scorecardresearch

चिंतन शिबिरातून काँग्रेसमध्ये महत्वाच्या प्रक्रियेची सुरुवात, मात्र अंमलबजावणी कशी होते हे महत्वाचे – शशी थरूर

“ही प्रक्रिया सर्वांना एकत्र घेऊन पार पाडली असती तर अधिक चांगले झाले असते”.

काँग्रेसच्या उदयपूर येथे नुकत्याच झालेल्या चिंतन शिबिराची बरीच चर्चा झाली. ही चर्चा होण्यामागचे कारण म्हणजे या शिबिरात घेतले गेलेले निर्णय आणि त्यावर काँग्रेसच्या नेत्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया. या शिबिराला उपास्थित असलेले काँग्रेसचे जेष्ठ नेते शशी थरूर यांनी या शिबारात घेतल्या गेलेल्या निर्णयासह हार्दिक पटेल यांचा राजीनामा आणि इतर प्रादेशिक विचारधारा काँग्रेसशी का जुळतात? यावर भाष्य केले आहे. शशी थरूर यांनी त्यांना विचारलेल्या प्रश्नांची मोकळेपणाने उत्तरे दिली.

चिंतन शिबिर आणि त्याचे होणारे परिणाम यावर तुमचं मत काय?

“या अधिवेशनात सर्व उपस्थितांमध्ये आपलेपणाची आणि सौहार्दाची भावना होती. वातावरण एकदम विधायक होते. आम्ही ६ गटांमध्ये विभागले गेलो होतो आणि आमचा फार संपर्क येत नव्हता. आम्ही सर्व गट रात्री जेवणाच्या वेळी फक्त एकत्र भेटायचो. खूप गप्पा मारायचो. सहा विभागाच्या प्रमुखांशी वेगवेगळी चर्चा करून त्याची माहिती अध्यक्षांना देणात आली आणि त्यावर निर्णय जाहीर करण्यात आले. यापेक्षा जर ही प्रक्रिया सर्वांना एकत्र घेऊन पार पाडली असती तर अधिक चांगले झाले असते.

कोणती शिफारस कायम ठेवली आहे आणि कुठल्या शिफारशीत बदल करण्यात आला आहे हे समजून घेण्यात वेळ गेला आणि तेवढीच निराशासुद्धा झाली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पक्षात एका महत्त्वाच्या प्रक्रियेची सुरुवात झाली आहे. हे बदल कसे राबवले जातात यावर पुढील बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. येणाऱ्या काळात पक्षात काही बदल झाले नाहीत तर यावर वेगळी प्रतिक्रिया असू शकते.”

जी २३ मधील नेत्यांच्या कुठल्या मागण्या मान्य झाल्या नाहीत? 

“माझे मत असे आहे की कुठलाही निर्णय घेण्याआधी आमचे मत आणि दृष्टीकोन विचारात घेणे आवश्यक आहे. पक्षाध्यक्ष आणि कार्यकारिणीने आम्ही दिलेल्या काही प्रस्तावांच्या विरोधात निर्णय घेतला. पक्षाच्या अध्यक्षांनी सांगितले की एक सल्लागार समिती असेल. पण ती निर्णय घेणार नाही. ती फक्त सल्लागार संस्था म्हणून काम करेल. या गोष्टी जेव्हा प्रत्यक्षात घडतील तेव्हा त्यावर अधिक भाष्य करता येईल.”

सल्लागार समिती सामूहिक निर्णय घेणार नाही

मला असे वाटते की हा निर्णय स्वीकारण्याशिवाय आमच्याकडे दुसरा पर्याय नाही. कारण कुठलाही अंतिम निर्णय घेण्याचे विशेषाधिकार हे अध्यक्षांचे असतात. पण माझ्या मते पक्षाच्या निर्णय प्रक्रियेत सहभागी होण्याची आणि आपले मत मांडण्याची इच्छा प्रत्येकाला असते. इथे यापूर्वी घेतले गेलेले निर्णय का घेतले गेले? याचे आश्चर्य वाटते. आम्ही अध्यक्षांचे अधिकार कमी करा असे म्हणू शकत नाही. पण त्यांच्याशी सल्लामसलत करून निर्णय घेणाची विनंती करू शकतो”.

हार्दिक पटेल आणि नेत्यांनी पक्ष सोडण्याबाबत मत

“हार्दिक पटेल यांच्या पक्ष सोडण्यामुळे मी खूप निराश झालो आहे. मी हार्दिक पटेल यांना भेटलो आहे. त्यांच्या हुशारीमुळे आणि नेतृत्व गुणांमुळे मी प्रभावित झालो होतो. त्यांच्या पक्ष सोडून जाण्यामुळे पक्षाचे खूप मोठे नुकसान झाले आहे. प्रत्येक नेत्याने पक्षात आपले योगदान दिलेले असते. त्यांचे पक्ष सोडून जाणे हे पक्षासाठी चांगले नाही. यासाठीच आम्हाला पक्षात सुधारणा हव्या आहेत.”

प्रादेशिक पक्षांना विचारधारा नाही हे राहुल गांधी यांचे विधान पटते का?

“मला वाटते की त्यांना असे म्हणायचे असेल की अनेक प्रादेशिक पक्षांची विचारधारा ही प्रादेशिक विषयांशी जोडलेली असते. आणि काँग्रेसची विचारधारा राष्ट्रीय विषयांशी. याचा नेमका अर्थ हाच असावा”.

मराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Shashi taroor said during chintan shibir we have started important process pkd

ताज्या बातम्या