नागपूर : शिंदे-फडणवीस सरकारच्या धोरणाविरोधात महाविकास आघाडीची दुसरी सभा नागपूरमध्ये होत आहे. पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यांमिळून ही सभा असणार आहे. या भागात मविआतील घटक पक्ष अनुक्रमे राष्ट्रवादी आणि शिवसेना (ठाकरे गट) यांच्या तुलनेत काँग्रेसची राजकीय शक्ती अधिक असल्याने सभा यशस्वी करण्याची जबाबदारीही काँग्रेसचीच असल्याने ते पेलण्याचे मोठे आव्हान या पक्षापुढे आहे.

आगामी निवडणुकीची तयारी म्हणून महाविकास आघाडीने राज्यात विभागनिहाय संयुक्त सभा घेण्याचे ठरवले. छत्रपती संभाजीनगर येथील पहिली सभा यशस्वी झाली आहे. या सभेवर शिवसेनाचा (ठाकरे गट) प्रभाव अधिक दिसून आला. आता नागपुरात पूर्व विदर्भासाठी होत असलेल्या सभेसाठी काँग्रेसला अधिक मेहनत घ्यावी लागणार आहे.

हेही वाचा – वसंतदादा पाटील गट पुन्हा एकसंघ ?

पूर्व विदर्भात काँग्रेसचे ९, राष्ट्रवादी काँग्रेसचे चार आमदार आहेत. शिवसेनेच्या ठाकरे गटाकडे पूर्व विदर्भात एकही आमदार नाही. पूर्व विदर्भात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेस नेते सुनील केदार आणि विजय वडेट्टीवार हे दिग्गज नेते आहेत. राष्ट्रवादीकडून अनिल देशमुख आहेत. नागपूर जिल्हा परिषदेवर काँग्रेसचा झेंडा आहे. हे बघता या संयुक्त सभेची जबाबदारी तुलनेने राष्ट्रवादी, शिवसेनेपेक्षा काँग्रेसवर अधिक राहणार आहे. त्यादृष्टीने काँग्रेसने तयारी केली आहे.

भंडारा, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर, नागपूर आणि गडिचरोली जिल्ह्यात या सभेविषयी जागरूकता निर्माण करण्याची जबाबदारी वाटून देण्यात आली. त्यानुसार जिल्हानिहाय बैठका घेण्यात येत आहेत. महाविकास आघाडीच्या संयुक्त सभेपाठोपाठ काँग्रेसने राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्या सभेची तयारी चालवली आहे. त्यामुळे वज्रमूठ सभा यशस्वी करण्यात अधिक कस काँग्रेसचाच लागणार आहे, असे राजकीय वर्तुळात सांगण्यात येत आहे.

हेही वाचा – कर्नाटकच्या निवडणुकीत दुधाचा मुद्दा तापला

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, संयुक्त सभेविषयी जिल्हानिहाय बैठक घेण्यात येत आहे. माझ्याकडे गडचिरोली जिल्ह्याची जबाबदारी आहे. दोन-तीन दिवसांत गडचिरोलीत बैठक घेण्यात येईल. वज्रमूठ सभेत तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते आणि जनता उत्स्फूर्तपणे सहभागी होईल, असा विश्वास काँग्रेसचे विधान परिषद सदस्य ॲड. अभिजीत वंजारी यांनी व्यक्त केला.