Kerala Serial Blast Updates : केरळमधील एर्नाकुलमच्या कलमस्मेरी येथील ख्रिश्चन धर्मीयांच्या ‘झामरा इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर’मध्ये (संमेलन केंद्र) रविवारी (२९ ऑक्टोबर) सकाळी ९ च्या सुमारास लागोपाठ तीन भीषण बॉम्बस्फोट झाले. या स्फोटांत दोन महिलांचा मृत्यू झाला असून, ५१ लोक जखमी झाल्याचे समजते. या बॉम्बस्फोटांनंतर केरळमधील राजकारण तापले आहे. भाजपाने या घटनेचा संबंध इस्रायल – पॅलेस्टाइन संघर्षाशी लावला असून, राज्यातील राजकीय पक्षांनी पॅलेस्टाइनच्या समर्थनार्थ सभा घेतल्यामुळे ही घटना घडली, असा आरोप केला आहे.

केंद्रीय मंत्री व भाजपाचे ज्येष्ठ नेते व्ही. मुरलीधरन यांनी सांगितले की, ख्रिश्चन समुदायाच्या धार्मिक कार्यक्रमात दहशतवादी हल्ला झाला असून, त्याची चौकशी केली जावी. तर, केरळ भाजपा प्रदेशाध्यक्ष के. सुरेंद्रन यांनी सांगितले की, मुख्य प्रवाहातील राजकीय पक्षांनी हमास आणि पॅलेस्टाइन समर्थनार्थ घेतलेल्या भूमिकेमुळे हा हल्ला झाला असावा. तर, आणखी एक केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर म्हणाले की, काँग्रेस आणि सीपीआय (एम) पक्षांनी केलेल्या ध्रुवीकरणाच्या राजकारणाची किंमत सामान्य लोकांना मोजावी लागली आहे.

हे वाचा >> Kerala Bomb Blast प्रकरणात एकाचं आत्मसमर्पण, प्रार्थनास्थळी झालेल्या स्फोटांची जबाबदारी घेतली

भाजपा नेते राजीव चंद्रशेखर यांचा आरोप सीपीआय (एम) पक्षाचे नेते, खासदार जॉन ब्रिटस यांनी खोडून काढला. एक्स (जुने ट्विटर) या सोशल मीडिया साईटवर त्यांनी म्हटलेय की, मार्टिन नावाच्या एका व्यक्तीने आत्मसमर्पण केले. ज्या संस्थेच्या कार्यक्रमात हा स्फोट झाला, त्याच संस्थेचा तो माजी सदस्य आहे. या व्यक्तीला अटक करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे; पण विरोधक ज्या प्रकारे हा विषय उचलून धरत आहेत, ते पाहून मी चकित झालो. केरळची जनता या वेळीही या लोकांना निराश केल्याशिवाय राहणार नाही.

केरळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यहोवाला (यहोवा हा हिब्रू शब्द असून, देवाला यहोवा म्हटले जाते) माननाऱ्या अनुयायांच्या कार्यक्रमात अद्ययावत स्फोटक यंत्रणेद्वारे (आयईडी) बॉम्बस्फोट घडविण्यात आला. राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) आणि राष्ट्रीय सुरक्षा गार्ड (NSG) या केंद्रीय तपास यंत्रणांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

हे वाचा >> यहोवा अनुयायी भारताचे राष्ट्रगीत का गात नाहीत? सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश काय आहेत?

हमासच्या नेत्याचे केरळमध्ये व्हीसीद्वारे भाषण

केरळमध्ये इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्षावरून राजकारण तापले असताना सदर बॉम्बस्फोट झाल्यामुळे आगीत आणखी तेल ओतल्यासारखे झाले आहे. सत्ताधारी सीपीआय (एम)प्रणीत लेफ्ट डेमोक्रॅटिक फ्रंट (LDF) आणि काँग्रेसप्रणीत युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट (UDF) या दोन मुख्य प्रवाहातील राजकीय पक्षांनी एकत्र येऊन पॅलेस्टाइनला समर्थन दिले. इस्रायलने गाझापट्टीवर केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आणि पॅलेस्टाइनला पाठिंबा देण्यासाठी केरळमध्ये जागोजागी मोर्चे काढण्यात आले आणि सभा घेतल्या गेल्या. या दरम्यान ध्रुवीकरणाचे आरोप होऊ नयेत, यासाठी एलडीएफ व यूडीएफ आघाडीने कटाक्षाने प्रयत्न केले आहेत.

शुक्रवारी (२७ ऑक्टोबर) जमात-ए-इस्लामीच्या युवक संघटनेने मलप्पुरम येथे पॅलेस्टाइनच्या समर्थनार्थ एक सभा आयोजित केली होती. या सभेला हमासचा माजी प्रमुख खालेश माशल याचेही भाषण झाले. या भाषणावरून भाजपाने केरळच्या मुख्य राजकीय पक्षांना दोषी धरले आहे. “राज्यातील मुख्य राजकीय पक्षांनी हमासला पाठिंबा दर्शविल्यामुळे हा हल्ला झाला आहे. केरळमधील राजकीय पक्षांनी आयोजित केलेल्या सभांना हमासच्या नेत्यांनी व्हर्च्युअली हजेरी लावली होती. एका सभेत तर हमासच्या नेत्याने भाषणही केले”, अशी प्रतिक्रिया भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सुरेंद्रन यांनी द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना दिली. सुरेंद्रन यांनी आरोप केला की, मुस्लीम समाजाचा पाठिंबा मिळविण्यासाठी आणि केंद्र सरकारने पीएफआय या संघटनेवर बंदी घातल्यामुळे त्याविरोधात जनमत तयार करण्यासाठीच काँग्रेस आणि डावे पक्ष पॅलेस्टाइनच्या समर्थनार्थ सभा घेत आहेत.

ध्रुवीकरणाच्या राजकरणामुळे निष्पाप लोकांचा बळी

केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी ‘एक्स’ (ट्विटर)वर पोस्ट टाकून म्हटले की, काँग्रेस आणि सीपीएप पक्षाकडून केल्या जाणाऱ्या ध्रुवीकरणाच्या राजकारणाची किंमत नेहमीच सर्व समाजांतील निष्पाप नागरिकांना भोगावी लागली आहे. इतिहासातून अनेकदा आपल्याला हे शिकायला मिळाले. ध्रुवीकरणाच्या निर्लज्ज राजकारणाने आता सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. काँग्रेस, सीपीएम, यूपीए, इंडिया आघाडीने आता थेट दहशतवादी हमास संघटनेच्या नेत्यांना आवतण देऊन, त्यांचे द्वेषपूर्ण भाषण आपल्या सभांमधून प्रसारित केले. केरळसाठी त्यांनी जिहाद पुकारला आहे का? या मूर्ख राजकारण्यांनी आता हद्दच केलीय. हे इथेच थांबवायला हवे.

दरम्यान, केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन आणि काँग्रेसच्या नेत्यांनी बॉम्बस्फोटांचा निषेध केला असून, शांततेचे आवाहन केले आहे. तसेच या घटनेची चौकशी होईपर्यंत कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचू नये, असे सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काँग्रेस आणि डाव्यांना भीती

या घटनेच्या निमित्ताने भाजपा केरळमध्ये आपले प्रश्न वाढविण्याचा प्रयत्न करील, अशी भीती काँग्रेस आणि डाव्या विचारसरणीच्या राजकीय पक्षांना वाटते. बॉम्बस्फोटांच्या निमित्ताने हिंदू आणि ख्रिश्चन समुदायातील काही घटकांमध्ये मुस्लीमविरोधी भावना निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो, असे या दोन्ही पक्षांच्या नेत्यांना वाटते. डाव्या विचारसरणीच्या एका नेत्याने सांगितले की, भाजपाने ख्रिश्चनांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत; ज्याचा काही भागांत प्रभाव दिसून आलेला आहे. मणिपूरमधील हिंसाचारामुळे या प्रयत्नांना खीळ बसली होती; मात्र आता या बॉम्बस्फोटांनंतर भाजपाकडून पुन्हा असे प्रयत्न होताना दिसतील.