कोल्हापूर : मराठा आरक्षणाचा प्रश्न तापला असताना लोकप्रतिनिधींना लक्ष्य करण्याचा मुद्दा राजकीयदृष्टया वादग्रस्त ठरत आहे. हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने हरवले आहेत, असा मोर्चा काढण्यात येऊन खासदारांविषयीची नाराजी भर रस्त्यावर व्यक्त करण्यात आली. त्यावर खासदार माने यांनी मराठा समाजातील आंदोलनाच्या सहभागाचा संदर्भ देत हे बदनाम करणारे राजकीय आंदोलन असल्याचे म्हटले आहे. आंदोलकांनी यामध्ये राजकारणाचा लवलेश नसल्याचे स्पष्टीकरण केले आहे.

सध्या राज्यात मराठा समाजासह इतर मागासवर्गीय, धनगर, आदिवासी यांनीही आंदोलनाचा झेंडा हाती घेतला आहे. सकल मराठा समाजाने आंदोलन करताना नेत्यांना गाव बंदी घातली. त्याचा फटका अनेक भागात लोकप्रतिनिधींना बसला. कोल्हापूर जिल्हा या आंदोलनाचे प्रमुख केंद्र आहे. पालकमंत्री हसन मुश्रीफ हे मुंबईहून कोल्हापुरात येताच क्षणी रेल्वे स्थानकामध्ये त्यांना रोखण्यात आले होते. अनेक भागात आमदार, खासदारांना अडवले गेले.

हेही वाचा : ‘मोदींनी जिथे प्रचार केला, तिथे भाजपाचा पराभव झाला’, पंतप्रधान मोदींच्या विधानावर सिद्धरामय्यांचा पलटवार

खासदार हरवल्यावरून वाद

सकल मराठा समाजाने पेठ वडगाव आणि परिसरातील २५ गावातील लोकांनी एकत्रित येऊन आरक्षणाचे आंदोलन करताना लोकप्रतिनिधी, वाचाळवीर यांचा निषेध करण्यात आला. आपण निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीनी आरक्षणाची भूमिका स्पष्ट करून पाठबळ दिले पाहिजे, अशा आंदोलकांच्या भावना होत्या. त्यातून प्रथम काँग्रेसचे हातकणंगलेचे आमदार राजू आवळे यांना रोखण्यात आले होते. त्यांनी मराठा समाजाला पाठिंबा व्यक्त केला. मराठा आंदोलनाकडे खासदार धैर्यशील माने यांचे दुर्लक्ष होत असल्याची भावना आंदोलकांमध्ये पसरली होती. त्यातूनच मराठा समाजाने पोलीस ठाण्यावर एक मोर्चा काढला. खासदार धैर्यशील माने हरवले आहेत, अशी तक्रार पोलीस ठाण्यात देण्यात आली. तेथून परत येताना एक अनोखे आंदोलन केले. ‘खासदार हरवले आहेत.वर्ण- गोरा, दाढी वाढवलेली, मराठा समाजाची मते घेऊन समाजाची फसवणूक केली आहे. कुठे आढळल्यास मतदारसंघात पाठवणी करावी. लवकरात लवकर परत ये, कोणीही रागवणार नाही, तुझी खूप आठवण येते…!’, हा मजकूर लिहिलेला फलक लक्षवेधी ठरला. फलकाद्वारे खासदार धैर्यशील माने यांच्या विरोधातील आंदोलन भलतेच चर्चेत आले.

हेही वाचा : ‘मी मुख्यमंत्रिपदाची चिंता करीत नाही’, भाजपाने नाव घोषित न केल्यामुळे शिवराज चौहान यांची भूमिका

खासदार माने लक्ष्य

यावर भूमिका स्पष्ट करताना धैर्यशील माने यांनी राजकारणाचा हेतू डोळ्यासमोर ठेवून आंदोलन केल्याची टिपणी केली आहे. सकल मराठा समाजाचा महामोर्चा मध्ये आजारी असतानाही सहभागी झालो होतो. संसदेमध्ये हा प्रश्न मांडला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे विशेष अधिवेशनाची मागणी केली आहे. आंदोलनाला माझा असा कृतिशील पाठिंबा असताना मला लक्ष्य करून राजकीय द्वेषातून आंदोलन केले आहे,अशी टीका केली. खासदारांची हि भूमिका योग्य नसल्याचे वडगाव मधील समाजाचे म्हणणे आहे. मुळात सकल मराठा समाजाचे आंदोलन हे अराजकीय स्वरूपाचे आहे. त्यामध्ये काही माने समर्थकांचाही समावेश होता. खासदार माने हे शिंदे गटात गेल्यानंतर त्यांचे किणी टोल नाक्यावर स्वागत करणारे काही कार्यकर्ते होते. ते सकल मराठा समाजाच्या फलक आंदोलनात सहभागी होते. याबाबत आंदोलनाचे समन्वय डॉ. अभयसिंह यादव म्हणाले, सकल मराठा समाजाची भूमिका लोक, लोकप्रतिनिधींना जागृत करण्याची असल्याने रोज वेगवेगळ्या मार्गाने आंदोलन केले जात होते. आंदोलनाची भूमिका समाजाच्या बैठकीमध्ये निश्चित केली जात होती. लोकप्रतिनिधींपर्यंत भावना पोहोचून पाठबळ मिळवण्याचा प्रयत्न होता. कोणत्याही राजकीय नेत्याच्या विरोधात आंदोलन केलेले नाही, असे स्पष्टीकरण त्यांनी केले आहे.

हेही वाचा : विश्लेषण: PMGKAY ला पाच वर्षांची मुदतवाढ; अन्न सुरक्षा कार्यक्रमामागे मोदी सरकारचा नेमका उद्देश काय?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मंडलिक विरोधात घोषणाबाजी

दरम्यान, कोल्हापूर येथील सकल मराठा समाजाच्या आंदोलन स्थळी शिंदे शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक यांनी भेट देऊन पाठिंबा दिला. यावेळी ठाकरे शिवसेनेच्या समर्थकांनी घोषणाबाजी केली. अन्य लोकप्रतिनिधी आल्यावर घोषणाबाजी होत नसताना मंडलिक यांच्यावेळीच घोषणा कशा दिल्या गेल्या असा प्रतिप्रश्न समर्थकांकडून केला जात आहे. आरक्षणाचे आंदोलन या ना त्या कारणाने राजकीय वळणावर जाऊ नये अशी अपेक्षाही व्यक्त केली जात आहे.