हर्षद कशाळकर

खरीप हंगाम आढाव्यासाठी आयोजित बैठकीला शिवसेना, भाजप आणि शेकापचे आमदार गैरहजर राहिल्याने राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीतील शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांमधील विसंवाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने केलेल्या तयारीचा आणि नियोजनाचा आढावा घेण्यासाठी दरवर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीला बैठक होत असते. पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीला जिल्ह्यातील आमदार आणि खासदार उपस्थित असतात. त्यानुसार  जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच ही बैठक पार पडली.  मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिकेत तटकरे आणि खासदार सुनील तटकरे वगळता शिवसेनेचे तीन, भाजपचे तीन आणि शेतकरी कामगार पक्षाचे (शेकाप) दोन आमदार गैरहजर राहिले. खासदार श्रीरंग बारणे हेही या बैठकीकडे फिरकले नाहीत. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील विसंवादाची चर्चा पुन्हा एकदा सुरु झाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे वजनदार नेते खासदार सुनील तटकरे आपल्या पालकमंत्री कन्या आदिती यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील सत्ता ताब्यात ठेवण्याची सतत काळजी घेत असतात. हे करताना स्वाभाविकपणे जिल्ह्यातील शिवसेना व शेकाप या महाविकास आघाडीतील वाटेकऱ्यांना काहीसे अंतरावर ठेवण्याचे धोरण त्यांनी अवलंबले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या स्थापनेपासूनच शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात रायगडमध्ये सुप्त संघर्ष चालू आहे.  अधूनमधून तो उफाळूनही येत असतो. कधी जिल्हा विकास निधीत पुरेसा वाटा मिळाला नाही म्हणून, तर कधी आमदारांच्या कामाचे श्रेय पालकमंत्री घेतात म्हणून, तर कधी जिल्हा परिषदेच्या सत्तेत स्थान मिळाले नाही म्हणून. या वादांची प्रचिती अशाप्रकारे सातत्याने येत असते. काही वेळा पत्रकार परिषदा किंवा शासकीय कार्यक्रमांवर अघोषित बहिष्कार टाकून खदखद व्यक्त होते. मध्यंतरी तर पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेच्या तिन्ही आमदारांनी आणि जिल्हाध्यक्षांनी पालकमंत्री बदला, अशीच मागणी केली. मात्र मुख्यमंत्र्यांनी त्याची फारशी दखल घेतली नाही. त्यामुळे एकूणच महाविकास आघाडीच्या स्थापनेपासून या दोन भागीदारांमध्ये निर्माण झालेला दुरावा काही संपण्याची चिन्ह दिसत नाहीत. आगामी जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तरी हा दूरावा संपतो का हे पाहाणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मुंबईत कोकणातील आमदारांची बैठक बोलावल्याने शिवसेनेचे तीनही आमदार बैठकीला अनुपस्थित राहिल्याचे सांगण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या आमदारांच्या या बैठकीच्या पार्श्वभूमीवर खरीप आढावा बैठक पुढे ढकलता आली असती. मात्र तसेही झाले नाही. खासदार बारणे या बैठकीला का उपस्थित राहू शकले नाहीत, याचे नेमके कारण समजू शकले नाही. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीत कुरबुरींचे सत्र सुरूच आहे.