BJP Minister Govind Gaude was removed from Goa cabinet : मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीतील आदिवासी कल्याण विभागात मोठा भ्रष्टाचार झाला असा सनसनाटी आरोप करून राजकीय वर्तुळात खळबळ उडवून देणाऱ्या मंत्र्याची अखेर मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात आली आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या शिफारशीनंतर राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी गोविंद गावडे यांना मंत्रिमंडळातून काढून टाकलं आहे. गोवा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष दामोदर नाईक यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना बुधवारी (तारीख १८ जून) यासंदर्भातील माहिती दिली आहे. दरम्यान, मंत्रिमंडळातून हकालपट्टी होताच गावडे यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत. दरम्यान, कोण आहेत गोविंद गावडे? त्यांनी भ्रष्टाचाराचे नेमके काय आरोप केले होते? याबाबत जाणून घेऊ…
भाजपामधील अंतर्गत वाट चव्हाट्यावर?
देशातील सर्वात मोठा राजकीय पक्ष म्हणून उदयास आलेल्या भाजपामधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले आहेत. त्यामागचं कारण म्हणजे, भाजपाचे काही नेते त्यांच्याच पक्षातील सरकारवर टीका करताना दिसून येत आहेत. काही महिन्यांपूर्वी भाजपा नेते व गोव्याचे माजी मंत्री पांडुरंग मडकईकर यांनी आपल्याच पक्षातील मंत्र्यांवर लाच मागितल्याचा आरोप केला होता. भाजपा सरकारच्या काळात राज्यात लूट सुरू असून एका मंत्र्याने क्षुल्लक कामासाठी आपल्याकडून २० लाख रुपये उकळले, असं मडईकर म्हणाले होते. हे प्रकरण ताजं असतानाच मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या अखत्यारीतील आदिवासी कल्याण विभागात मोठा भ्रष्टाचार झाला, असा आरोप मंत्री गोविंद गावडे यांनी केला.
मंत्र्यांचे भाजपा सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप
भाजपाच्या दोन नेत्यांनी त्यांच्या पक्षातील सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर गोव्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. विरोधकांनी याच मुद्द्याला हाताशी धरून सरकारला लक्ष्य केल्यानंतर या दोन्ही नेत्यांनी सारवासारव केली. सरकारमधील मंत्र्याने बेजबाबदार वक्तव्य केल्याप्रकरणी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी संताप व्यक्त करीत थेट कारवाईचा इशारा दिला होता. मुख्यमंत्र्यांनी वारंवार सूचना करूनही मंत्रिपदाचा राजीनामा न दिल्याने अखेर गोविंद गावडे यांची मंत्रिमंडळातून अपमानास्पद पद्धतीने हकालपट्टी करण्यात आली आहे. तर सरकारमधील मंत्र्यावर कथित लाचखोरीचा आरोप करणारे भाजपाचे माजी आमदार पांडुरंग मडकईकर यांच्यावर तातडीने ‘एफआयआर’ दाखल करा, असे आदेश न्यायालयाने गोवा पोलिसांना दिले आहेत.
गोविंद गावडे यांनी भ्रष्टाचाराचे काय आरोप केले होते?
- २६ मे रोजी एका कार्यक्रमात बोलताना गोविंद गावडे यांनी आदिवासी कल्याण विभागाची कार्यक्षमता खुंटलेली असल्याची टीका केली होती.
- इतकंच नाही तर, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या अखत्यारीतील आदिवासी कल्याण विभागात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोपही त्यांनी केला होता.
- गेल्या अनेक वर्षांपासून आदिवासी समाजाकडून आदिवासी भवनाच्या बांधकामाची मागणी केली जात आहे, मात्र सरकारने ती पूर्ण न केली नाही, असंही गावडे म्हणाले होते.
- माझ्याकडे आदिवासी कल्याण खात्याचे मंत्रिपद असताना या प्रकल्पाची पायाभरणी झाली होती, मात्र त्यानंतर हा प्रकल्प अर्धवटच राहिला, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली होती.
- गोविंद गावडे यांच्या याच वक्तव्याला हाताशी धरून विरोधकांनी भाजपा सरकारवर जोरदार टीका केली आणि प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली.
- मुख्यमंत्र्यांनी कारवाईचा इशारा दिल्यानंतर गोविंद गावडे यांनी या प्रकरणात सारवासारव केली होती. माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला, असं म्हणत त्यांनी या प्रकरणाचं खापर माध्यमांवरच फोडलं होतं.
- मुख्यमंत्र्यांबद्दल मी कोणतेही नकारात्मक वक्तव्य केलेले नाही. ते माझे चांगले मित्र आहेत. त्यांनी माझ्याबद्दल काय म्हटलं यावर मी काहीही भाष्य करणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

गोविंद गावडे यांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार
मंत्रिमंडळातून हकालपट्टी झाल्यानंतर भाजपा आमदार गोविंद गावडे यांनी माध्यमांशी संवाद साधला. “कोणतीही पूर्वकल्पना न देता माझ्यावर कारवाई करण्यात आली. माझ्या विधानाचा चुकीचा अर्थ लावण्यात आला होता. याबाबत मी मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चाही केली होती. तरीही माझी मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात आली. माहिती खात्याच्या संकेतस्थळावर यासंदर्भात मी बातमी वाचली”, असं गोविंद गावडे यांनी म्हटलं आहे. “गोव्याच्या क्रांतिदिनी शोषितांची बाजू घेतल्याची पोचपावती मिळण्यापेक्षा मोठे भाग्य कोणतेच असू शकत नाही. ज्या गोष्टीसाठी या सरकारने ही भूमिका घेतली, त्या विरोधात संघर्षासाठी आवाज उठवण्यास मोकळीक दिल्यामुळे माझ्या सरकारचे आणि पक्षाचे आभार मानतो. सत्ता आणि सत्य यापैकी एक निवडायचे असेल, तर मी सत्याची बाजू घेईन, असंही गावडे यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा : न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्यावर राजकीय हेतूने कारवाई? कपिल सिब्बल नेमकं काय म्हणाले?
कोण आहेत आमदार गोविंद गावडे?
राजकारणात येण्याआधी गोविंद गावडे हे नाट्य कलाकार होते. २०२३ मध्ये त्यांनी छत्रपती संभाजीराजे यांच्या जीवनावर आधारित नाटकात संभाजी महाराजांची भूमिका साकारली होती. प्रियोल मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे गावडे हे गेल्या काही वर्षांमध्ये अनेकदा वादांमध्ये सापडले आहेत. फेब्रुवारी २०२४ मध्ये, त्यांच्यावर दक्षिण गोव्यातील काणकोण मतदारसंघात सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी मिळालेल्या सुमारे २६ लाख रुपयांच्या शासकीय निधीच्या अपहाराचा आरोप झाला होता.
२०२२ मध्ये, सावंत सरकारने पणजीतील कला अकादमीच्या नूतनीकरणाचे काम सुरू केले होते. यावरून गावडे यांनी वाद निर्माण केला होता. अपक्ष आमदार असूनही भाजपाच्या मागील सरकारमध्ये गोविंद गावडे यांना मंत्रिपद मिळालं होतं. त्यांनी आदिवासी कल्याण आणि कला व सांस्कृतिक विभागाचा कार्यभार सांभाळला होता. २०२२ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी, गावडे भाजपामध्ये दाखल झाले आणि प्रियोल मतदारसंघातून भाजपाच्या तिकिटावर निवडून आले. यावेळी त्यांच्याकडे कला व संस्कृती खात्याची जबाबदारी देण्यात आली होती.