Nasbandi Colony Emergency in india 1975 : दिल्ली-गाझियाबाद सीमेजवळील लोणी परिसरात वसलेली ‘नसबंदी कॉलनी’ आजही ५० वर्षांपूर्वीच्या आठवणी जिवंत ठेवते. आणीबाणीच्या काळात सरकारच्या नसबंदी आणि पुनर्वसन मोहिमेतून दिल्लीतील मध्यवर्ती भागातील तुर्कमान गेट येथील रहिवाशांना जबरदस्तीने हुसकावून या भागात आणण्यात आले होते. ही वस्ती तेव्हापासून ‘नसबंदी कॉलनी’ म्हणून ओळखली जाते. १९८० च्या दशकात तुर्कमान गेटमधून आलेल्या पहिल्या कुटुंबांनी येथे वास्तव्यास सुरुवात केली. परंतु, त्या काळात जी परिस्थिती होती, ती आजही फारशी बदललेली नाही. उघडी गटारे, सर्वत्र खड्डे पडलेले रस्ते आणि त्यावर बसलेली मोकाट जनावरे, सर्वत्र पसरलेल्या कुजलेल्या कचऱ्याचा वास, अशी या भागाची आजही ओळख आहे.
नसबंदी कॉलनीतील रहिवाशांचं म्हणणं आहे की, सरकारने आम्हाला फक्त जमिनी दिल्या; पण रोजगार आणि उपजीविकेसाठी आजही वणवण भटकावं लागत आहेत. या परिसरातील सरकारी शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी कोणत्याही सुविधा नाहीत. परिणामी अनेक पिढ्या शिक्षणाच्या अंधारातच वाढलेल्या आहेत. ‘नसबंदी कॉलनी’ ही फक्त एका मोहिमेची आठवण नसून, ती आजही प्रशासनाच्या अपयशाचे जिवंत उदाहरण देशासमोर ठेवते.
तुर्कमान गेटपासून सुमारे १६ किलोमीटर अंतरावर आणीबाणीच्या काळात ज्या कुटुंबांची घरे तोडण्यात आली होती, तेथील रहिवासी आता नुकसानभरपाई म्हणून मिळालेल्या दिल्ली विकास प्राधिकरणाच्या प्लॅट्समध्ये राहतात. त्याचे बांधकाम सुमारे ४८ वर्षांपूर्वी केलेले असून आता त्यांना तातडीने दुरुस्तीची गरज आहे. या परिसरातील अरुंद गल्लींमध्ये भंगाराची असंख्य दुकाने आहेत. त्यासमोर जुने वापरलेले एअर कंडिशनर आणि कूलर तसेच इतर निरुपयोगी वस्तूंचा खच दिसून येतो.
गोळीबारात सहा लोकांचा झाला होता मृत्यू
आणीबाणीच्या काळातील चौकशी करणाऱ्या शाह आयोगाच्या अहवालानुसार, १९ एप्रिल १९७६ रोजी तुर्कमान गेट परिसरातील घरांवर सरकारने त्यावेळी हातोडा चालविला. त्याविरोधात आंदोलन करणाऱ्या नागरिकांवर पोलिसांनी अंदाधुंद गोळीबार केला, ज्यात ज्यात सहा लोकांचा मृत्यू झाला आणि कित्येकजण जखमी झाले. दिल्लीमध्ये आणीबाणीच्या काळात एकूण १.५ लाखाहून अधिक संरचना तोडण्यात आल्या होत्या. मात्र तुर्कमान गेट हा या मोहिमेचा सर्वाधिक ठळक आणि जिवंत दाखला मानला जातो. तुर्कमान परिसरातील आंदोलकांनी नसबंदीच्या मोहिमेविरोधातही मोठा संताप व्यक्त केला होता. त्यामागचं कारण म्हणजे- १५ एप्रिलला येथे काँग्रेसचे दिवंगत नेते संजय गांधी आणि तत्कालीन लेफ्टनंट गव्हर्नर कृष्ण चंद यांनी नसबंदी शिबिराचे उद्घाटन केले होते.
आणखी वाचा : संजय गांधींच्या मैत्रीण रुख्साना सुलताना कोण होत्या? आणीबाणीत १३ हजार पुरुषांची नसबंदी कुणी केली?
आणीबाणीत नसबंदी मोहीम कशी राबविण्यात आली?
- शाह आयोगाच्या अहवालानुसार, १९७५ ते १९७७ दरम्यान देशभरात नसबंदीची मोहीम राबविण्यात आली.
- आणीबाणीच्या काळात राबविण्यात आलेल्या या मोहिमेचे नेतृत्व संजय गांधी यांनी केले होते.
- केंद्र सरकारने या मोहिमेअंतर्गत देशभरातील ६५ लाख पुरुषांची नसबंदी करण्याचे ध्येय ठेवले होते.
- प्रत्यक्षात मात्र एक कोटींहून अधिक पुरुषांची नसबंदी करण्यात आली, त्यात काही तरुणही होते.
- नसबंदीच्या प्रक्रियेदरम्यान एक हजार ११७४ पुरुषांचा मृत्यू झाला, ज्यामध्ये काही वृद्ध नागरिकही होते.
- नसबंदीच्या भीतीने पुरुष मंडळी गावापासून दूर राहत होते. काहींनी त्यावेळी लपण्यासाठी कोरड्या विहिरीचा आसरा घेतला होता.
नसबंदीसाठी दाखवलं जायचं प्रलोभन
तुर्कमान परिसरात राहणारे ६९ वर्षीय जाकीर अहमद सांगतात, “देशात आणीबाणी लागू झाली, तेव्हा मी सात वर्षांचा होतो. त्यावेळी डॉक्टरांचे पथक आमच्या कॉलनीत आले आणि त्यांनी कामगारांची व भिकाऱ्यांची जबरदस्तीने नसबंदी केली. अधिकाऱ्यांनी नसबंदीचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी नागरिकांना प्रलोभने दिली. ज्यामध्ये पैसे, खाद्यतेलाचे चार किलोचे डबे आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचा समावेश होता.”

जाकीर अहमद म्हणतात – लोक घराबाहेर पडत नव्हती
पाणावलेल्या डोळ्यांनी जाकीर अहमद पुढे सांगतात, “त्या काळात कोणीही नसबंदीपासून स्वत:ला वाचवू शकत नव्हते. जो कोणी काही बोलायचा त्याला तुरुंगात टाकलं जात होतं. त्यामुळे परिसरातील लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. हिंदू व मुस्लीम कुटुंब एकमेकांच्या आश्रयाने राहायचे आणि कुणीही रात्री घरातून बाहेर पडत नव्हते.
तुर्कमान गेट वेलफेअर अँड कोऑर्डिनेशन कमिटीचे संस्थापक सदस्य मोहम्मद शाहिद गंगोही यांनी सांगितले की, “पंतप्रधान इंदिरा गांधी आणि त्यांचे पुत्र संजय गांधी यांच्याबद्दल जनतेमध्ये एवढा संताप होता की लोक आणीबाणीत लागू केलेल्या ‘एमआयएसए’ (आंतरिक सुरक्षा राखण्याचा कायदा). या कायद्याला उपरोधिकपणे ‘माता इंदिरा संजय अधिनियम’ असे म्हणू लागले होते. या कायद्यापासून वाचण्यासाठी लोक त्यांच्या दुकानांवर व घरांवर इंदिरा गांधींचे फोटो लावत होते.”
रुख्साना सुलताना यांनी केली १३ हजार पुरुषांची नसबंदी
संजय गांधी यांच्याशी मैत्रिपूर्ण संबंध असल्यामुळे काँग्रेसमधून झपाट्याने पुढे आलेल्या रुख्साना सुलताना यांना त्यावेळच्या घटनांसाठी आजही जबाबदार मानलं जातं. कारण त्यांनी दिल्लीतील वॉल्ड सिटीमध्ये नसबंदी मोहिमेच्या अंमलबजावणीची सूत्रं हाती घेतली आणि जवळपास १३ हजार पुरुषांची नसबंदी केली होती. माजी काँग्रेस नेते सफी देहलवी (वय ७५) सांगतात, “एप्रिल १९७६ मध्ये संजय गांधी येथे आले, तेव्हा त्यांना नागरिकांच्या प्रचंड विरोधाचा सामना करावा लागला. त्यावेळी त्यांनी या परिसराकडे पाहून म्हटलं की, हे तर मिनी पाकिस्तान आहे. काही दिवसांतच बुलडोझर तुर्कमान गेटच्या दारात आले होते.”
गंगोही म्हणतात- आमच्या घरावर बुलडोजर चालविला
१९ एप्रिलच्या दुपारी गंगोही नावाचे रहिवासी हे झाकीर हुसेन महाविद्यालयातील बीएच्या पहिल्या वर्षाची परीक्षा देण्यासाठी निघाले होते. त्यावेळी अचानक घोषणा झाली की, त्यांच्या भागातील विद्यार्थ्यांनी प्राचार्यांची भेट घ्यावी. तेव्हा गंगोही यांना समजलं की १.४५ वाजता पोलीस आणि लष्कराने लाठीमार व गोळीबार केला. सुमारे ५०० लोकांना अटक करून इतकी मारहाण करण्यात आली की, ते मृत्यूच्या उंबरठ्यावर पोहोचले. गंगोहींचे घर एका मशिदीच्या भिंतीस लागून होते, त्यामुळे कुटुंबाला वाटले की, आमचे घर पाडण्यात येणार नाही; पण त्यावरही बुलडोजर चालविण्यात आला.
नसबंदीला विरोध करणाऱ्यांवर कारवाई
गंगोही सांगतात, “आमच्या परिसरातील बहुतांश विस्थापितांना प्रथम त्रिलोकपुरीला, काहींना नंद नगरी, रंजीत नगर आणि शाहदरा येथे हलवण्यात आले. विस्थापितांची मुख्य मागणी होती की, आमची कुटुंबं विभागली जाऊ नयेत आणि त्यांना बांधलेली घरे नुकसानभरपाई म्हणून मिळावी. मात्र, त्यांना जिथे जागा देण्यात आली, तिथे पायाभूत सुविधा नव्हत्या आणि सर्वत्र जंगलासारखी अवस्था होती. मोहम्मद रिजवान (वय ७५) सांगतात, “असिफ अली रोडवर संजय गांधींनी नसबंदीचे फायदे सांगितले होते. मात्र, परिसरातील नागरिकांनी या मोहिमेला जोरदार विरोध केला. परिणामी अनेकांची घरे पाडण्यात आली. माझ्या एका नातेवाईकाचा अब्दुल मलीक (वय २३) या कारवाईत मृत्यू झाला.”
हेही वाचा : जॉर्ज फर्नांडिस : रेल्वे संपाचा नायक आणि हुकूमशाहीविरोधात लढणारा नेता
नसबंदीत भिकाऱ्यांवर सर्वात जास्त अन्याय
त्या काळात शाळेत असलेले आणि आज एक वरिष्ठ सरकारी अधिकारी असलेले एक व्यक्ती सांगतात, “चांदणी चौकजवळ युथ काँग्रेसचे कार्यकर्ते ‘हम दो, हमारे दो’ अशा घोषणा देत असत. शिक्षकही आमच्यावर नसबंदीबाबत दबाव आणत. सरकारी कर्मचाऱ्यांना वाटत होतं, विरोध केल्यास बढती थांबेल.” इतिहासकार सोहैल हाशमी सांगतात की, त्यांच्या आई कीदवाई नगरमधील एका सरकारी शाळेच्या मुख्याध्यापिका होत्या. त्यांच्यावर प्रत्येक महिन्याला दोन नसबंदी प्रमाणपत्रं देण्याचा दबाव होता. रिक्षावाले, भिकारी, व्यसनाधीन अशा गरीब लोकांवर त्यावेळी सर्वात मोठा अन्याय झाला.
नसबंदीची सक्ती रद्द झाल्यानंतर काय घडलं?
नसबंदी कॉलनीत राहणारे संतोष गुप्ता सांगतात की, त्यांची आई शशी बाला यांनी स्वेच्छेने नसबंदी केली होती. त्या बदल्यात त्यांना एक प्लॉट मिळाला आणि १९८५ मध्ये त्यांचे कुटुंब कॉलनीत आले. १९९८ मध्ये गुप्तांनी त्याच प्लॉटवर दुकान सुरू केलं. आता ते आपल्या पत्नी व चार मुलांसह शेजारील घरात राहतात. सध्या गुप्ता हे करावल नगरला स्थलांतराचा विचार करीत आहेत, जिथे चांगल्या सुविधा असून त्या भागाचा बऱ्यापैकी विकास झालेला आहे. दरम्यान, आणीबाणी व नसबंदीच्या आठवणी घेऊन जगणारे जाकीर अहमद सांगतात की, जेव्हा नसबंदीची सक्ती रद्द झाली, तेव्हा दिल्ली दिवाळी-ईदसारखी आनंदी वाटत होती. दारुच्या दुकानांवर इतकी गर्दी जमली होती संपूर्ण बाटल्या संपल्या होत्या. त्यावेळी प्रत्येकजण आनंद साजरा करीत होता.