उत्तर प्रदेशातील लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यापासूनच चुरस पाहायला मिळत आहे. विशेषत: समाजवादी पक्षातच अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर येताना दिसत आहे. मुरादाबाद आणि रामपूर या जागांवरील उमेदवारांबाबत बरीच उलटसुलट चर्चा सुरू आहे. उमेदवारी अर्ज दाखल करायच्या शेवटचा दिवसापर्यंत हा गोंधळ पाहायला मिळत होता. परंतु हा प्रश्न सुटल्याचा समाजवादी पार्टीचे सर्वेसर्वा अखिलेश यादव यांनी दावा केला आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत समाजवादी पार्टीने जिंकलेल्या पाच जागांपैकीच या दोन जागा होत्या. तेव्हा बहुजन समाज पक्ष (BSP) आणि राष्ट्रीय लोक दल (RLD)बरोबर समाजवादी पार्टीने युती केली होती.

रामपूर

बऱ्याच संघर्षानंतर सपाने रामपूरमध्ये आपला उमेदवार जाहीर केला. पक्षाने मौलाना मोहिबुल्ला नदवी यांचे नाव निश्चित केले. नदवी हे दिल्ली पार्लमेंट स्ट्रीट जामा मशिदीचे इमाम आहेत. ते मूळचे रामपूरमधील राजानगरचे रहिवासी आहेत. त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तसेच रामपूर जिल्हा युनिटमधील आझम खान समर्थकांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आहे. अखिलेश यादव यांनी रामपूरमधून निवडणूक लढवावी, असे आझम खान यांचे समर्थक सांगत आहेत. रामपूरमध्ये सपा नेते असीम रझा यांनीही उमेदवारी अर्ज भरल्याने पक्षातील तणाव वाढला आहे. आझम समर्थकांची समजूत काढण्याचे प्रयत्न वेगाने सुरू आहेत. शिवपाल यादव स्वतः सीतापूरला जाऊन आझम खान यांच्याशी चर्चा करणार आहेत. “मी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. जर काही मौलानांनीही अर्ज दाखल केला असल्यास त्यांचा तो हक्क आहे. ही लोकशाही आहे. नामांकन प्रक्रिया सुरू आहे. काहीही अंतिम नाही. कोण निवडणूक लढवणार हे लवकरच स्पष्ट होईल,” असेही राजा म्हणाले.

हेही वाचाः अरविंद केजरीवाल यांच्या आधी किती मुख्यमंत्र्यांना अटक झाली? राजीनामा देणं किती आवश्यक? कायदा काय सांगतो?

यादव यांच्या सूचनेनुसार उमेदवारी अर्ज भरला का? असे विचारले असता राजा म्हणाले, “मी आणखी कोणाच्या वतीने अर्ज भरणार? माझा नेता कोण आहे? अखिलेश यादव माझे नेते आहेत आणि आझम खानही नेते आहेत. दोन जणांनी अर्ज भरले तरी हरकत नाही. ज्या पक्षाला लोकांचा पाठिंबा आहे, त्यांच्याकडे अनेक उमेदवार आहेत. सपाचे रामपूर जिल्हा युनिट प्रमुख वीरेंद्र गोयल यांनी इंडियन एक्सप्रेसला सांगितले की, राजा यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला आहे. सपाचे राष्ट्रीय प्रवक्ते राजेंद्र चौधरी यांनीही याला दुजोरा देत हा निर्णय पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वाने घेतला असल्याचे सांगितले.

नदवी यांच्या उमेदवारीमुळे सपाच्या रामपूरमधील कार्यकर्त्यांना धक्का बसला आहे. पक्षाच्या नेत्यांच्या म्हणण्यानुसार, नदवी हे मूळचे रामपूरच्या रझा नगर गावचे रहिवासी आहेत, जे सुआर तहसील अंतर्गत येते. नदवी हे नवी दिल्लीतील संसद मार्गावरील मशिदीचे मौलवी आहेत आणि संभलचे खासदार शफीकुर रहमान बारक यांच्यासह अनेक खासदारांशी त्यांचे चांगले संबंध असल्याचे सांगितले जाते. ते (नदवी) रामपूरमध्ये फारसे ओळखीचे नाही, पण निवडणुकीत ते कसे करतात ते पाहू. त्यांना सपाच्या सर्वोच्च नेतृत्वाचा पाठिंबा आहे आणि रामपूरमध्ये मुस्लीम लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे हे लक्षात घेऊन ते चांगले काम करू शकतात. जर निवडणुका निष्पक्ष असतील तर त्या जागेवरून कोण जिंकेल हे समाज ठरवेल,” असे सपा नेत्याने सांगितले. २०१९ च्या निवडणुकीत खान यांनी भाजपाच्या जयाप्रदा यांचा १.०९ लाख मतांनी पराभव केला होता. द्वेषपूर्ण भाषण प्रकरणात दोषी ठरल्यानंतर ही जागा रिकामी झाली. २०२२ च्या पोटनिवडणुकीत भाजपाच्या घनश्याम लोधी यांनी राजा यांचा ४२,१९२ मतांनी पराभव केला.

मुरादाबाद

दुसरीकडे मुरादाबादमध्ये सपा नेत्या रुची वीरा यांनी बुधवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. २०१९ मध्ये या जागेवर विजयी झालेल्या एसटी हसन यांनी त्याच जागेवरून एक दिवस आधी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, सपा नेतृत्वाच्या हस्तक्षेपानंतर हसन यांनी आपली उमेदवारी मागे घेतली. समाजवादी पार्टीचे राष्ट्रीय प्रवक्ते राजेंद्र चौधरी यांनी पीटीआयला सांगितले की, हसन यांनी उमेदवारी मागे घेतली असून, त्यांच्या जागी बिजनौरचे माजी आमदार वीरा यांना पक्षाचे उमेदवार केले आहे. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर वीरा म्हणाल्या की, “मी काय बोलू? तुम्ही सर्वांनी माझे नामांकन दाखल केल्याबद्दल अभिनंदन केले पाहिजे. मी सपाकडून उमेदवारी दाखल केली आहे. तुम्ही रिटर्निंग ऑफिसर आणि पक्षाच्या अधिकाऱ्यांशी नियमांबाबत बोलले पाहिजे, असंही त्यांनी सांगितलं. वीरा या आझम खान यांच्या जवळच्या मानल्या जातात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२०१९ च्या निवडणुकीत हसन यांनी मुरादाबाद मतदारसंघातून भाजपाच्या कुंवर सर्वेश कुमार यांचा ९८,१२२ मतांनी पराभव केला होता. रुची वीरा यांनी आज नामांकन दाखल केल्यानंतर त्या या जागेवरून सपाच्या अधिकृत उमेदवार झाल्या आहेत. एसटी हसन यांनी त्यांच्या उमेदवारीबरोबर एक दिवस आधी सादर केलेला फॉर्म A आणि B पक्षाने रद्द केला आहे. एसटी हसन यांच्या जागी नवीन फॉर्म A आणि B समाजवादी पार्टीच्या अधिकृत उमेदवार म्हणून रुची वीरा यांना देण्यात आला आहे. त्यामुळे रुची वीरा या सपाच्या अधिकृत उमेदवार आहे,” असे मुरादाबादचे जिल्हा दंडाधिकारी मानवेंद्र सिंह म्हणाले. दरम्यान, मुरादाबाद जागेवर हसन यांच्या ऐवजी वीराला उमेदवारी देण्याच्या निर्णयावर सपाच्या एका वर्गात नाराजी आहे. सपा राज्यसभा खासदार जावेद अली खान यांनी सोशल मीडियावर आरोप केला की, मुरादाबाद रामपूरच्या प्रभावाखाली आले असून, हा निर्णय आझम खान यांच्या प्रभावाखाली घेतल्याचं त्यांनी सांगितलं आहे.