Shashi Tharoor on Congress criticism: काँग्रेस पक्षाचे नेते जयराम रमेश यांच्या “आमचे खासदार फिरत आहेत” या शशी थरूर यांच्यावरील वक्तव्यानंतर थरूर यांनी, भारतात परतल्यानंतर सहकाऱ्यांशी बोलेन आणि सध्या जागतिक स्तरावर दहशतवादाबाबत भारताचा संदेश पोहोचवण्यावर लक्ष केंद्रित करीत आहे, अशी प्रतिक्रिया दिली आहे.
शशी थरूर हे केंद्र सरकारने नेमलेल्या भारताच्या सात शिष्टमंडळांपैकी एकाचे नेतृत्व अमेरिकेसह इतर देशांमध्ये करीत आहेत. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दहशतवादाबाबत पाकिस्तान आणि भारताची भूमिका उघड करण्यासाठी सरकारने जागतिक स्तरावरील प्रचाराचा भाग म्हणून जगाच्या विविध भागात शिष्टमंडळे पाठवली आहेत. या दौऱ्यादरम्यान थरूर भारताने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरबाबत बोलत आहेत. मात्र, काँग्रेस पक्ष त्यांच्या भूमिकेबद्दल सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित करीत त्यांच्यावर टीका करताना दिसत आहे. त्यांच्यावर होणाऱ्या या टीकेबाबत माध्यमांनी त्यांना विचारले असता, त्यांनी अशा प्रकारची प्रतिक्रिया दिली आहे.
ब्राझीलमध्ये आगमन झाल्यावर त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी केलेल्या टीकांबद्दल विचारले. त्यावर थरूर म्हणाले, “मला वाटते की, आता आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करण्याची वेळ आहे. एका समृद्ध लोकशाहीमध्ये टीका होणे स्वाभाविक आहे. मात्र, मला वाटते की, सध्या मी त्यांच्यावर लक्ष केंद्रित करू शकत नाही. जेव्हा मी भारतात परतेन तेव्हा मला सहकारी, टीकाकार आणि तिथल्या माध्यमांशी बोलण्याची संधी मिळेल यात शंका नाही. पण सध्या ज्या देशांमध्ये आम्ही जात आहोत आणि तेथील लोकांपर्यंत संदेश पोहोचवण्यावर मी लक्ष केंद्रित आहे.”
मे महिन्यातच केंद्र सरकारवर टीका करताना जयराम रमेश म्हणाले होते, “आमचे खासदार फिरत आहेत आणि दहशतवादीही फिरत आहेत.” भारत-पाकिस्तान संघर्षादरम्यान भारताच्या भूमिकेचे समर्थन करणाऱ्या थरूर यांच्या विधानांचे सत्ताधारी पक्ष आणि त्यांच्या समर्थकांकडून कौतुक होत आहे. असे असताना त्यांच्याच पक्षातील अनेक नेत्यांना मात्र ते खुपत असल्याचे वारंवार समोर येत आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर काँग्रेसने सरकारच्या कारवाईला आधी पाठिंबा दिला होता. मात्र, नंतर त्यांनी आपला सूर बदलला. काँग्रेसने सरकारकडे युद्धबंदी का मान्य करण्यात आली आणि त्यात अमेरिकेची भूमिका काय होती याबाबत वारंवार स्पष्टीकरण मागितले.
थरूर यांनी सरकारला दिलेला पाठिंबा आणि त्यांच्याकडे भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व सोपविल्याच्या निर्णयामुळे काही काँग्रेस नेते नाराज झाले. पक्षाचे ज्येष्ठ सदस्य जयराम रमेश यांनी, तर थरूर यांचे विचार काँग्रेस पक्षाच्या अधिकृत भूमिकेचे प्रतिनिधित्व करीत नाहीत, असे म्हटले. काँग्रेसने केंद्र सरकारला सुचवलेल्या नावांच्या यादीत थरूर यांचे नाव नव्हते. मात्र, तरीही केंद्र सरकारने त्यांची निवड करून शिष्टमंडळाचे नेतृत्व त्यांच्याकडे सोपवल्याने काँग्रेस नेत्यांच्या डोळ्यांत हे नक्कीच खुपल्याचे त्यांच्या टीकासत्रावरून दिसून येत आहे.
पनामातील थरूर यांच्या वक्तव्यामुळे काँग्रेसमध्ये आणखी अस्वस्थता निर्माण झाली. त्यानंतर काँग्रेसने त्यांना ‘भाजपाचे सुपरस्पोक्सपर्सन’ असे संबोधले होते. “अलीकडच्या काळात भारताच्या भूमिकेत झालेला बदल आणि त्यामुळे दहशतवाद्यांना ही जाणीव झाली की त्यांना किंमत मोजावी लागेल. जेव्हा पहिल्यांदाच सप्टेंबर २०१५ मध्ये उरी स्ट्राईक करीत भारताने दहशतवादी तळावर, लाँचपॅडवर सर्जिकल स्ट्राईक करण्यासाठी भारत आणि पाकिस्तानमधील नियंत्रण रेषा ओलांडली होती. ते असे काहीतरी होते, जे यापूर्वी केले नव्हते”, अशी भारताची भूमिका थरूर यांनी पनामामध्ये मांडली होती.
“कारगिल युद्धादरम्यानही भारताने नियंत्रण रेषा ओलांडली नव्हती. उरीमध्ये ती ओलांडली आणि त्यानंतर जानेवारी २०१९ मध्ये पुलवामा इथए हल्ला झाला. यावेळी भारताने केवळ नियंत्रण रेषाच ओलांडली नाही, तर आंतरराष्ट्रीय सीमादेखील ओलांडली आणि बालाकोटमधील दहशतवादी मुख्यालयावर हल्ला केला. यावेळी भारताने या दोन्ही सीमा ओलांडल्या आहेत. केवळ नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमाच ओलांडल्या नाहीत, तर पाकिस्तानच्या नऊ ठिकाणचे दहशतवादी तळ, प्रशिक्षण केंद्रे व दहशतवादी मुख्यालये उद्ध्वस्त केली आहेत”, असेही त्यांनी नमूद केले होते. दरम्यान, सर्वपक्षीय शिष्टमंडळांचा हा दौरा संपल्यावर शशी थरूर यांचे काँग्रेस पक्षाकडून कसे स्वागत होईल हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. त्याशिवाय ते काँग्रेसमध्येच कायम राहतील की भाजपाच्या दिशेने वाटचाल करण्याची ही सुरुवात आहे की आणखी काही याबाबतही राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेच.