सांगली : भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी जतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांच्यावर टीका करताना केलेल्या वक्तव्याचा जिल्ह्यात आणि राज्यात सार्वत्रिक टीका होत आहे. सोमवारी काढण्यात आलेल्या महाराष्ट्र संस्कृती बचाव मोर्चामध्ये राज्यभरातून आमदार खासदारांनी उपस्थिती दर्शवत पडळकर यांच्यावर टीकेचे झोड उठवत असताना पडळकर यांचा बोलावता धनी म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच जबाबदार धरले.

देवा, वाचाळवीरांना आवर आणि अंबारी सावर हा सावधानतेचा इशारा या निषेध आंदोलनातून देण्यात आला. आता आमदार पडळकर एवढ्यावरचथांबतील असे सध्या तरी वाटत नाही, कारण नजीकच्या काळात जिल्हा परिषदेच्या निवडणुका असून त्यावेळी जनतेसमोर जाताना याचे उत्तर त्यांना द्यावे लागणार आहे. मात्र, एवढं खरं आहे की राजकारणातील संवादाचा स्तर खालची पातळी गाठून दहा वर्षे उलटल्यानंतर तो उंचावण्याऐवजी मातीत मिसळला आहे.

प्रकरण होते ते जत पंचायत समितीमधील एका तरूण अभियंत्याच्या संशयास्पद मृत्यूचे. अवधूत वडर या अभियंताचा मृतदेह सांगलीतील कृष्णा नदीत आढळला. त्यांने आत्महत्या केली की घातपात झाला असा सवाल उपस्थित केला जात आहे. पाण्यात बुडून मृत्यू म्हटले तर त्याला पोहता येत होते. मृत्यू होण्यापुर्वी त्याच्या आईने पंचायत समितीमध्ये जाउन मुलाला त्रास देउ नका यासाठी आर्जवे केली होती. त्याच्यावर काही लोकांचा बेकायदेशीर कामासाठी दबाव असल्याचा आरोपही आईने केला आहे. यामुळेच त्याच्या मृत्यूची चौकशी करावी यासाठी काही जणांची नावेही घेतली जात असून यामध्ये आमदार पडळकर यांच्या निकटच्या व्यक्तींचा समावेश आहे.

पडळकर यांचे नाव यामध्ये नसले तरी त्यांनी बदनामीचा निषेध करण्यासाठी मोर्चा काढला. वास्तविकता सरकार त्यांच्या पक्षाचेच आहे, मग रस्त्यावर उतरण्याची घाई कशासाठी असा सवालही उपस्थित होत आहे. ज्याला करच नाही तर डर असण्याचा प्रश्‍नच उद्भवत नाही. मात्र, चौकशीलाच विरोध कशासाठी हा साधा प्रश्‍न आहे. तरीही मोर्चा काढण्याचा लोकशाही हक्क मान्य. मात्र, यावेळी आमदार जयंत पाटील यांच्या आईच्या मातृत्वावरच शंका घेण्याचे काहीच कारण नव्हते. या वक्तव्याचा सार्वत्रिक विरोध समाज माध्यमापासून ते राजकीय पातळीवर होत असताना जिल्ह्यातील भाजप नेते मात्र शांत आहे.

या घटनेच्या निषेधार्थ राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाच्या पुढाकाराने सोमवारी सांगलीत मोर्चा काढण्यात आला. या वेळी राज्य पातळीवरील पक्षाचे आमदार, खासदार यांनी निषेध सभेत बोलताना या वाचाळवीरांचा बोलावता धनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच असल्याचा आरोप केला. तसेच मातृत्वाचा अवमान होत असताना दोन्ही उपमुख्यमंत्री निषेधासाठी पुढे येत नाहीत म्हणजे त्यांचे या वक्तव्याला समर्थन आहे का अशी शंकाही उपस्थित केली. एकीकडे सतत पडणार्‍या पावसाने शेतकरी हवालदिल झाला आहे. खरीपातील काढणीला आलेली पिके पाण्यात गेली आहेत. सालबिजमी कशी करायची या चिंतेने शेतकरी अस्वस्थ आहे. तरूणांच्या हाताला काम नाही, तो दिशाहिन बनत चालला आहे. चाकरी नाही तर छोकरी नाही अशी तरूणांची अवस्था आहे. अशा स्थितीत एखादे वादग्रस्त विधान चर्चेचा केंद्र बनते आणि मूळ प्रश्‍नापासून समाजही दूर जातो. हेच गणित यामागे आहे का अशी शंका यावेळी व्यक्त केली. राजकारणात एकेकाळी वापरली जाणारी भाषा ही तिरकस टीकेची, टोकदार असायची.

आता भाषणात शिव्यांचा भरणा पाहण्यास मिळतो आहे. ही शिवराळ भाषा वापरण्याची सांगली जिल्ह्याची संस्कृती कधी नव्हतीच. अगदी खुजगाव की चांदोली यावरून चांदोली धरणाबाबत वसंतदादा-राजारामबापू यांच्यात वाद रंगला होता. काही अंशी आजही दादा बापू वाद दुसर्‍या, तिसर्‍या पिढीत चालत आला आहे. मात्र, तो केवळ राजकीय पातळीवरच आहे.

वैयक्तिक पातळीवर उणीदुणी काढण्यापर्यंत खालच्या पातळीवर कधी गेल्याचे दिसले नाही. जिल्ह्यात अनेक योजना निधी अभावी रखडल्या आहेत. त्याला मार्गी लावण्याबाबत कुठेही चर्चा होत नाही. पालकमंत्री चंद्रकांत पाटील आठवड्यातून एकदा, दोनदा सांगलीत येतात. मात्र, जलजीवन योजनेची कामे का रखडली याची वासपूस करत नाहीत. तर केवळ निवडणूक एके निवडणूक हेच ध्येय घेउन पक्ष प्रवेश, कार्यकर्त्यांच्या घरी सदिच्छा भेट यावरच दौर्‍याचा जास्त वेळ खर्ची पडत आहे. त्यांनाही आमदार पडळकर यांच्या वक्तव्याचे काहीच वाटत नसेल का हीच भाजपची शिस्त म्हणायची का हे निष्ठावानांनी विचारण्याची गरज आहे.