Who is Sudhakar Badgujar : राजकारणात कधी काय होईल याचा अंदाज बांधणं तसं कठीणच असतं. राज्यात सध्या अशीच काहीसी परिस्थिती पाहायला मिळत आहे. डिसेंबर २०२३ मध्ये भाजपाने शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नाशिक शहरप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्यावर दाऊद इब्राहिमच्या टोळीशी कथित संबंध असल्याच्या आरोप केला होता. मात्र, आता बडगुजर हे थेट भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. शिवसेना ठाकरे गटाने आधीच पत्रकारपरिषद घेऊन बडगुजर यांची हकालपट्टी केली आहे. दुसरीकडे, बडगुजर यांच्या संभाव्य पक्षप्रवेशाच्या चर्चेने भाजपाच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्येही नाराजीचं वातावरण निर्माण झालं आहे.

आगामी काळात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहे. नाशिक महानगरपालिका ताब्यात घेण्यासाठी भाजपा आतापासूनच मोर्चेबांधणी करीत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते व नाशिकचे शहरप्रमुख सुधाकर बडगुजर हे लवकरच भाजपाचे कमळ हाती घेणार असे तर्कवितर्क लावले जात आहेत. महापालिका क्षेत्रात पक्षाला बळकटी मिळण्यासाठी भाजपाने हा धोरणात्मक डाव खेळल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाला भाजपाच्या तळागाळातील कार्यकर्त्यांकडून जोरदार विरोध होत असल्याचं दिसून येत आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांच्याबरोबर चर्चा करताना सुधाकर बडगुजर (फोटो सौजन्य पीटीआय)
शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबरोबर चर्चा करताना सुधाकर बडगुजर (फोटो सौजन्य पीटीआय)

कोण आहेत सुधाकर बडगुजर?

  • ५५ वर्षीय सुधाकर बडगुजर यांनी त्यांच्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात अपक्ष म्हणून केली होती.
  • २००७ मध्ये नाशिक महानगरपालिकेत अपक्ष नगसेवक म्हणून निवडून आल्यानंतर त्यांनी एकसंध शिवसेनेत प्रवेश केला.
  • त्यावेळी शिवसेनेचे नगरसेवक विनायक पांडे हे अपक्षांच्या मदतीने नाशिकचे महापौर झाले होते.
  • २००९ ते २०१२ या कालावधीत बडगुजर यांनी नाशिक महापालिकेत सभागृह नेते म्हणून काम पाहिले.
  • २०१२ ते २०१५ दरम्यान मनसेने नाशिक महापालिकेची सत्ता मिळविल्यानंतर बडगुजर यांनी विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी पार पाडली.

आणखी वाचा : खासदार महुआ मोईत्रा यांनी गुपचुप केलं लग्न; चारवेळा खासदार राहिलेले पती पिनाकी मिश्रा आहेत तरी कोण?

  • सुधाकर बडगुजर यांनी नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून दोन वेळा निवडणूक लढवली. मात्र, २०१४ व २०२४ मध्ये दोन्हीवेळा त्यांचा भाजपाच्या उमेदवार सीमा हिरे यांनी पराभव केला.
  • विधानसभा निवडणुकीत अपयश आले असले तरी, बडगुजर यांनी स्थानिक राजकारणात आपले वर्चस्व कायम ठेवले. गेल्या १५ वर्षांहून अधिक काळ ते नगरसेवक म्हणून सक्रिय राहिले आहेत.
  • यशस्वी कंत्राटदार म्हणूनही बडगुजर यांची ओळख आहे. त्यांच्यापाठीमागे कार्यकर्त्यांचे मोठे पाठबळ असल्याचं सांगितलं जातं.
  • एकसंध शिवसेना दुभंगल्यानंतर बडगुजर हे उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहिले. ते शिवसेना खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय मानले जातात.

भाजपाने बडगुजर यांच्यावर काय आरोप केले होते?

डिसेंबर २०२३ मध्ये भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी पत्रकारपरिषद घेत सुधाकर बडगुजर यांच्यावर गंभीर आरोप केले होते. १९९३ मधील मुंबई स्फोट प्रकरणातील दोषी आणि दाऊद इब्राहिमचा जवळचा साथीदार सलीम कुत्ता यांच्याशी बडगुजर यांचे संबंध असल्याचा दावा राणे यांनी केला होता. इतकंच नाही तर, बडगुजर यांनी सलीम कुत्ताला त्यांच्या नाशिकमधील फार्महाउसवर आश्रय देण्याचे काम केले होते, असंही नितेश राणे म्हणाले होते. दरम्यान, या आरोपानंतर नाशिक पोलिसांनी बडगुजर यांच्याविरोधात ‘अनधिकृत कृत्य प्रतिबंधक कायदा’ (UAPA) अंतर्गत गुन्हा दाखल केला आणि या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एसआयटीची स्थापना केली. त्यानंतर बडगुजर यांच्यावर तडीपारीची कारवाईही करण्यात आली, ज्याविरोधात त्यांनी न्यायालयात दाद मागितली.

बडगुजर यांच्या मुलाविरोधात ‘मकोका’ अंतर्गत गुन्हा

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तर्फे विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळाल्यानंतर बडगुजर पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडले. त्यांचे पुत्र दीपक बडगुजर यांच्यावर २०२१ मध्ये झालेल्या एका हत्येप्रकरणी‘महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम’ (MCOCA) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर सुधाकर बडगुजर हे विधानसभा निवडणुकीत पराभूत झाले. राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेत आल्यापासून बडगुजर यांनी ठाकरे गटापासून काहीसा दुरावा ठेवला होता.

भाजपाने नाशिकमधील राजकीय घडामोडींची सूत्रं मुख्यमंत्री फडणवीसांचे निकटवर्तीय मंत्री गिरीश महाजन यांच्या हाती दिल्यानंतर बडगुजर हे त्यांच्या संपर्कात आल्याचे सांगितले जाते. सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नाशिकच्या दौऱ्यावर आले असताना बडगुजर यांनी त्यांची भेट घेतल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या. नाशिक महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या समस्या मांडण्यासाठी आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याचं बडगुजर यांनी माध्यमांना सांगितलं होतं. मात्र, या भेटीचे राजकीय पडसाद उमटले आणि अवघ्या २४ तासांत शिवसेनेने (ठाकरे गट) त्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे.

भाजपाला सुधाकर बडगुजर का हवेहवेसे?

भाजपाने आपले संपूर्ण लक्ष सध्या महापालिका निवडणुकांवर केंद्रित केलं आहे. नाशिक महापालिकेवर पुन्हा पक्षाचा झेंडा फडकविण्याचे भाजपाचे प्रयत्न आहे. २०१७ मध्ये भाजपाने दमदार कामगिरी करीत नाशिक महापालिकेवर सत्ता मिळवली होती. सुधाकर बडगुजर हे राज्यस्तरावरील मोठ्या नेत्यांमध्ये गणले जात नसले तरी ते नाशिकच्या स्थानिक राजकारणात चाणाक्ष आणि प्रभावशाली नेता मानले जातात. त्यांचे आर्थिक बळ आणि स्थानिक राजकीय यंत्रणेवर असलेले मजबूत पकड ही भाजपासाठी फायदेशीर ठरू शकते. हीच बाब लक्षात घेता त्यांना पक्षात सामील करून घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असं भाजपाच्या एका अंतर्गत सूत्रांने इंडियन एक्स्प्रेसला सांगितले.

हेही वाचा : महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ७ लाख मतदार राहणार मतदानापासून वंचित; कारण काय?

भाजपा कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर?

सुधाकर बडगुजर यांच्या संभाव्य भाजपा प्रवेशामुळे स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. नाशिक पश्चिमच्या भाजपा आमदार सीमा हिरे यांनीही बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाला विरोध केल्याचं सांगितलं जात आहे. “बडगुजर हे भाजपामध्ये प्रवेश करणार, यासंदर्भात कोणतीही अधिकृत चर्चा झाली नाही. मी दोनदा त्यांच्या विरोधात निवडणूक लढवली आहे. त्यांनी आमच्या कार्यकर्त्यांना त्रास दिला आणि आमच्या नेत्यांविषयी आक्षेपार्ह वक्तव्ये केली आहेत. आम्ही वरिष्ठ नेतृत्वाला सांगितले आहे की, अशा व्यक्तीला पक्षात घेऊ नये,” असं आमदार हिरे यांनी म्हटलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मंत्री गिरीष महाजन काय म्हणाले?

स्थानिक पातळीवरील या तीव्र विरोधाच्या पार्श्वभूमीवरही भाजपाचे नेते व्यापक राजकीय फायदे लक्षात घेऊन या मुद्द्यावर विचार करीत आहेत. दरम्यान, बडगुजर यांच्या संभाव्य पक्षप्रवेशावर प्रतिक्रिया देताना मंत्री गिरीष महाजन म्हणाले, “प्रत्येक पक्ष आपला विस्तार करण्याचा प्रयत्न करत असतो. आम्हीही त्याच दृष्टीने काम करीत आहोत. मात्र, अद्याप कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही.” दुसरीकडे, सुधाकर बडगुजर यांनीही भाजपात प्रवेश करण्याबाबत कोणतेही भाष्य केलेले नाही. मी सध्या वाट पाहत असून लवकरच माझ्या राजकीय भवितव्याबाबत निर्णय घेईल, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.