन होते. शेवटच्या दिवशी ज्येष्ठ नेते शरद पवार, अजित पवार, उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत, राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आदी महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांनी डॉ. आढाव यांची भेट घेत भूमिका स्पष्ट केली. उद्धव ठाकरे यांच्या हस्ते जलप्राशन करून डॉ. आढाव यांनी आंदोलनाची सांगता केली.

हेही वाचा >>>PM Vishwakarma Scheme : तामिळनाडू सरकारने केंद्रातल्या भाजपा सरकारच्या या योजनेला जातीयवादी का म्हटलं? योजना लागू करण्यास का दिला नकार?

मतदान यंत्रात घोळ यात तथ्य’

निवडणुकीपूर्वी काही लोक आले होते. १५ टक्के मते सेट करून देतो, असे म्हणत होते. मात्र आम्ही त्यावर विश्वास ठेवला नाही. आम्हाला असे वाटले, निवडणूक आयोग सक्षम आहे. तो काही चुकीची भूमिका घेणार नाही. मात्र निकालानंतर त्यामध्ये तथ्य आहे हे प्राथमिक स्तरावर दिसत असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.

ईव्हीएम’मुळे पराभव झाल्याचे सिद्ध करून दाखवा

विधानसभेच्या निवडणुकीत ईव्हीएम फेरफार केल्याने पराभव झाला, असा आरोप करणाऱ्यांनी तो सिद्ध करून दाखवावा, अशा शब्दांत अजित पवार यांनी विरोधकांना सुनावले. संध्याकाळी मतदान वाढले, त्यामध्ये आमचा काय दोष, अशी विचारणाही त्यांनी केली. लोकसभेच्या निवडणुकीत माझ्या उमेदवाराचा पराभव झाला. महाविकास आघाडीच्या ३१ जागा राज्यात निवडून आल्या. त्या वेळी ‘ईव्हीएम’वर कोणीही बोलले नाही, असे अजित पवार म्हणाले.

हेही वाचा >>>Rajya Sabha Election 2024 : राज्यसभेचं तिकीट एक अन् इच्छुक अनेक, खासदारकीसाठी भाजप नेत्यांची दिल्लीवारी; कुणाची लागणार वर्णी?

वणवा पेटायला ठिणगी पुरेशी’

डॉ. बाबा आढाव यांचे आत्मक्लेश आंदोलन म्हणजे ठिणगी आहे. वणवा पेटायला ठिणगी पुरेशी असते, अशा शब्दांत शिवसेना (ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी महायुतीच्या नेत्यांना सुनावले.

फडणवीस यांची आंदोलनाकडे पाठ?

आंदोलनाच्या ठिकाणी विविध राजकीय नेत्यांनी डॉ. आढाव यांची भेट घेतली. भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस हे एका कार्यक्रमाच्या निमित्ताने पुण्यात आले होते. मात्र त्यांनी डॉ. आढाव यांची भेट न घेतल्याने याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होती.

मागे हटणार नाही’

विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया ज्या पद्धतीने राबवली, ते पटत नाही. हे सरकार कोणालाही जुमानत नाही. मतपेटीत जे झाले त्याचा छडा लागलाच पाहिजे. हे प्रकरण दाबायचा प्रयत्न झाला, तर आम्ही मागे हटणार नाही. माझ्यासारखी माणसे प्रसंगी मरण पत्करतील; पण मागे हटणार नाही, असा इशारा डॉ. बाबा आढाव यांनी दिला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लोकांमधून उठाव होण्याची गरज’

पैसा आणि सत्तेचा गैरवापर करून निवडणुकीची संपूर्ण यंत्रणाच हातात घ्यायची हे चित्र यापूर्वी कधी दिसले नव्हते. विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने महाराष्ट्रात ते बघायला मिळाले. या निवडणुकीबाबत सर्वत्र एक अस्वस्थता दिसून येत असून, निवडणुकीतील गैरप्रकाराबाबत लोकांमधून उठाव होण्याची आता गरज आहे, अशी भूमिका शरद पवार यांनी शनिवारी मांडली.