कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात शक्तिपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचे समर्थन – विरोध किती खरा किती खोटा अशा नव्या वादाची फोडणी मिळाली आहे. प्रकल्पाचे समर्थक आणि विरोधकां मधील सत्यता पटवण्याचा वादाची नवी किनार लागली आहे.

शक्तीपीठ विरोधी संघर्ष समितीने आपल्याला मिळणारा पाठिंबा खऱ्याखुऱ्या शेतकऱ्यांचा असल्याचा दावा करत समर्थन करणारे शेतकरी हे केवळ कागदपत्री असल्याचा हल्ला चढवला आहे. त्याला प्रत्युत्तर देत समर्थक शेतकऱ्यांनी सात-बारा पत्रके हाती घेऊन जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रकल्प मार्गी लावण्याची मागणी केली आहे. पण याही मुद्द्यावरून नवनवे वाद पुढे येत आहेत.

शक्तिपीठ महामार्ग होण्यावरून कोल्हापूर जिल्ह्यात उभे दोन तट पडले आहेत. शक्तिपीठ विरोधी संघर्ष समितीने गेल्या वर्षभरापासून लढ्याची भूमिका घेतली आहे. गेले चार महिन्यांपासून शक्तिपीठला समर्थन देण्यासाठी थेट रस्त्यावर उतरून आंदोलनाची तयारी समर्थकांनी चालवली आहे. शक्तीपीठ प्रकल्प समर्थनची जबाबदारी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष, एकनाथ शिंदे शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी खांद्यावर घेतली आहे. त्यांनी विरोधी संघर्ष समितीला थेट शिंगावर घेण्याची तयारी चालवली आहे.

तथापि, क्षीरसागर यांच्या मागे असणारे समर्थक हे खरे शेतकरी नव्हेत; ती केवळ कागदी बुजगावणी असल्याचे टीकेचे प्रहार शक्तीपीठ विरोधी संघर्ष समितीचे नेते माजी खासदार राजू शेट्टी, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष, आमदार सतेज पाटील यांनी केली. त्यांचे हे आव्हान स्वीकारत शक्तिपीठ महामार्ग जात असलेल्या भागातील शेतकऱ्यांचा एक गट सातबारा पत्रके घेऊन थेट जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार राजेश क्षीरसागर यांचे फलक घेऊन आलेल्या शेतकऱ्यांच्या या समूहाने जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची भेट घेऊन शक्तीपीठ महामार्ग मार्गी लावावा, त्यासाठी शेतकऱ्यांना योग्य मोबदला द्यावा, अशी मागणी केली.

इतकेच नव्हे तर समर्थन समितीने शिरोळ तालुक्यातून ७० टक्के शेतकऱ्यांचे पाठबळ असल्याचा दावा करीत थेट राजू शेट्टी यांनाच आव्हान दिले होते. त्यावर शेट्टी यांनी काही गावांमध्ये बाधित शेतकऱ्यांना संभाव्य प्रकल्पस्थळी आणून शक्ती प्रदर्शन केले. त्यातून शक्तिपीठच्या बाजूने जाणारे कोणीच शेतकरी नसल्याचे दाखवून देत पुन्हा राजेश क्षीरसागर यांना प्रतिआव्हान दिले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वादाचा दक्षिण रंग

शक्तिपीठ महामार्ग कोल्हापूर जिल्ह्याच्या दक्षिण भागातून जावा असा प्रयत्न आमदार शिवाजी पाटील यांनी चालवला आहे. त्यासाठी त्यांनी गडहिंग्लज प्रांताधिकारी कार्यालयावर समर्थक शेतकऱ्यांचा मोर्चा काढला होता. तेथेही सातबारा पत्रके प्रांताधिकार्‍यांकडे देत हा प्रकल्प मार्गी लावण्याची मागणी केली गेली. यानंतर भाजपचे कार्यकारिणी सदस्य संग्रामसिंग कुपेकर यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे किती सातबारा पत्रके सादर झाले आहेत, याची मागणी केली. तेव्हा त्यांना एकही सातबारा पत्रक सादर केले नसल्याचे माहिती देण्यात आली. त्यामुळे शक्तिपीठ समर्थन करणारे हे खरोखरीच शेतकरी आहेत की तो देखावा केला जात आहे, असाही प्रश्न या निमित्ताने शक्तिपीठ विरोधी संघर्ष समितीकडून उपस्थित केला जात आहे.