बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख मायावती यांचा ३४ वर्षांचा पुतण्या आणि राजकीय वारस आकाश आनंद आता पक्षाची धुरा आपल्या खांद्यावर घेणार असल्याची माहिती आहे. ६ एप्रिल रोजी उत्तर प्रदेशमधील नगीना मतदारसंघातून त्याच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या प्रचाराची सुरुवात होणार आहे. भीम आर्मीचे प्रमुख व आझाद समाज पार्टी (कांशीराम)चे प्रमुख नेते चंद्रशेखरआझाद हेदेखील याच मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे सध्या हा मतदारसंघ जोरदार चर्चेत आहे.

बहुजन समाज पक्षाचे राष्ट्रीय समन्वयक आकाश हे नगीनामधील कॉलेज ग्राऊंडमध्ये आपली पहिली सभा घेणार आहेत. १९ एप्रिल रोजी होणाऱ्या पहिल्या टप्प्यातील मतदानामध्ये उत्तर प्रदेशमधील आठ मतदारसंघांचा समावेश आहे. त्यापैकी नगीना हा एकमेव मतदारसंघ आहे; जो अनुसूचित जातींसाठी राखीव आहे. मायावतीदेखील १३ एप्रिलपासून हरिद्वार या तीर्थक्षेत्रामधून आपल्या राष्ट्रीय प्रचारास सुरुवात करणार आहेत. नगीना या मतदारसंघात मुस्लिम आणि दलित बहुसंख्येने आहेत. या मतदारसंघात मुस्लिम ४० टक्के; तर दलित २० टक्के आहेत. तसेच या मतदारसंघात ठाकूर, जाट, चौहान राजपूत, त्यागी व बनिया या जातींचेही प्राबल्य आहे.

हेही वाचा… हातकणंगलेत पन्हा‌ळ्याचे माजी आमदार सत्यजीत पाटील यांच्या हाती मशाल

२०१९ च्या निवडणुकीमध्ये या मतदारसंघातून बहुजन समाज पक्षाच्या गिरीश चंद्रा यांनी भाजपच्या यशवंत सिंह यांचा १.६६ लाख मतांनी पराभव केला होता. त्यावेळी बसपाने समाजवादी पक्षासोबत युती करीत ही निवडणूक लढवली होती. मात्र, या मतदारसंघातील निवडणूक आता अधिकच चुरशीची होणार आहे. कारण- चंद्रशेखर आझाद यांनीही येथूनच लोकसभेत जाण्यासाठीची आपली तयारी सुरू केली आहे. तसेच बसपाने गिरीश चंद्रा यांच्या जागी सुरेंद्र पाल यांना नव्याने उमेदवारी दिली आहे.

चंद्रशेखर आझाद (वय ३६) हेदेखील या मतदारसंघात लोकप्रिय आहेत. विशेषत: त्यांची लोकप्रियता दलित आणि मुस्लिम तरुणांमध्ये अधिक आहे. अनेक वर्षांपासून ते याच मतदारसंघात काम करून आपले प्राबल्य वाढविण्याचा प्रयत्न सातत्याने करीत आहेत. या मतदारसंघातील आपली बाजू अधिक ताकदीची करण्यासाठी आझाद यांना इंडिया आघाडीकडून त्यांना पाठिंबा मिळेल, अशी आशा त्यांना होती. मात्र, इंडिया आघाडीतील समाजवादी पार्टीने आझाद यांना ही जागा देण्यास नकार दिला. सपाने या ठिकाणी आपला उमेदवार देऊ केल्याने आझाद यांच्या अपेक्षा फोल ठरल्या आहेत. या जागेवरून बसपाकडून लढणाऱ्या सुरेंद्र पाल यांनी म्हटलेय, “तरुणांमध्ये चंद्रशेखर यांच्यापेक्षा आकाश हे अधिक लोकप्रिय आहेत. नगीनामध्ये आकाश यांनी प्रचार केल्यास त्यामुळे अधिकाधिक तरुण बसपासोबत जोडले जातील.”

दुसरीकडे आणखी एका बसपा नेत्याने असे म्हटलेय, “उत्तर प्रदेशमध्ये चंद्रशेखर हे मायावती यांच्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचे सर्वांत लोकप्रिय दलित नेते आहेत, शिवाय ते तरुण आहेत, ही त्यांची जमेची बाजू आहे. त्यामुळे अशा पार्श्वभूमीवर आकाश यांना बसपाकडून प्रचारासाठी उतरवल्याने जे दलित तरुण भाजपा वा चंद्रशेखर यांच्याकडे आकृष्ट होत आहेत, ते बसपाकडे वळण्यास नक्कीच मदत होईल.” नगीना मतदारसंघामध्ये भाजपाने ओम कुमार यांना उमेदवारी देऊ केली आहे; जे नेहतौरचे आमदार आहेत. तर, दुसरीकडे सपाने निवृत्त अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश मनोज कुमार यांना मैदानात उतरवले आहे.

हेही वाचा… जिल्हा परिषद अध्यक्ष भूषविलेल्या भारती कामडी यांच्यापुढे आता लोकसभेचे आव्हान

सध्या बसपाबाबत बोलायचे झाले, तर पक्ष कठीण काळातून जातो आहे. पक्षातील अनेक दलित, मुस्लिम आणि ओबीसी समाजातील मातब्बर नेत्यांनी राम राम केला आहे. त्यामुळे सध्या उत्तर प्रदेश आणि इतर राज्यांतील प्रचाराची जबाबदारी ही प्रामुख्याने मायावती आणि आकाश यांच्याच खांद्यावर येऊन पडली आहे. १४ एप्रिलपासून मायावती या उत्तर प्रदेशमधील देवबंदमधील सभेला संबोधित करीत आपल्या प्रचाराला सुरुवात करतील. याच दिवशी मुझ्झफरनगरमधील आणखी एका सभेला त्या संबोधित करतील. हा मतदारसंघ मुस्लिम आणि जाट यांच्या प्राबल्यासाठी ओळखला जातो. त्यानंतर पुढील दोन दिवस त्या मुरादाबाद व बिजनोर या मतदारसंघांत प्रचाराचे रणशिंग फुंकतील. बसपाकडून मिळालेल्या माहितीनुसार, आकाश हे उत्तर प्रदेश आणि इतर राज्यांमध्ये मिळून एकूण २५ सभांना संबोधित करतील. त्यामध्ये मायावती यांच्यासोबतही काही प्रचारसभा असतील. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी ते खुर्जा, बुलंदशहर, बरेली, मथुरा, आग्रा, अलिगढ, हाथरस व सहारणपूरमध्ये प्रचार करतील.

उत्तर प्रदेशमध्ये एकूण ८० जागांसाठी लोकसभेची लढत होते. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये बसपाने ३८ जागा लढवून फक्त १० जागा जिंकल्या होत्या. ती निवडणूक बसपाने सपासोबत मिळून लढवली होती. सपाने ३७ जागा लढविल्या होत्या आणि त्यांना फक्त पाच जागांवर यश मिळाले होते. त्यानंतर २०२२ मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे लढले होते. ४०३ जागांसाठी झालेल्या या निवडणुकीमध्ये बसपाला एकही जागा जिंकता आलेली नव्हती. गेल्या काही वर्षांमध्ये बसपाची वेगाने होत असलेली पडझड पाहता, आकाश यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असेल आणि ते पक्षाला पुन्हा सोनेरी दिवस आणतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा… औरंगाबादमध्ये एमआयएमच्या विरोधात वंचितचा मुस्लीम उमेदवार, मतविभाजनाचा आणखी एक प्रयोग

अल्पसंख्याक आणि दलितांच्या प्रतिनिधित्वाचे राजकारण करणाऱ्या बसपाची ताकद कमी होण्यामागील आणखी एक कारण म्हणजे सध्या या पक्षात मोठे आणि प्रमुख मुस्लीम नेते नाहीत. माजी खासदार मुकुंद अली वगळता बसपाकडे एकही मोठा चेहरा अल्पसंख्याक समाजातून नाही. त्यामुळे त्यांनाच आता चेहरा बनवून प्रचारात पुढे आणले जाण्याची शक्यता अधिक आहे. बसपाने गेल्या काही वर्षांमध्ये अनेक नेते जसे की, नसिमुद्दीन सिद्दीकी, इम्रान मसूद व दानिश अली यांना गमावले आहे. या सगळ्यांनी काँग्रेसमध्ये जाणे पसंत केले आहे. त्यातील इम्रान मसूद हे सहारणपूरमधून; तर दानिश हे अमरोहा मतदारसंघातून लढत आहेत. बसपाने मध्यंतरी ब्राह्मण समाजालाही चुचकारण्याचा प्रयत्न केला होता. कारण- त्यांचे तरुण ब्राह्मण चेहरा असलेले व आंबेडकर नगर मतदारसंघाचे खासदार रितेश पांडे यांनी अलीकडेच भाजपाची वाट धरली आहे. त्यामुळे सध्या बसपाकडे या समाजातील सतीश मिश्रा हे एकच नाव आहे.