छत्रपती संभाजीनगर : शनिवारी मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘ महायुती’ चे बळ की स्वबळ यांची चाचपणी स्वतंत्रपणे केली. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील मेळाव्यात काही आमदारांनी विधानसभेत विरोधात काम करणाऱ्यांना भाजपकडून पदे मिळणार नाहीत, याची काळजी घेण्याचा सल्ला दिला. तसेच महायुतीत काहीजण जाणीवपूर्वक मीठचा खडा टाकण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगितले.

दरम्यान महायुतीत ‘ आपल्या’ कोणामुळे काही घडू नये अशी काळजी घेण्याचा सल्ला एकनाथ शिंदे यांनी दिला. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोठे ‘ महायुती ’ आणि कोठे ‘ स्वबळ’ याची चाचपणी केल्याचे सांगण्यात आले. जिथे ‘ महायुती’ करायची आहे, ती बाब आधी कानी टाका आणि मगच स्थानिक पातळीवर निर्णय घ्या, अशा सूचना त्यांनी दिल्याचे सांगण्यात आले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गांभीर्याने लढविण्यासाठी भाजपने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरला.

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पंकजा मुंडे, अशोक चव्हाण, डॉ. भागवत कराड यांच्यासह प्रमूख पदाधिकाऱ्यां मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हानिहाय बैठका घेतल्या. प्रत्येक नगरपालिका, नगरपंचायती, जिल्हा परिषदमध्ये पूर्वी कोणत्या पक्षाचे प्राबल्य होते. नव्या युतीमुळे काय होऊ शकते आणि कोठे स्वबळ वापरता येईल, याचा निर्णय जिल्हा पातळीवर घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्रभागनिहाय भाजपचा कार्यकर्ता कोण, मित्र पक्षाचा किती प्रबळ याचीही चाचपणी सुरू झाली आहे. ‘ महायुती’ मध्ये एखाद्या घटनेने मिठाचा खडा पडेल, अशी टीका मात्र करू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे भाजपकडून आता विस्ताराच्या सर्व शक्यता पडताळून पाहिल्या जात आहेत.

छत्रपती संभाजीनगरसारख्या शहरात जिथे शिवसेनेची ताकद आहे. मात्र, भाजपचेही बळ वाढते आहे, अशा ठिकाणी युती करण्याऐवजी ताकद आजमावून पाहता येईल का, असा पर्यायही खुला असल्याचे सांगण्यात येत आहे. स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांबराेबरच पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकावरही चर्चा झाली असली तरी उमेदवार कोण, हा पेच मराठवाड्यातील पेच कायम असल्याचे सांगण्यात येत आहे. सर्व निवडणुका ताकदीचे लढविण्यासाठी तयारी करा, पण मित्र पक्षाला दुखावू नका, असे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी सांगितले आहे. हीच भूमिका एकनाथ शिंदे यांनीही घेतली आहे. वेगवेगळया बैठका घेऊन एकत्र निवडणुका लढण्याची तयारी सुरू केल्याची चर्चा सर्वत्र आहे.