Ayodhya Ram Mandir Inauguration : अयोध्येत २२ जानेवारी रोजी भव्य प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भगवान रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने देशभरात अतिप्रतिष्ठित लोकांना आमंत्रणे पाठवली जात आहेत. या कार्यक्रमाचे आमंत्रण कॉंग्रस नेत्यांनाही पाठवण्यात आलं असून काँग्रेसने मात्र या कार्यक्रमाला न जाण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, यासंदर्भात आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली. मंगळवारी ‘भारत जोडो न्याय यात्रे’दरम्यान झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी बोलताना राहुल गांधी यांनी भाजपावर जोरदार टीका केली.

हेही वाचा – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री राम मंदिर सोहळ्याला जाणार का? खुद्द ममता बॅनर्जींनी दिले उत्तर, म्हणाल्या “मी त्या दिवशी…”

काय म्हणाले राहुल गांधी?

“२२ जानेवारी रोजी होणारा प्राणप्रतिष्ठा सोहळा हा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ केंद्रित असणार आहे. या कार्यक्रमाला भाजपाकडून राजकीय रंग देण्यात येत आहे. याबाबत हिंदू धर्मातील महंतांनीही आपली भूमिका स्पष्ट केली आहे. भाजपाने या सोहळ्याचं राजकीयीकरण केलं आहे”, अशी टीका राहुल गांधी यांनी केली.

पुढे बोलताना ते म्हणाले, “हा कार्यक्रम पूर्णपणे नरेंद्र मोदी यांचा असल्याचे जाणवते. म्हणूनच काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी या कार्यक्रमाला न जाण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ केंद्रित राजकीय कार्यक्रमाला जाणे कॉंग्रेसला शक्य नाही, हे काँग्रेसच्या सिद्धांताच्या विरोधात आहे.”

भारत जोडो न्याय यात्रा ज्यावेळी उत्तर प्रदेशमध्ये असेल, त्यावेळी राम मंदिरात दर्शनासाठी जाणार का? असे विचारले असता, “आमच्या यात्रेचा मार्ग आधीच निश्चित झाला आहे. त्यानुसारच आमची यात्रा मार्गक्रमण करेल”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

भाजपाच्या ‘हिंदू विरोधी’ असल्याच्या आरोपांवर म्हणाले…

काँग्रेसने राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला न जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर भाजपाकडून काँग्रेस पक्ष हा हिंदू विरोधी असल्याचा आरोप करण्यात आला होता. या आरोपांवरही राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “ज्यांचा खरोखरच धर्मावर विश्वास आहे, त्यांनी आपला धर्म स्वत:पुरता मर्यादित ठेवावा, राजकीय फायद्यासाठी धर्माचा वापर करू नये. मी कधीही राजकीय फायद्यासाठी धर्माचा वापर करत नाही, मला त्यात कोणताही रस नाही. मी नेहमी धर्माच्या तत्त्वांनुसार वागतो आणि ते तत्व माझ्या आचरणात आणण्याचा प्रयत्न करतो. म्हणूनच मी लोकांशी प्रेमाने वागतो, त्यांचा आदर करतो. मी कोणाशीही उद्धटपणे बोलत नाही आणि मी द्वेषही पसरवत नाही.”

हेही वाचा – लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अखिलेश यादव यांचा मोठा निर्णय, मध्य प्रदेशची कार्यकारिणी विसर्जित!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राहुल गांधींच्या टीकेला भाजपाचे प्रत्युत्तर :

दरम्यान, राहुल गांधींच्या या टीकेला भाजपानेही प्रत्युत्तर दिलं आहे. “राहुल गांधी हे स्वत:च्याच विश्वात असतात. आपण जे बोलतो तेचं खरं असा त्याचा समज होतो. ते नेहमी खोटं बोलतात. २०१४ आणि २०१९ मध्ये त्यांनी असाच प्रयत्न केला होता. मात्र, भारतातील नागरिक सुजाण आहेत; त्यांना खरं आणि खोट्यातला फरत समजतो”, अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी दिली.