सोलापूर : काँग्रेस आणि भाजपसाठी प्रतिष्ठेच्या बनलेल्या सोलापूर राखीव लोकसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वीच दोन्ही पक्षांमध्ये विलक्षण संघर्ष होत असताना दुस-या बाजूला दोन्ही पक्षांचे उमेदवार आणि नेते धार्मिक व अध्यात्मिक क्षेत्रातील जगद्गुरू महास्वामीजी, मठाधिपतींच्या दरबारात धावा करीत आहेत. यामागे आशीर्वादासह विशिष्ट समाजाची मते पदरात पाडून घेण्याचा हेतू दिसून येतो. महास्वामीजींचा खरा आशीर्वाद कोणाला, यावरूनही दावे-प्रतिदावे केले जात असल्याचे हा विषय सोलापूरच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा बनला आहे.

विशिष्ट समाज किंवा सांप्रदायावर पगडा असलेल्या महास्वामीजी, बाबा, महाराजांचा राजकारणात प्रभाव वाढत आहे. त्यांचा आशीर्वाद मिळविताना ज्या त्या समाजाच्या मतांची गणिते जुळविली जातात. मागील २०१९ सालच्या सोलापूर लोकसभा निवडणुकीत तर भाजपने पूर्वी निवडून आलेल्या खासदाराचा पत्ता कापून प्रामुख्याने वीरशैव लिंगायत समाजावर प्रभाव असलेल्या डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामीजी या मठाधिपतीला उमेदवारी देऊन निवडून आणले होते. परंतु खासदार म्हणून डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य हे प्रभाव पाडू शकले नाहीत. म्हणून भाजपने सलग तिस-यांदा सोलापूरची जागा राखण्यासाठी उमेदवार पुन्हा बदलला आहे. परंतु तरीही वीरशैव जगद्गुरूंसह मठाधिपतींपासून ते जैनमुनींचे आशीर्वाद मिळविण्यासाठी भाजपची धडपड सुरूच आहे. यात काँग्रेसही कुठे कमी दिसत नाही.

हेही वाचा : राहुल आणि प्रियांका गांधींमुळे अमेठी आणि रायबरेलीची उमेदवारी अजूनही गुलदस्त्यात; काँग्रेसमधील संभ्रमाचे कारण काय?

काँग्रेसची उमेदवारी मिळण्याअगोदर काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे व त्यांचे वडील सुशीलकुमार शिंदे यांना सर्वप्रथम एका सार्वजनिक कार्यक्रमातून काशीच्या जंगमवाडी पीठाचे जगद्गुरू डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजींचा खुला आशीर्वाद घ्यावा लागला. त्यानंतर आमदार प्रणिती शिंदे यांना काँग्रेसची उमेदवारी जाहीर होताच ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी पुन्हा दुस-यांदा जगद्गुरू डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजींना भेटून आशीर्वाद घेतला. त्यापाठोपाठ भाजपचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनीही काशी जगद्गुरूंची भेट घेऊन आशीर्वाद मागितला. जगद्गुरूंचा खरा आशीर्वाद तर आपल्यालाच आहे, असा दावा करायला सातपुते विसरले नाहीत. त्यानंतर सुशीलकुमार शिंदे यांनी आशीर्वादाचा प्रतिदावा केल्यामुळे काशी जगद्गुरूंचा नेमका आशीर्वाद कोणाला, याची चर्चा राजकीय वर्तुळासह वीरशैव लिंगायत समाजात रंगली असताना सुशीलकुमार शिंदे यांनी मजरेवाडी परिसरात श्री श्री श्री सद्गुरु बसवारुढ महास्वामीजी मठात वीरशैव धर्मगुरू ईश्वरानंद आप्पाजी आणि मठाधिपती शिवपुत्र अप्पाजी यांचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. या मठामध्ये इतर वेळी सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह कर्नाटक राज्यातील अनेक मंत्री येऊन आशीर्वाद घेतात.

हेही वाचा : ठाकरे गटाकडून कल्याण लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार ठरला, ‘या’ महिला नेत्याला दिली संधी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याच पार्श्वभूमीवर भाजपचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी वीरशैव धर्मगुरूंसह जगदूगुरूंचा आशीर्वाद गृहीत धरून अक्कलकोटमध्ये सुरू असलेल्या जैन समाजाच्या श्रीमद्देवाधिदेव १००८ श्री मुनिसुव्रत तीर्थंकर पंचकल्याण प्रतिष्ठा महोत्सवाचे औचित्य साधून जैन सकलकीर्ति भट्टारक महाराजांचे आशीर्वाद घेतले. जगद्गुरू, महास्वामीजी, धर्मगुरूंच्या आशीर्वादासाठी काँग्रेस व भाजपच्या उमेदवारांचा चाललेला आटापिटा हा चर्चेचा विषय ठरला आहे. निवडणुका म्हटले की धर्मगुरू, जगद्गुरू महाराजांचे आशीर्वाद मिळविणे हे राजकीय नेत्यांसाठी तेवढेच महत्वाचे ठरत असताना दुसरीकडे भोंदूबाबांनाही तेवढेच महत्व आले आहे. फसवणूक, महिला भक्तांचे शोषण केल्याच्या आरोपाखाली गुन्ह्यात अडकलेल्या करमाळ्यातील उंदरगावच्या एका वादग्रस्त महाराजांच्या दर्शनासाठी राजकीय नेत्यांची वर्दळ वाढली आहे. काही बड्या नेत्यांनी तर हेलिकाॕप्टरने करमाळ्यात येऊन या महाराजाचा धावा केला. मठामध्ये महाराजांच्या आज्ञेनुसार संबंधित बड्या राजकीय नेत्यांनी पूजाविधी केल्याची माहिती चर्चेत आहे.