MLA T Raja Singh Resignation For BJP : देशातील सर्वात मोठा राजकीय पक्ष म्हणून उदयास आलेल्या भाजपामध्ये सध्या संघटनात्मक निवडणुकांचे वारे वाहत आहेत. पक्षाने आतापर्यंत अनेक राज्यांमधील प्रदेशाध्यक्ष बदलले आहेत. सोमवारी भाजपाच्या पक्षश्रेष्ठींनी महाराष्ट्रासह तेलंगणा, आंध्र प्रदेश, उत्तराखंड व हिमाचल प्रदेशमधील नवीन प्रदेशाध्यक्षांच्या नियुक्त्या केल्या. यातील तेलंगणामधील प्रदेशाध्यक्षांच्या निवडीवर भाजपाचे आमदार टी राजा सिंह यांनी आक्षेप घेतला. इतकंच नाही तर त्यांनी नाराज होऊन भाजपाच्या प्राथामिक सदस्यत्वाचा राजीनामाही दिला. सध्या भाजपाकडून टी राजा यांच्या राजीनामा स्वीकारण्यात आलेला नाही. सध्या पक्षातील वरिष्ठ नेते त्यांची मनधरणी करीत असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
तेलंगणाच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी आमदार टी राजा सिंह इच्छुक होते. यासाठी त्यांनी भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांची भेटही घेतली होती. मात्र, पक्षाने त्यांच्याकडे कानाडोळा केल्यानंतर टी राजा यांनी थेट भाजपाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. सोमवारी भाजपामधून राजीनामा दिल्यानंतर त्यांनी आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवरून दोन पत्रे शेअर केली. “लोकांचा शांत असण्याचा अर्थ संमती म्हणून घेऊ नये. मी फक्त माझ्यासाठी नाही तर असंख्य कार्यकर्त्यांसाठी आणि मतदारांसाठी बोलत आहे, जे माझ्याबरोबर विश्वासाने उभे राहिले आणि आज निराश झाले आहेत,” असं टी राजा यांनी सिंह पोस्टमध्ये म्हटलं.
कोण आहेत आमदार टी. राजा सिंह?
आमदार टी. राजा हे तेलंगणातील भाजपाचे फायरब्रँड नेते म्हणून ओळखले जातात. हिंदुत्वाचा मुद्दा जोरकसपणे लावून धरत त्यांनी अनेकदा प्रक्षोभक विधाने केलेली आहेत. तेलंगणाच्या गोशामहल विधानसभा मतदारसंघातून ते दोनवेळा आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. राजकारणात येण्याआधी टी राजा हे बजरंग दलाचे कार्यकर्ते होते. त्यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात तेलुगु देसम पक्षातून केली होती. २००९ मध्ये टी राजा तेलगु देसमच्या तिकिटावर नगरसेवक म्हणून निवडून आले.
आणखी वाचा : मुख्यमंत्रिपदाची सूत्रे उपमुख्यमंत्र्यांच्या हाती येणार? कर्नाटकमध्ये नेमकं काय घडतंय?
त्यानंतर हैदराबाद येथील गोरक्षण अभियानाचे त्यांनी नेतृत्व केले. २०१४ मध्ये तेलगु देसमला सोडचिठ्ठी देऊन टी राजा यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. २०१८ च्या विधानसभा निवडणुकीत तेलंगणामध्ये चंद्राबाबू नायडू यांच्या पार्टीची हवा होती. त्यावेळी भाजपाने गोशामहल विधानसभा मतदारसंघातून टी राजा यांना उमेदवारी दिली. या निवडणुकीत भाजपाच्या अनेक दिग्गज नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला; पण त्यावेळी निवडून आलेल्या पाच आमदारांमध्ये टी राजा सिंह यांचा समावेश होता.
आमदार टी राजा यांची वादग्रस्त कारकीर्द
- आमदार टी राजा यांच्यावर प्रक्षोभक वक्तव्ये केल्याप्रकरणी ७० हून अधिक तक्रारी दाखल आहेत.
- २०२२ मध्ये मोहम्मद पैंगबर यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी टी राजा यांना अटक करण्यात आली होती.
- यावरून मोठा राजकीय वाद निर्माण झाल्यानंतर भाजपाने टी राजा यांना नोटीस पाठवून त्यांचं तडकाफडकी निलंबन केलं होतं.
- मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर तुमच्यावर निलंबनाची कारवाई का करू नये असं भाजपाने नोटिसीत म्हटलं होतं.
- या नोटिसीला उत्तर देण्यासाठी पक्षाने आमदार टी राजा यांना दहा दिवसांचा अवधी दिला होता.
- अयोध्येतील राम मंदिराच्या निर्माणाला विरोध करणाऱ्यांच्या विरोधातही टी राजा यांनी अनेकदा वादग्रस्त वक्तव्ये केली.
- गौमास खाणाऱ्या व्यक्तींनी राम मंदिरासाठी देणगी देऊ नये आणि सरकारनेही ती स्वीकारू नये असं टी राजा यांनी म्हटलं होतं.
- तसंच जे लोक वंदे मातरम म्हणत नाहीत, त्यांना या देशात राहण्याचा अधिकार देखील नाही, असं विधानही त्यांनी केलं होतं.
- जुने हैदराबाद हे मिनी पाकिस्तान असून मुख्यमंत्र्यांनी जर त्याठिकाणी छापे मारले तर त्यांना खूप सारे बॉम्ब आणि हत्यारे सापडतील, असंही ते म्हणाले होते.
- पोलिसांनी गरबामध्ये लव्ह जिहादींचा प्रवेश रोखावा, अन्यथा आम्ही आमच्या पद्धतीने त्यांना रोखू असा इशाराही टी राजा यांनी दिला होता.
- विशेष बाब म्हणजे, यापूर्वी २०१८ मध्येही टी राजा यांनी भाजपाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता; पण पक्षाने तो स्वीकाराला नव्हता.
हेही वाचा : मुंबईतील मराठी भाषिकांची संख्या कमी का होतेय? हिंदीचा टक्का कशामुळे वाढतोय?
महाराष्ट्रातील टी राजा यांच्या सभा आणि वाद
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीआधी आमदार टी राजा हे मार्च २०२३ मध्ये महाराष्ट्र दौऱ्यावर आले होते. यावेळी राज्यात त्यांनी अनेक सभा घेतल्या होत्या. या सभांमधून त्यांनी अनेकदा मुस्लीमविरोधी प्रक्षोभक भाषणे केल्याचं दिसून आलं. लातूर, सोलापूर, श्रीरामपूर, अहमदनगर, संभाजीनगर, मलंगगड, मुंबई आदी ठिकाणी घेतलेल्या सभेत आमदार टी राजा सिंह यांनी प्रक्षोभक भाषणे केली. यादरम्यान, पोलिसांनी त्यांच्या अनेक ठिकाणच्या सभांना परवानगी नाकारली होती. तरीसुद्धा टी. राजा यांच्या सभा आणि भाषणं थांबली नाहीत.मार्च २०२३ मध्ये अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे झालेल्या सभेत टी राजा यांनी वादग्रस्त विधाने केली. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता.

आमदार टी राजा यांच्यावर कोणकोणते गुन्हे?
टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, टी राजा सिंह यांच्यावर पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यांमध्ये कलम ५०४ (शांतता बिघडवण्याच्या हेतूने जाणीवपूर्वक प्रक्षोभक विधाने करणे), कलम ५०६ (धमकावणे), कलम २९५-अ (एखाद्या धर्माविरुद्ध वक्तव्ये करून भावना दुखावणारी कृती), कलम १४३-अ (दोन धर्म, वंश किंवा प्रांतांमध्ये तेढ निर्माण करणारी विधाने करणे) अशा प्रकारच्या गुन्ह्यांचा समावेश होता. छत्रपती संभाजीनगर शहरात लावलेल्या ‘आय लव्ह औरंगाबाद’ हा फलकही टी राजा यांच्याच कार्यकर्त्यांनी उखडून फेकल्याचा आरोप होता. याप्रकरणी संभाजीनगरच्या क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते.
टी राजा यांनी राजीनामा पत्रात काय म्हटलंय?
भाजपाच्या प्राथामिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर आमदार टी राजा सिंह यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून दोन पत्रे शेअर केली. “मी पक्षापासून वेगळा होत असलो तरी, मी हिंदुत्वाच्या विचारसरणीशी आणि आमच्या धर्माची आणि गोशामहलच्या लोकांची सेवा करण्यासाठी पूर्णपणे वचनबद्ध आहे. त्यांच्यासाठी मी माझा आवाज उठवत राहीन आणि हिंदू समुदायासोबत आणखी मजबूतपणे उभा राहीन,” असं टी राजा सिंह यांनी म्हटलं. दुसऱ्या पत्रात – “मी भाजपातील वरिष्ठ नेत्यांना, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, अमित शाह आणि बीएल संतोष जी यांनाही नम्रपणे आवाहन करतो की, तेलंगणाचे प्रदेशाध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेचा पुनर्विचार करावा. तेलंगणा भाजपासाठी तयार आहे; पण आपण त्या संधीचा सन्मान करण्यासाठी योग्य नेतृत्व निवडले पाहिजे,” असेही टी राजा सिंह म्हणाले.