मुंबई: मराठीच्या मुद्द्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकत्र आल्यानंतर युतीची जोरदार शक्यता वर्तवली जात आहे. मात्र यामुळे महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्ष असुरक्षित झाला आहे. ठाकरे बंधू एकत्र येणार असतील, निवडणुका एकत्र लढणार असतील तर त्याचे स्वागत आहे, मात्र यामुळे एक पक्ष कमी होईल, असे विधान काँग्रेस ज्येष्ठनेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केले आहे.
मराठीच्या मुद्द्यावर करण्यात आलेल्या मारहाणीला समर्थन करता येणार नाही, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. ठाकरे बंधूंचा एकत्र येण्याचा निर्णय केवळ एका निवडणुकीपुरता असेल तर पुढे काय होईल हे माहिती नाही. भविष्यात दोन्ही पक्ष एकमेकांत विलीन होतील का? विलीन झाले, तर त्याचे नेतृत्व कोण करणार? याविषयी जनतेला उत्सुकता आहे.
विजयी मेळावा घेणे, त्यासाठी एकत्र येणे चुकीचे नाही. पण मराठीच्या मुद्द्यावर मारहाण करणे ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे. महाराष्ट्राची एक परंपरा आहे. ती भंग होईल अशा कोणत्याही गोष्टीला आमचा पाठिंबा नसेल, असे ते म्हणाले.
स्वबळाचा नारा
काँग्रेस पक्षाची भूमिका अशी आहे की आमची आघाडी इंडिया आघाडीतील घटक पक्षांसोबत आहे. यात उद्धव ठाकरे व शरद पवारांच्या पक्षांचा समावेश आहे. त्यांना इतर कोणत्याही पक्षासोबत किंवा समान विचारसरणीच्या पक्षाशी युती करायची असेल तर तो त्यांचा मुद्दा आहे. पण आघाडीतील घटकपक्षांना काँग्रेसच्या विचारसरणीला, धर्मनिरपेक्षतेच्या विचारसरणीला व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात नमूद केलेल्या विचारसरणीला मुलभूतपणे विरोध करणाऱ्या लोकांसोबत युती करायची असेल तर ते आम्ही स्वीकारणार नाही.
काँग्रेस पक्षाने यापूर्वी अनेकदा स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक स्वबळावर लढवली आहे. त्यामुळे पक्षाने मुंबई, पुणे व नागपूर महापालिकेची निवडणूक स्वतंत्रपणे लढवण्याचा निर्णय घेतला तर मला आश्चर्य वाटणार नाही, असेही पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.