छत्रपती संभाजीनगर: राज्याच्या मंत्रिमंडळात छगन भुजबळ यांचा समावेश झाल्याने धनंजय मुंडे यांना मंत्रीपदाचे दार जवळपास बंदच झाल्याचे मानले जात आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर धनंजय मुंडे यांचे समर्थक व जवळचे कार्यकर्ते वाल्मिक कराड याच्यावर दोषारोप पत्र दाखल झाल्यानंतर खूनाचे छायाचित्र समाजमाध्यमांतून पुढे आले त्यानंतर मुंडे यांनी राजीनामा दिला होता. सोमवारी दिवसभर अजित पवार यांच्या दौऱ्यात धनंजय मुंडे त्यांच्यासमवेत होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला. त्यामुळे महायुती सरकारमध्ये आता राष्ट्रवादी कॉग्रेस अजित पवार यांच्या पक्षाचे नऊ मंत्री आहेत. राष्ट्रवादीचा मंत्रीपदाचा कोटाही संपला आहे.
येत्या काही महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होण्याची शक्यता असल्याने राष्ट्रवादीमध्ये ‘ ओबीसी’ चेहरा नव्हता. मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केली होती. बदनाम मुंडेपेक्षा भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान देणे राष्ट्रवादीला सोयीचे असल्याने त्यांचा समावेश झाल्याचे मानले जात आहे. गेल्या काही दिवसापासून मुंडे हे आजारी असल्याचे त्यांनी वारंवार समाजमाध्यमातून सांगितले आहे. बीड आणि परळी भागातील गुन्हेगारांवर पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत कारवाई करत आहेत. पोलीस दलातील कर्मचाऱ्यांशी गुन्हेगारांशी असणारे संबंध लक्षात आल्यानंतर त्यांच्यावरही कारवाई केली जात आहे.
आता मराठवाड्यातील आठ जिल्ह्यात सहकारमंत्री बाबासाहेब पाटील वगळता मराठवाड्यात अन्य कोणी राष्ट्रवादीचे मंत्री नाहीत. मात्र, अजित पवार यांनी मराठवाड्यात संघटन बांधणीला चांगलाच वेग दिला आहे. सोमवारी गेवराई नगर पालिका क्षेत्रात प्रभाव असणाऱ्या महेश दाभाडे यांचा राष्ट्रवादीमध्ये समावेश करण्यात आला. मात्र, गेल्या काही दिवसापासून अजित पवार यांनी मराठवाड्यात संघटनात्मक बांधणीला वेगाने सुरुवात केली आहे.
वादग्रस्त प्रवेशामुळे राष्ट्रवादीची अडचण
नांदेड येथील अन्वर अली खान या ३० गुन्हे असणाऱ्या व्यक्तीला अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये नुकताच प्रवेश देण्यात आला होता. ही बाब माध्यमांमधून समोर आल्यानंतर वाद निर्माण झाला. अन्वर अली यास पूर्वी तडीपारही करण्यात आले होते. त्यामुळे राष्ट्रवादी कॉग्रेसची बदनामी होऊ नये म्हणून अन्वर अली याला पुन्हा पक्षातून काढण्यात आले असल्याचे प्रताप पाटील चिखलीकर यांनी ‘ लाेकसत्ता’ शी बोलताना सांगितले. दरम्यान ज्यांनी अन्वर अली खान यास राष्ट्रवादीत घ्यावे अशी शिफारस करणाऱ्या बच्चू यादव त्यालाही पक्षातून काढले असल्याचे सांगण्यात आले. या प्रवेशानंतर अजित पवार यांनी स्थानिक नेतृत्वाची कानउघाडणी करावी असा सल्ला खासदार अशोक चव्हाण यांनी जाहीर दिला होता.