गेल्या काही दिवसांपासून बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्यातील संबंध कमालीचे ताणले गेल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, “बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मला पुन्हा त्यांच्याबरोबर काम करण्याची ऑफर दिली होती. मात्र, मी ती ऑफर धुडकावून लावली”, असा गौप्यस्फोट प्रशांत किशोर यांनी केला आहे.

हेही वाचा – मिशन 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाची तगडी रणनीती

‘जनसुराज्य’ यात्रेच्या तिसऱ्या दिवशी जमुनिया येथे बोलताना, नितीश कुमार यांनी पुन्हा त्यांच्या बरोबर काम करण्याची ऑफर दिल्याचा दावा प्रशांत किशोर यांनी केला आहे. “२०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर नितीश कुमार यांनी माझी मदत मागितली होती. त्यानंतर आता १० ते १५ दिवसांपूर्वी नितीश कुमार यांनी मला भेटायला बोलावले होते. यावेळी त्यांनी मला पुन्हा त्यांच्या बरोबर काम करण्याची विनंती केली होती. मात्र, मी त्यांना स्पष्ट शब्दात नकार दिला. मी फक्त माझ्या ३५०० किमीच्या ‘जनसुराज्य’ यात्रेवर लक्ष केंद्रीत करत आहे”, अशी प्रतिक्रिया प्रशांत किशोर यांनी दिली.

यावेळी जेडीयूने केलेल्या ‘जनसुराज्य’ यात्रेसाठी लागणाऱ्या पैसांसंदर्भातील टीकेलाही उत्तर दिले. “मी ज्यांच्याबरोबर आजपर्यंत काम केलं, त्यांना मी माझ्या यात्रेसाठी पैसे मागितलेले नाही. मी गेल्या १० वर्षांपासून माझ्या मेहनतीने जो पैसा कमावला, त्यातून हा खर्च करतो आहे. मी दलाली करून पैसे कमवत नाही”, असे ते म्हणाले.

हेही वाचा – निवडणूक काळात लोकप्रिय घोषणांच्या पूर्ततेच्या खर्चाचा प्रारूप तपशीलही राजकीय पक्षांना सादर करावा लागणार?

दरम्यान, प्रशांत किशोर आणि नितीश कुमार यांच्या भेटीनंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. दोघांकडूनही याबाबत स्पष्टपणे कोणीही बोललेलं नाही. या दोघांच्या भेटीच्या वेळेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत. ‘जनसुराज्य’ यात्रेनंतर प्रशांत किशोर हे राजकीय पक्षाची घोषणा करणार आहे. तर नितीशकुमार यांची राष्ट्रीय राजकारणात जाण्याच्या तयारीत आहेत.