अलिबाग : एकेकाळी राज्याच्या राजकीय व सामाजिक जडणघडणीवर पगडा असलेला, मंत्रिपदे तसेच विरोधी पक्षनेतेपद अशी महत्त्वाची पदे भूषविलेला शेतकरी कामगार पक्षाने ७८व्या वर्षात पदार्पण केले असले तरी आजच्या घडीला हा पक्ष पूर्पणणे रसातळाला गेला असून, पक्षाचे अस्तित्वच संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. पक्षातील जुने जाणते नेते पक्षात रहायला तयार नाहीत, नवीन पिढीला पक्षात यावेसे वाटत नाही. पक्षाने काळानुरूप होणारे बदल पक्षाने स्विकारलेले नाही. अशा प्रतिकूल परिस्थितीत पक्षाची पुढील वाटचाल आव्हानात्मक असणार आहे.

राज्यात २ ऑगस्ट १९४७ रोजी देवाची आळंदी येथे शंकरराव मोरे आणि केशवराव जेधे शेतकरी कामगार पक्षाची स्थापना केली. काँग्रेस मधील असंतुष्ट नेत्यांनी एकत्र येऊन या पक्षाची स्थापना केली. या घटनेला शनिवारी ७८ वर्ष पूर्ण झाली आहे. या कार्यकाळात पक्षाने अनेक चढ उतार पाहीले. कष्टकरी, शेतकरी आणि कामगाराचे प्रश्न मांडण्याचे काम या काळात पक्षाने केले. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातही पक्षाचे अनेक नेते सक्रीय होते. त्यामुळे पक्षाचा जनाधार वाढत गेला.

ना. ना पाटील, माधवराव बागल, तुळशीदास जाधव, एन. डी पाटील, गणपतराव देशमुख, दत्ता पाटील, दि. बा पाटील, प्रभाकर पाटील या सारखे मात्तब्बर नेते पक्षाने दिले यांच्या कार्यकाळात पक्षाचा उत्कर्ष झाला. एकेकाळी पक्षाचे ढिगाने आमदार राज्यातून निवडून येत होते. खासदारही निवडून जात होते. राज्याचे विरोधी पक्षनेते पदही पक्षाकडे होते. राज्यमंत्रीमंडळातही काम करण्याची संधी शेकापच्या गणपतराव देशमुख, मोहन पाटील, मिनाक्षी पाटील, एन डी पाटील यांना मिळाली होती. पण गेल्या तीन दशकात पक्षाला उतरती कळा लागली आहे. पक्षाचा जनाधार घटला आहे. पक्षाची विश्वासार्हता अडचणीत आली आहे. त्यामुळे पक्षाला एक एक आमदार निवडून आणण्यासाठी संघर्ष करावा लागतो आहे.

२०२४ च्या विधानसभा निवडणूकीत याचीच प्रचिती आली. शेकापचा बालेकिल्ला असणाऱ्या रायगड जिल्ह्यातून पक्षाचा एकही आमदार निवडून आला नाही. गणपतराव देखमुख यांच्या सांगोला या मतदारसंघाचा अपवाद सोडला, तर पक्षाची कामगिरी असमाधानकारक राहिली आहे. कधी डाव्या आघाडी आधार घेत, कधी महाविकास आघाडी समवेत जात पक्षाने आपली वाटचाल सुरू ठेवली आहे.

एकेकाळी रायगड हा शेकापचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा, पक्षाचे चार ते पाच आमदार जिल्ह्यातून निवडून जायची, पक्ष कार्यकर्त्यांचे भक्कम कॅडर संघटनेच्या पाठीशी होते. पण आता गेले ते नेते आणि राहिल्या नुसत्या आठवणी असे म्हणण्याची वेळ पक्षकार्यकर्त्यांवर आली आहे. रामशेठ ठाकूर यांनी पक्षाची साथ सोडल्याने पनवेल विधानसभा मतदारसंघात पक्षाची वाताहत सुरू झाली. विवेक पाटील कर्नाळा बँक घोटाळ्यात अडकल्याने, उरण मध्ये पक्षाला उतरती कळा लागली. पेण विधानसभा मतदारसंघातून तरुण तडफदार नेते अशी ओळख असलेल्या माजी आमदार धैर्यशील पाटील यांनी पक्षाची साथ सोडली. त्यामुळे या मतदारसंघातही पक्षाची वाताहत झाली.

अलिबाग विधानसभा मतदारसंघातही पक्षाची स्थिती फारशी चांगली नाही. विधानसभा निवडणूकीनंतर जयंत पाटील यांच्या घरातच फूट पडली. माजी आमदार आणि जयंत पाटील यांचे बंधू सुभाष पाटील पक्षत्याग करत भाजपमध्ये दाखल झाले. जयंत पाटील यांचा भाचा आस्वाद पाटीलही पक्ष सोडून भाजपत गेला. पनवेल मध्ये पक्षाची आर्थिक आणि राजकीय धुरा संभाळणारे जेएमम्हात्रे, उरण मधून विधानसभा निवडणूक लढवणारे प्रितम म्हात्रे यांनीही शेकापला अखेरचा लाल सलाम केला. दोघेही भाजप मध्ये दाखल झाले. त्यामुळे पक्षा समोर आव्हानांचा डोंगर उभा राहिला आहे. अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी धडपड करावी लागणार आहे.

काळानुरूप बदलत्या राजकारणाला पक्ष स्वीकारायला तयार नाही. जुन्या नेत्यांचे राजकारण संपत आले आहे. आणि तरुण लोक पक्षात येण्यास फारसे उत्सुक राहीलेले नाहीत. त्यामुळे पक्षाची वाटचाल अधिकच खडतर होत चालली आहे. त्यामुळे पक्षाची पुर्नबांधणी करणे हे पक्षा समोरील सर्वात नोठे आव्हान आहे. आजवर जिल्ह्यात येणाऱ्या प्रत्येक प्रकल्पांना विरोध करण्याची भूमिका शेकापने घेतली आहे. त्यामुळे विकासाला विरोध करणारा पक्ष अशी प्रतिमा पक्षाची तयार झाली आहे. ही जनमानसातील ही प्रतिमा मोडून काढणे पक्षासाठी सर्वाधिक आव्हानात्मक असणार आहे. ज्या शेतकरी कामगारच्या हक्कांसाठी पक्षाची स्थापना झाली. त्यांच्या प्रश्नांची कास शेकापला आगामी काळात धरावी लागणार आहे. या प्रश्नांकडे दुर्लक्ष सुरूच ठेवले तर महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरून पक्षाचे अस्तित्व संपूष्टात यायला वेळ लागणार नाही.