Mallikarjun Kharge काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी छत्तीसगडमधील आपल्या भाषणात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची नावे चुकीच्या पद्धतीने उच्चारल्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. भाजपाने त्यांच्यावर राष्ट्रपतींचा अपमान केल्याचा आरोप केल्याने मल्लिकार्जुन खरगे वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. सोमवारी रायपूरमधील सायन्स ग्राउंड येथे झालेल्या एका मेळाव्यात बोलताना खरगे यांनी द्रौपदी मुर्मू यांचे नाव ‘मुर्मा जी’ असे संबोधले. मात्र, लगेचच चूक दुरुस्त करत त्यांनी ‘मुर्मु’ असे म्हटले. परंतु, काही क्षणातच त्यांनी माजी राष्ट्रपती कोविंद यांना ‘कोविड’ असे संबोधले, त्यामुळे यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या.

रायपूरच्या भाषणादरम्यान नक्की काय घडले?

रायपूरच्या भाषणादरम्यान छत्तीसगडमधील जंगलांमध्ये मोठ्या प्रमाणात झाडे तोडल्याबद्दल मल्लिकार्जुन खरगे यांनी चिंता व्यक्त केली. त्यावेळी त्यांनी आपल्या भाषणात राष्ट्रपतींच्या नावाचा चुकीचा उल्लेख केला. त्यांच्या भाषणात त्यांनी भाजपा त्यांच्या उद्योगपती मित्रांबरोबर मिळून आदिवासींच्या जमिनी बळकावत असल्याचा आणि नैसर्गिक संसाधनांचा नाश करण्यात गुंतला असल्याचा आरोप केला.

रायपूरच्या भाषणादरम्यान छत्तीसगडमधील जंगलांमध्ये मोठ्या प्रमाणात झाडे तोडल्याबद्दल मल्लिकार्जुन खरगे यांनी चिंता व्यक्त केली. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

“आपले जल, जंगल आणि जमीन यांचे संरक्षण करणे आवश्यक आहे आणि म्हणूनच आपल्याला एकत्र येण्याची आवश्यकता आहे. ते (भाजपा) म्हणतात की, आम्ही मुर्माला (द्रौपदी मुर्मू) राष्ट्रपती, कोविड (रामनाथ कोविंद) यांना राष्ट्रपती केले, पण का? आमची संसाधने चोरण्यासाठी. आमचे जंगल, जल आणि जमीन यावर आज अदानी आणि अंबानीसारखे लोक कब्जा करत आहेत,” असे खरगे पुढे म्हणाले.

राष्ट्रपती आणि माजी राष्ट्रपतींचा अपमान केल्याचा भाजपाचा आरोप

मल्लिकार्जुन खरगे यांच्या भाषणानंतर भाजपाने खरगेंवर जोरदार टीका केली आणि त्यांच्यावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा आक्षेपार्ह शब्द वापरून अपमान केल्याचा आरोप केला. भाजपाने यासंबंधित खरगे यांच्याकडून आणि काँग्रेसकडून जाहीर माफी मागावी अशी मागणी केली. मंगळवारी पत्रकार परिषदेत भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते गौरव भाटिया यांनी आरोप केला की, खरगे यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूजी आणि माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंदजी यांच्याबद्दल आक्षेपार्ह शब्द वापरले. यावरून काँग्रेसच्या डीएनएमध्ये असलेल्या दलितविरोधी, आदिवासीविरोधी आणि संविधानविरोधी मानसिकतेचे दर्शन घडते, असेही भाटिया म्हणाले.

ते पुढे म्हणाले, “तुम्ही मोठ्या गोष्टी बोलता आणि नंतर तुम्ही रामनाथ कोविंदजी यांना ‘कोविड’ म्हणता आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना ‘मुरमाजी’ म्हणता आणि नंतर त्यांना भू-माफिया म्हणता, त्यांच्यावर आरोप करता की त्या मालमत्ता, जंगले हिसकावून घेण्यासाठी राष्ट्रपती झाल्या आहेत,” असे गौरव भाटिया म्हणाले.

भाजपाकडून माफीची मागणी

मल्लिकार्जुन खरगे यांनी मुर्मू आणि कोविंद यांच्याविरुद्ध केलेल्या अपमानजनक वक्तव्याबद्दल माफी मागावी अशी मागणी भाटिया यांनी केली आहे. भाटिया यांनी आरोप केला की, काँग्रेस अध्यक्षांनी केवळ त्यांचाच अपमान केला नाही तर आदिवासी आणि दलित समुदायाच्या सदस्यांच्याही भावना दुखावल्या आहेत. खरगे यांच्या वक्तव्याबद्दल काँग्रेसने जाहीर माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली आहे आणि मल्लिकार्जुन खरगे यांना पक्षाध्यक्षपदावरून राजीनामा देण्यास सांगावे, अशी मागणी काँग्रेस कार्यकर्त्यांकडे केली.

भाटिया म्हणाले, “जर काँग्रेस आणि मल्लिकार्जुन खरगे यांनी माफी मागितली नाही, तर देशातील प्रत्येक नागरिक तुम्हाला आपला संताप व्यक्त करताना दिसेल, ही चूक काँग्रेसला महागात पडेल,” असे ते पुढे म्हणाले. त्यांनी खरगे यांना काँग्रेसचे ‘रिमोट-कंट्रोल्ड’ राष्ट्रीय अध्यक्ष म्हटले आणि आरोप केला की, त्यांनी पक्षाचे नेते राहुल गांधी यांच्या इशाऱ्यावर आक्षेपार्ह विधान केले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मल्लिकार्जुन खरगे यांची नितीश सरकारविरोधी पोस्ट चर्चेत

मल्लिकार्जुन खरगे यांनी आज ‘एक्स’वर लिहिलेल्या एका पोस्टचीदेखील चर्चा होत आहे. बिहारमधील जनता दल (यूनाइटेड) आणि भारतीय जनता पार्टी (बीजेपी)या दोन्ही पक्षांच्या ‘ठगबंधन’ने राज्याला देशाची ‘गुन्हेगारी राजधानी’ केले असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. अलिकडेच, पाटण्यातील व्यापारी गोपाल खेमका यांच्या हत्येबरोबरच, बिहारच्या इतर काही जिल्ह्यांमध्येही गुन्हेगारीच्या अनेक घटना घडल्या आहेत. मल्लिकार्जुन खरगे यांनी ‘एक्स’ वर म्हटले, “संधीसाधू डबल इंजिन सरकारने बिहारमधील कायदा आणि सुव्यवस्था नष्ट केली आहे. गेल्या सहा महिन्यांत आठ व्यावसायिकांची हत्या झाली आहे आणि पोलिसांना पाच वेळा मारहाण करण्यात आली आहे.” सोमवारीच अंधश्रद्धेमुळे एकाच कुटुंबातील पाच जणांची हत्या करण्यात आली. निष्पाप मुलांनाही सोडण्यात आले नाही, असेही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले.