नवी दिल्ली : लोकसभेमध्ये ऑपरेशन सिंदूरवर मंगळवारी जोरदार चर्चा झाली, त्यात सभागृहातील सदस्य वाट पाहत होते ते दोन भाषणांची. विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि त्यानंतर बोलणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी. चर्चा दोघांच्याही भाषणाची झाली असली तरी, राहुल गांधींनी चर्चेतून केंद्र सरकारची कोंडी करण्यासाठी मुद्दे आणि वेळही साधल्याचे सूर संसदेच्या आवारात उमटले.
गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत आता विरोधक परराष्ट्र संबंधांवर तितक्याच गांभीर्याने विषयाची मांडणी करताना दिसले. राहुल गांधींसह, प्रियंका गांधी, अखिलेश यादव, अरविंद सावंत, सायोनी घोष या ‘इंडिया’ आघाडीतील खासदारांनी विचारलेल्या अचूक प्रश्नांची उत्तरे ना अमित शहांनी दिली ना मोदींनी, अशी भावनाही व्यक्त होत होती.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी ‘ऑपरेशन महादेव’ची माहिती सभागृहाला देऊन ‘ऑपरेशन सिंदूर’मधील एकप्रकारे हवाच काढून घेतली होती. सोमवारी अनेक विरोधी पक्ष सदस्यांनी पहलगाममधील दहशतवाद्यांच्या मुसक्या कधी बांधणार असा प्रश्न विचारला होता, त्यांना शहांनी निरुत्तर केल्यामुळे हा मुद्दा निकालात निघाला. असे असले तरी प्रामुख्याने राहुल गांधींनी परराष्ट्र धोरणावर मोदींना लक्ष्य केल्यामुळे पंतप्रधान काय बोलणार याची उत्सुकता निर्माण झाली होती. राहुल गांधींच्या भाषणानंतर मोदी लगेच बोलणार नाहीत असे मानले जात होते पण, भाजपच्या दोन सदस्यांच्या छोटेखानी भाषणानंतर मोदींनी सुमारे दोन तास भाषण केले. या संपूर्ण भाषणामध्ये मोदींनी राहुल गांधींच्या एकाही प्रश्नाचे उत्तर दिले नाही, इतकेच नव्हे तर आव्हान स्वीकारले नाही. हे पाहिले तर राहुल गांधींचे भाषण ‘इंडिया’ आघाडीच्या वतीने झालेले अत्यंत अग्रेसर आणि मुद्देसूद ठरले असे मानले जात आहे.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते या नात्याने राहुल गांधींनी आधीच्या भाषणांमधील चूक सुधारल्याची चर्चा होत होती. राहुल गांधींनी मुख्यत्वे इंग्रजीतून भाषण केले, मध्ये मध्ये महत्त्वाचे मुद्दे हिंदीतून समजावून सांगितले. राहुल गांधी इंग्रजीत अस्खलित बोलत असल्यामुळे मुद्द्यांचा ठोसपणा व अचूकपणाही भाषणामध्ये दिसला. राहुल गांधींनी ‘ऑपरेशन सिंदूर’वर बोलताना संरक्षण आणि परराष्ट्र या दोन विषयांपुरतीच चर्चा मर्यादित ठेवली.
सुमारे ३५-४० मिनिटांच्या भाषणामध्ये सैन्याच्या कर्तृत्वाचे कौतुक करताना केंद्र सरकारकडे राजकीय इच्छाशक्ती नसल्याचा मुद्दा मांडला. त्यातून मोदी सरकार पाकिस्तानी लष्करच नव्हे, चीन-तुर्कीए आणि अमेरिकेच्या दबावाखाली नमल्याचे सूचित केले. ट्रम्पचे नाव घेऊन अमेरिकेच्या अध्यक्षांचा मध्यस्थीचा दावा फेटाळण्याचे आव्हान मोदींनी स्वीकारलेले दिसले नाही, अशी प्रतिक्रिया संसदेच्या आवारात ‘इंडिया’ आघाडीच्या नेत्यांकडून व्यक्त झाली.
पाकिस्तान-चीन यांच्या ‘फ्युजन’ला कसे प्रत्युत्तर देणार, ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानची निंदा कोणीच कशी केली नाही, पाकिस्तानला अमेरिकेचा पाठिंबा कसा मिळाला आणि ट्रम्पचा मध्यस्थीचा दावा थांबवता का आला नाही, असे राहुल गांधींनी मांडलेले चारही मुद्दे अनुत्तरित राहिले. मोदींनी भाषणामध्ये अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्सचे नाव घेतले तरी, ट्रम्पचा उल्लेख केला नाही. मोदींनी राफेलचाही उल्लेख केला नाही. मोदींनी भाषणाचा केंद्रबिंदू काँग्रेसने इतिहासात केलेल्या चुकांवर ठेवला. वर्तमानात केंद्र सरकारने केलेल्या चुकांवर त्यांनी स्पष्टीकरण दिले नाही. नेमका हाच मुद्दा प्रियंका गांधी-वाड्रा यांनी भाषणात मांडला होता, मोदींनी भाषणातून प्रियंकांचा आरोप खरा ठरवल्याचे दिसले. लोकसभेतील विरोधी पक्ष नेते म्हणून राहुल गांधींनी विरोधकांच्या वतीने सर्वात शेवटी भाषण करून परिपक्वता दाखवल्याचे मानले जात आहे.
केंद्र सरकारने विनंती केल्यामुळे विरोधी पक्षांच्या सदस्यांची शिष्टमंडळे परदेशात पाठवली गेली होती. केंद्राची बाजू मांडल्यानंतर लोकसभेत विरोधी सदस्य ‘ऑपरेशन सिंदूर’च्या चर्चेत मोदी-शहांना प्रश्न विचारू शकतील का, असा मुद्दा उपस्थित केला गेला होता. कदाचित हे विरोधी सदस्य बोलणारच नाहीत अशी चर्चा होत होती. मात्र, सुप्रिया सुळे, कणिमोळी, असादुद्दिन ओवैसी या शिष्टमंडळांमध्ये सहभागी झालेल्या ‘इंडिया’ आघाडीच्या खासदारांनीही ‘ऑपरेशन सिंदूर’वर केंद्राला जाब विचारला.
काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनाही या सदस्यांप्रमाणे चर्चेत सहभागी होता आले असते. थरूर यांना काँग्रेसने बोलण्याबाबत विचारणा केली होती पण, थरूर यांनी न बोलण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जाते. ‘ऑपरेशन सिंदूर’च्या निमित्ताने ‘इंडिया’ आघाडीने म्यानातून तलवार बाहेर काढल्याचे दिसले. लोकसभेत चर्चेमध्ये भाग घेऊन मोदी विरोधकांच्या आक्रमकतेवर पाणी फेरतील अशी चर्चा संसदेच्या आवारात रंगली होती पण, राहुल गांधींच्या भाषणाने त्या पाण्यावर बांध घातल्याचे पाहायला मिळाले.