Chhagan Bhujbal on Minister Post: महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार १५ डिसेंबर रोजी झाला. एकूण ३९ मंत्र्यांनी शपथ घेतली. ज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या ९ मंत्र्यांचा समावेश होता. मात्र राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ मंत्रिमंडळात नव्हते. मराठा आरक्षणाविरोधात उघड भूमिका घेणाऱ्या छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळाच्या बाहेर ठेवल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. छगन भुजबळ यांनी द इंडियन एक्सप्रेसला मुलाखत दिली असून यात त्यांनी दावा केला की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मी मंत्रिमंडळात हवा होतो, मात्र तरीही माझा मंत्रिमंडळात समावेश झाला नाही. प्रश्नोत्तराच्या स्वरुपात मुलाखत खालीलप्रमाणे…

प्रश्न: फडणवीसांच्या मंत्रिमंडळात तुम्हाला मंत्रिपद देण्याचे आश्वासन दिले होते का?

भुजबळ: माझ्यासारखा माणूस जो इतक्या वर्षांपासून (आणि विद्यमान) मंत्री आहे. त्याच्यासाठी हा प्रश्न कसा निर्माण होऊ शकतो? शिवसेनेत असतानाही माझ्याबाबत हा प्रश्न कधी निर्माण झाला नाही. जर सरकार आमचे आहे, तर मी मंत्रिमंडळात असणे स्वाभाविकच आहे. मी ज्येष्ठ आहे म्हणून नाही तर मी केलेल्या कामावर ही निवड व्हायला हवी. तसेच मला मंत्रिमंडळात घेतले नाही, त्याचे मला दुःख वाटत नाही. पण ज्या पद्धतीची वागणूक दिली गेली, ती क्लेशदायक होती.

मी गेल्या काही वर्षांपासून अनेकांना अंगावर (मराठा आरक्षण आंदोलनातील भूमिका) घेतले आहे. माझ्याबाबत निर्णय घेताना त्यांनी (महायुतीचे नेते) याचा विचार करायला हवा होता. त्यांच्या या कृतीमुळे ओबीसी आणि इतर समाजात चुकीचा संदेश जाईल.

हे वाचा >> Chhagan Bhujbal Samta Parishad Baithak : छगन भुजबळ यांचं आक्रमक भाषण “कभी ना डर लगा मुझे फासला देखकर…”

प्रश्न: नेमके काय घडले? तुम्ही अजित पवार आणि प्रफुल पटेल यांच्याशी याबाबत चर्चा केली?

भुजबळ: मी बोललो. प्रफुल पटेल म्हणाले की, त्यांनी मला अजित पवारांशी बोलण्याचा सल्ला दिला. मी अजित पवारांशी बोललो. ते म्हणाले, राज्यसभेचे विद्यमान खासदार नितीन पाटील यांना राजीनामा देण्यास सांगून मला तिथे पाठवले जाणार आहे. तर नितीन पाटील यांचे बंधू मकरंद पाटील यांना मंत्री केले जाणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या आधी मी लोकसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक होतो. पण पक्षाने माझा प्रस्ताव स्वीकरला नाही. त्यांनी सांगितले की, माझी राज्यात गरज आहे. येवला विधानसभा मतदारसंघ माझ्याशिवाय जिंकता येणार नाही, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे मी विधानसभा निवडणूक लढण्यास तयार झालो. आता ते मला सांगत आहेत की, मकरंदला मंत्री करण्यात आले आहे आणि मला राज्यसभेत जाण्यास सांगत आहेत.

याचा अर्थ मला विधानसभेचा राजीनामा द्यावा लागेल. हा माझ्या मतदारसंघातील मतदारांचा अवमान होणार नाही का? विधानसभा निवडणूक लढविणे सोपे नाही. माझ्या कार्यकर्त्यांनी माझ्या विजयासाठी अहोरात्र काम केले. हे माझ्या माझ्या लोकांची फसवणूक केल्यासारखे होईल.

प्रश्न: ही चर्चा कधी झाली? तुम्ही नेतृत्वाला काय सांगितले?

भुजबळ: ही चर्चा आठ दिवसांपूर्वी झाली. मी त्यांना सांगितले की, मी राजीनामा देणार नाही. मी दोन वर्षांनंतर राज्यसभेत जायला तयार आहे, तोपर्यंत मला मंत्री करा. मी सांगितले गेले की, या विषयावर नंतर चर्चा करू, पण अद्याप चर्चा झालेली नाही.

प्रश्न: फक्त हाच विषय आहे का? पक्षाच्या इतर निर्णय प्रक्रियेत तुम्हाला सामावून घेतले जाते का?

भुजबळ: मी पक्षाच्या कोणत्याही निर्णय प्रक्रियेत नाही. सुरुवातीला पक्ष आणि मंत्रिमंडळात आम्ही सर्व एकत्र निर्णय घेत होतो, पण त्यानंतर हे बंद झाले. माझ्याशी आता काहीही चर्चा होत नाही. आता फक्त अजित पवार, प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे हे तिघेच निर्णय घेतात.

प्रश्न: मराठा आरक्षणाच्या विरोधात तुम्ही ओबीसींच्या बाजूने उभे राहिलात म्हणून तुम्हाला मंत्रिपद मिळाले नाही, असे वाटते का?

भुजबळ: हा एक विषय असू शकतो. तुम्ही बघा, मला त्यांनी मंत्रिमंडळातून वगळले असले तरी नाशिकमधील दोन मराठा नेत्यांना मंत्रिमंडळात घेतले आहे. मागच्या एका वर्षात बरेच काही घडले आहे. मराठा मतपेटी दूर होईल म्हणून एकेकाळी नेते बोलायला घाबरत होते, त्यावेळी मी ओबीसी समाजासाठी आक्रमकपणे भूमिका मांडली. नव्या मंत्रिमंडळात काही ओबीसी नेते जरूर घेतले आहेत. पण ओबींसीच्या हक्कासाठी एखादा आक्रमक नेता तिथे असणे आवश्यक आहे.

प्रश्न: देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर तुम्ही बोलला आहात?

भुजबळ: हो मी देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोललो. ते म्हणाले, मी अजित पवारांना म्हणालो होतो की, तुम्ही मंत्रिमंडळात हवेत. फडणवीसांनी सांगितले की, शेवटच्या क्षणापर्यंत ते मला मंत्रिमंडळात घेण्यासाठी आग्रही होते.

प्रश्न: आता तुमची पुढची रणनीती काय?

भुजबळ: बघूया. शनिवारी राज्यभरातून माझे समर्थक नाशिकमध्ये येत आहेत. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर मी पुढची रणनीती ठरवेल.

प्रश्न: शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे म्हणाले की, तुम्ही त्यांच्या संपर्कात आहत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भुजबळ: आम्ही दोघेही अनेक दशकांपासून राजकारणात असून आम्ही एकमेकांशी विविध विषयांवर चर्चा करत आलो आहोत. याचा अर्थ असा नाही की, आमचे काही राजकीय संबंध निर्माण होतील.