सांगली :  दिवेलागणीचा वकुत झाला तर गावच्या पारावरच्या गप्पा संपता संपना झाल्त्या. तशातच नानातात्याची चुळबुळ सुरू हुती. कधी एकदा निवडणुकीच मैदान रंगात येतया अन् सांजच्या ढाब्यावरच्या दोन रोटय़ा अन् चिकनच्या वासाच खळगुट पुढय़ात येतया अस झालं होतं. कमळ मैदानात असल तर जोडीदार ठरना झालाय यातूनच राच्च ढाब्यावरच जेवान आणि मिळणारी अर्धीमुर्धी देशी कुठं दिसना झाली हुती. घरात रोजच भाकरी कोरडय़ास खाउन कटाळलेल्या नाना तात्याची चुळबुळ त्यामुळच चाल्ली हुती. रिंगणात कमळ आणि मशाल  उतरली होती. मात्र काटाजोड व्हायला आणि मैदानात रंगत आणाया पंजा आणि कमळच हवंच असा सूर हुता. अशातच धाकटा बाळय़ा पारावर आला. अगा नाना, आई कवापासनं बोलावत्या, जेवायचं हाय का न्हाय इंचारलं?  काय सांगू? नाना तात्या भानावर आला. घरचं सोडून कस चालायचं? चला आजचा दिस तर घरच कोरडय़ास गोड मानून घ्या, नाही तर गावात बोर्ड लागायचा उमेदवारीसाठी ‘नाना तात्याचं पारावर उपोषण’

मनसेत कोणाचे भले होणार? 

मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्यापासून मनसे महायुतीत सामील होणार का, याची चर्चा सुरू झाली. पण ही भेट होऊन तीन आठवडे उलटले तरी महायुती आणि मनसेच्या संबंधांबाबत काहीच स्पष्टता दिसत नाही. यामुळेच मनसेच्या वार्षिक गुढीपाडवा मेळाव्याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. राज ठाकरे कोणती भूमिका मांडतात आणि मनसे आगामी लोकसभा लढणार का, याबाबत स्पष्टता येऊ शकेल. मनसेला लोकसभेची जागा मिळणार याची कुजबुज सुरू होताच पक्षातील इच्छुकांच्या आशा पल्लवित झाल्या. बाळा नांदगावकर यांचे नाव चर्चेत आहेच. पण त्याचबरोबर शालिनी ठाकरे यांना वायव्य मुंबईतून लढण्याचे वेध लागले. त्यांनी तशी इच्छा राज ठाकरे यांच्याकडे व्यक्त केल्याचे समजते. आता नेतेमंडळींना लोकसभा वा विधानसभेचे वेधे लागले असले तरी राज ठाकरे कोणती भूमिका घेतात की फक्त अमित ठाकरे यांचेच भले होते यावर पक्षात खल सुरू झाला आहे.

हेही वाचा >>>कसे झाले वेणुगोपाल काँग्रेसमधील सत्ताकेंद्र? काँग्रेस नेत्यांच्या आऊटगोइंगला का ठरताहेत कारणीभूत?

यशवंतराव चव्हाणांचा पुतळा आणि भुजबळ 

सर्वोच्च न्यायालयाने शरद पवार यांचे छायाचित्र वापरण्यास केलेला प्रतिबंध आणि खुद्द शरद पवार यांनी घेतलेल्या आक्षेपानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून शरद पवार यांचे राजकीय गुरू महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेचा वापर कार्यक्रमांमध्ये करण्यात येत आहे. नाशिकमधून उमेदवार म्हणून छगन भुजबळ यांच्या नावाची चर्चा जोरात असतानाच मुंबईतील अजित पवार गटाच्या कार्यालयासाठी निर्मिलेला यशवंतरावांचा पूर्णाकृती पुतळा भुजबळ यांच्या नाशिक येथील भुजबळ फार्म कार्यालयात ठेवण्यात येणे, हा निश्चितच योगायोग नसल्याचे म्हटले जात आहे. यशवंतराव चव्हाण यांचे नाशिकशी ऋणानुबंध होते. देशाच्या संरक्षणमंत्रिपदी नियुक्ती झाल्यानंतर नाशिक लोकसभा मतदारसंघातून त्यांना बिनविरोध दिल्लीला पाठविण्यात आले होते. याच मतदारसंघात आता अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मैदानात उतरविण्याची तयारी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी केली आहे. भुजबळ यांची ओबीसी नेते ही प्रतिमा तयार झाली आहे. नाशिकची जागा शिवसेनेची (शिंदे गट) असल्याने महायुतीत कुरघोडीचे राजकारण सुरू आहे. महायुतीत नाशिकमध्ये कोण उमेदवार राहणार, हा कळीचा प्रश्न झाला असताना शाहू-फुले-आंबेडकर यांचा सतत जयघोष करणाऱ्या भुजबळ यांच्या कार्यालयात दाखल झालेला यशवंतरावांचा पुतळा सर्वाचे लक्ष वेधून घेत आहे.

(संकलन : अनिकेत साठे, संजय बापट, दिगंबर शिंदे)