कोल्हापूर : पुणे पदवीधर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीला अद्याप सव्वा वर्षाचा अवधी असला तरी महायुती अंतर्गत उमेदवारीची स्पर्धा तीव्र झाली आहे. या मतदारसंघाचे विद्यमान आमदार अरुण लाड यांचे सुपुत्र शरद लाड यांना उमेदवारी मिळणार असल्याचे सुतोवाच उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. तर हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसकडे असल्याचा दावा कायम ठेवत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी येथे आपले निकटचे सहकारी प्रताप उर्फ भय्या माने यांना उमेदवारी मिळणार असल्याचा दावा केला आहे.

इतकेच नव्हे तर शरद लाड यांना उमेदवारी दिली तर ते पराभूत कसे होईल याचे याची कुंडलीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मांडणार असल्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे महायुती अंतर्गत शिक्षणाचे धडे देणाऱ्या मंत्र्यांच्या राजकीय शिक्षणाचा अर्थ सामान्यांना गोंधळात टाकणारा ठरू लागला आहे.

पुणे पदवीधर व शिक्षक या दोन्ही विधान परिषद निवडणुका पुढील वर्षीच्या अखेरीस होणार आहेत. मात्र या दोन्ही मतदारसंघातील उमेदवारीवरून महायुती अंतर्गत स्पर्धा आतापासूनच रंग धरू लागली आहे. या मतदारसंघात जनता दलाचे शरद पाटील हे आमदार झाले होते. त्यानंतर चंद्रकांत पाटील हे सलग दोनदा निवडून आले. गेल्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार, कुंडलच्या क्रांती सहकारी साखर कारखान्याचे अरुण लाड यांनी भाजपचा पराभव करीत विजय मिळवला होता.

आता या निवडणुकीचे पडघम वाजू लागले असताना काही महत्त्वाचे राजकीय बदल घडले आहेत. समाजवादी विचारांचे अरुण लाड यांचे पुत्र शरद लाड यांनी भाजपात प्रवेश केला आहे. त्यांच्या प्रवेशाच्या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना पदवीधर मतदारसंघाची उमेदवारी देण्याचे शब्द दिला असल्याचा दावा केला जातो. याच आधारे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगली येथे एका कार्यक्रमात पदवीधर मतदारसंघाचे संभाव्य उमेदवार शरद लाड असा उल्लेख केल्याने तेच भाजपचे उमेदवार असणार अशी अटकळ बांधली जात आहे.

त्यावरून भाजप – राष्ट्रवादी असा महायुतीमध्ये दुभंग निर्माण झाला आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी या मतदारसंघाची उमेदवारी आपले उजवे हात असलेले सहकारी, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भय्या माने यांना मिळण्यासाठी गेल्या सहा महिन्यापासून कंबर कसली आहे. इतकेच नव्हे तर प्रताप माने नावाचा अश्वमेध मैदानात सोडला आहे, अशी रणदुंदुभी घोषणाही त्यांनी करून टाकली आहे.

मुश्रीफ यांनी माने यांची उमेदवारीसाठी तरफदारी चालवली असताना मध्येच चंद्रकांत पाटील यांनी शरद लाड यांच्या उमेदवारीचे संकेत दिल्याने महायुतीमध्ये मिठाचा खडा पडला आहे.

त्यावरून मंत्री मुश्रीफ यांचा तिळपापड झाला आहे. हसन मुश्रीफ यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांना पुणे पदवीधर संघाची उमेदवारी देण्याचा अधिकार कोणी दिला. हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. अरुण लाड यांनी पुढील निवडणुकी वेळी प्रताप माने यांना उमेदवारी देण्यात येईल असा शब्द दिला होता. यात बदल होऊन भाजपने शरद लाड यांना उमेदवारी दिली तर ते कसे पराभूत होतील याचे गणित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मांडू, असा खरमरीत इशारा दिला.

शरद लाड यांना उमेदवारी दिली तर ती कशी गोत्यात येईल याची समीकरणे मुश्रीफ यांनी मांडायला सुरुवात केली आहे. त्यावर अरुण लाड यांनी हसन यांना नेमका काय शब्द दिला होता याची कल्पना नाही असा उल्लेख करीत चंद्रकांत पाटील यांनी शरद लाड यांचा भाजप प्रवेश, देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेला संवाद या आधारे आपण विधान केले आहे. त्यावरून हसन मुश्रीफ यांना मिरच्या झोंबण्याचे कारण नाही, असे म्हणत फटकारले आहे. एकूणच या निवडणुकीला अद्याप सव्वा वर्षाचा अवधी असतानाच भाजपचे चंद्रकांत पाटील – अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे हसन मुश्रीफ या दोन बलाढ्य मंत्र्यातील दावेदारी वाढत चालल्याने महायुतीतील उमेदवारीच्या गुंता वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.