छत्रपती संभाजीनगर : मारवाडी, मुस्लिम आणि लिंगायत या मतपेढी ‘मामुली’ ठरवल्याने काँग्रेसचे नेते विलासराव देशमुख यांचा पराभव झाला होता. या मतपेढीतील मारवाडी वगळले गेले आणि मराठा समाजाची भर पडली. मामुली शब्दातील भाषिक अर्थाने काना पुसला गेला आणि मामुलीऐवजी ‘ममुली’ (मराठा, मुस्लीम, लिंगायत ) झाले आणि काँग्रेसचे शिवाजीराव काळगे निवडून आले. रुग्णसेवेमध्ये रमलेले डॉ. काळगे खासदार झाले.

परिसिमन आयोगाच्या निर्देशानुसार जेव्हापासून लातूर लोकसभा मतदारसंघ आरक्षित झाला तेव्हापासून डॉ. शिवाजी काळगे यांना वाटायचे की, ‘लढवावीच एक निवडणूक.’ काळगे तसे नेत्ररोग तज्ज्ञ. गेली २६ वर्षे अनेकांना दृष्टी परत मिळवून देणारे. त्यामुळे लोकांशी संपर्क चांगला. भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांचा आणि त्यांचा चांगला परिचय. २०१४ मध्ये भाजपने त्यांना उमेदवारी द्यावी, असे प्रयत्नही मुंडे यांनी केले होते. पण तेव्हा त्यांना ते जमले नाही. पुढे सुशिक्षित आणि संपर्क असणाऱ्या उमेदवाराचा शोध काँग्रेसलाही होता. २०१९ मध्ये काँग्रेसकडून त्यांना उमेदवारी देण्यासाठी अमित देशमुख यांनी प्रयत्न केले. पण तेव्हाही डॉ. काळगे यांना तिकिट मिळाले नाही. तोपर्यंत डॉ. काळगे रुग्णसेवेतच रमलेले. त्यांच्या पत्नी स्त्रीरोगतज्ज्ञ आहेत. आता मुलगाही एम्समध्ये शिकतो आहे. त्यामुळे वैद्यकीय व्यवसाय हाच तसा घरातल्या चर्चेचा विषय.

आणखी वाचा-निकालानंतर बंगालमध्ये भाजपा कार्यकर्ते घर सोडून पक्ष कार्यालयात ठाण मांडून का बसलेत?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२०१९ नंतर तसा त्यांनी नाद सोडून दिला होता. पण २०२४ मध्ये अमित देशमुख यांनी उमेदवारीसाठी विचारलं. तसं डॉ. काळगे समन्वयवादी, एका बाजूला डॉ. अशोक कुकडेसारख्या रा. स्व. संघातील अधिकारी व्यक्तींशीही संपर्क आणि दुसरीकडे काँग्रेसच्या नेत्यांशी तेवढेच जिव्हाळ्याचे संबंध. माला जंगम ही जात लातूरच्या राजकारणात शक्तीस्थळ बनली. त्याला सर्वस्वी अमित देशमुख यांची रणनीतीही कारणीभूत होती. ही निवडणूक काँग्रेस गांभीर्याने लढवत असल्याचे संकेत मिळू लागले. काँग्रेसचे नेते दिवंगत विलासराव देशमुख यांच्या पत्नी वैशाली देशमुख जेव्हा प्रचारात उतरल्या तेव्हा मतदारांपर्यंत योग्य तो संदेश पोहोचला होता, मुस्लिम, मराठा आणि लिंगायत अशी नवी मतपेढी लातूरपुरती तयार झाली आणि डॉ. शिवाजी काळगे निवडून आले. काळगे सांगत होते, ‘शेतमालाचा भाव हा प्रचारात कळीचा मुद्दा असल्याचे जाणवत होते. त्याला प्रचारात फुंकर घातली गेली. परिणामी निवडून आलो.’