संजीव कुळकर्णी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नांदेड : तशी कडाक्याची थंडी नाही पण अतिवृष्टीनंतरचा गारठा मशालीच्या प्रकाश झोतात कार्यकर्त्यांना ऊर्जा देणारा. छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष आणि कार्यकर्त्यांच्या उत्साहात राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सोमवारी रात्री महाराष्ट्रात दाखल झाली. या यात्रेमधील यात्रेकरू आणि मंगळवारी सकाळच्या टप्प्यातील यात्रेतील कार्यकर्त्यांचा उत्साह पाहून मरगळलेल्या महाराष्ट्र काँग्रेसचे नेतेही भारावून गेले आणि त्यांना नवी ऊर्जा मिळाली.

मौलिक ऐतिहासिक वारशासह मोठ्या व्यापारीपेठेचे गाठोडे पाठीशी असलेल्या देगलूर नगरीमध्ये सोमवारी रात्री भारत जोडो यात्रेचे हर्षोत्फुल स्वागत झाल्यानंतर खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत यात्रींसह हजारो काँग्रेसजनांचा नांदेड शहराच्या दिशेने प्रवास सुरू झाला. मंगळवारी सकाळच्या सत्रात खासदार गांधी व इतर यात्री सात कि.मी. अंतर चालले. या पदयात्रेत राहुल यांच्यासोबत अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया चव्हाण याही चालताना दिसल्या.

हेही वाचा… प्रकाश आबिटकर : विकास आणि जनतेशी नाळ

तेलंगणा राज्यातून देगलूरमध्ये यात्रेचे आगमन झाल्यानंतर राहुल यांनी आतापर्यंतचा शिरस्ता बाजूला ठेवत देगलूर ते वन्नाळीच्या गुरूद्वारापर्यंत पदयात्रा सुरू केली. रात्री १० नंतर सुरू झालेल्या या पदयात्रेत महाराष्ट्रातील काँग्रेसचे प्रमुख ज्येष्ठ नेते सहभागी झाले. वयस्क नेते काही वेळ पायी चालले तर काही अंतर त्यांनी मोटारीतून पार केले.

मंगळवारच्या गुरूनानक जयंतीच्या पार्श्वभूमीवर यात्रेच्या संयोजकांनी राहुल यांना गुरूद्वारातील प्रार्थनेसाठी नेण्याचा निर्णय घेतल्यावर तसे नियोजन करण्यात आले. मध्यरात्री दीडच्या सुमारास गुरूद्वारात पोहोचल्यावर राहुल यांनी तेथे स्नान आटोपून दर्शन घेतले. त्यानंतर ते मोटारीने देगलूरकडे रवाना झाले.

हेही वाचा… ‘भारत जोडो’ यात्रेत ३० हजारांहून अधिक वैदर्भीय सहभागी होणार

राहुल यांची मंगळवारच्या सकाळच्या सत्रातील पदयात्रा वन्नाळी येथून सुरू झाली. १० वाजेपर्यंत ७ कि.मी. अंतर पायी चालून यात्रेकरू पुढच्या कॅम्पमध्ये थांबले. सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण आणि अशोक चव्हाण हे तीन माजी मुख्यमंत्री सकाळच्या पदयात्रेत चालले. सुमारे १५ हजार लोक यात्रेत सहभागी झाले होते. ‘नफरत तोडो, भारत जोडो’ ही घोषणा काँग्रेस कार्यकर्ते देत होते. रस्त्याच दुतर्फा यात्रेचे स्वागत करणारे फलक लागलेले होते.

अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया यांच्या राजकीय पदार्पणाची चर्चा यात्रेच्या तोंडावरच सुरू झाली होती. मंगळवारच्या पदयात्रेत श्रीजयाचे आगमन झाल्यामुळे चव्हाण समर्थकांनी त्यांचे स्वागत केले. अशोक चव्हाण यांनी राहुल यांच्याशी श्रीजयाची ओळख करून दिली. आ.अमरनाथ राजूरकरही राहुल यांच्यासोबत काहीवेळ चालले. अशोक चव्हाण त्यांना आसपासच्या परिसराची माहिती देत होते. ७ कि.मी. अंतर चालल्यानंतर ही पदयात्रा वझरगा-टाकळी परिसरात विश्रांतीसाठी थांबली.

हेही वाचा… अब्दुल सत्तार : शिवराळ भाषा व आक्षेपार्ह वर्तन हीच ओळख

राहुल गांधी मोबाइल विसरले

सोमवारी मध्यरात्री वन्नाळी येथील गुरूद्वारामध्ये आल्यानंतर राहुल यांचा अ‍ॅपल कंपनीचा भ्रमणध्वनी तेथेच एकेठिकाणी विसरला होता. तो भोकर येथील चव्हाण समर्थक रामचंद्र मुसळे यांच्या हाती लागल्यानंतर त्यांनी तो आपल्याकडे ठेवला. काही वेळातच त्यावर संपतकुमार यांनी संपर्क साधून तो कोणाकडे आहे, याची चौकशी केली तेव्हा मुसळे यांनी आपण काँग्रेस कार्यकते आहोत, माझ्याकडे आहे असे सांगितल्यानंतर संपतकुमार यांच्या सूचनेनुसार त्यांनी तो वेणुगोपाल यांच्याकडे सुपूर्द केला.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Due to bharat jodo yatra congress gets new boost in maharashtra print politics news asj
First published on: 08-11-2022 at 11:45 IST