नागपूर: भाजपचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या पूर्व विदर्भातील पाच जागांवर पहिल्याच टप्प्यात मतदान होत असून येथे सर्व ठिकाणी महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत होण्याची चिन्हे आहे. १९ एपिलला पहिल्या टप्प्यातील मतदान होत असून त्यात महाराष्ट्रातील पाच जागांचा समावेश आहे. त्या सर्व पूर्व विदर्भातील असून त्यात नागपूर, रामटेक, चंद्रपूर, गडचिरोली आणि भंडारा-गोंदिया या लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. चंद्रपूरचा वगळता सर्व चारही जागी सध्या भाजपचे विद्ममान खासदार आहेत. शनिवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी वरील सर्व मतदारसंघातील लढतीचे चित्र स्पष्ट झाले. पाच जागांसाठी एकूण ९७ उमेदवार रिंगणात आहेत आणि महायुतीला आव्हान देण्यासाठी महाविकास आघाडीनेही तुल्यबळ उमेदवार रिंगणात उतरवले आहे.

सर्वात अधिक लक्ष लागलेल्या नागपूर लोकसभा मतदारसंघात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी विरुद्ध काँग्रेसचे विद्यमान आमदार विकास ठाकरे यांच्यासह एकूण २६ उमेदवार रिंगणात असले तरी थेट लढत ही गडकरी विरुद्ध ठाकरे अशीच होणार आहे. वंचितने काँग्रेसला पाठिंबा दिला आहे. २०१९ मध्ये गडकरी यांना ६ लाख ६० हजार तर काँग्रेसचे नाना पटोले यांना ४ लाख ४४ हजार मत मिळाली होती.

हेही वाचा :मित्र पक्षांच्या नेत्यांची नाराजी दूर करण्यावर श्रीरंग बारणे यांचा भर, गाठीभेटी सुरू

दुसरी थेट लढत चंद्रपूर-वणी लोकसभा मतदारसंघात आहे. भाजपचे ज्ष्ष्ठ मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या विरुद्ध याच मतदारसंघाचे विद्यमान खासदार दिवंगत बाळू धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर या काँग्रेसच्या उमेदवार आहे. मुनगंटीवार विरुद्ध धानोरकर अशीच लढत या मतदारसंघात आहे. २०१९ मध्ये काँग्रेसचे विजयी उमेदवार बाळू धानोरकर यांना ५ लाख ५९ हजार तर भाजपचे अहिर यांना ५ लाख १४ हजार मते मिळाली होती.

तिसरा मतदारसंघ हा रामटेक आहे.२०१९ पर्यंत शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या रामटेक मतदारसंघात यावेळी सेनेच्या दोन्ही गटाला उमेदवार मिळाले नाही. शिंदे गटाने काँग्रेसमधून आलेले आमदार राजू पारवे यांना रिंगणात उतरवले आहे तर ठाकरे गटाने ही जागा काँग्रेसला सोडली आहे. काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे हे येथे उमेदवार आहे. बर्वे विरुद्ध पारवे अशी थेट लढत या मतदारसंघात आहे. २०१९ मध्ये सेनेचे कृपाल तुमाने यांना ५ लाख ९७ हजार १२६ मते मिळाली होती तर काँग्रेसचे किशोर गजभिये यांना ४ लाख ७० हजार३४३ मते मिळाली होती.आता तुमाने रिंगणात नाही.

हेही वाचा : रत्नागिरी – सिंधुदुर्गात उमेदवारीसाठी किरण सामंत अजूनही आशावादी

भंडारा-गोंदियामध्ये भाजपचे विद्यमान खासदार सुनील मेंढे यांच्या विरुद्ध काँग्रेसचे डॉ.प्रशांत पडोळे रिंगणात आहेत. मेंढे दुसऱ्यांदा तर पडोळ प्रथमच लोकसभेच्या मैदानात उतरले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा हा मतदारसंघ असून त्यांनी पडोळेंच्या मागे सर्व शक्ती पणाला लावली आहे. २०१९ च्या निवडणुकीत मेंढे यांना ६ लाख ५० हजार तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना पंचबुद्धे यांना ४ लाख ५२ हजार मते मिळाली होती.

गडचिरोलीमध्ये भाजपचे विद्यमान खासदार अशोक नेते यांच्या विरुद्ध काँग्रेसचे नामदेव किरसान अशी लढत आहे. किरसान हे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांचे कट्टर समर्थक मानले जातात. ते चिमूर या भागातील आहे. २०१९ मध्ये नेते यांनी पाच लाख १९ हजार मते घेतली होती तर काँग्रेसला ४ लाख ४२ हजार मते मिळाली होती.

हेही वाचा : अरविंद केजरीवाल यांच्या जन्मगावातील लोक म्हणतायत…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पहिल्या टप्प्यातील निवडणूक रिंगणातील उमेदवार

१) नागपूर २६
२) रामटेक -२८.
३) भंडारा गोंदिया – १८
४) गडचिरोली-चिमूर – १०
५) चंद्रपूर -१५