कोकण विभाग शिक्षक मतदारसंघात भाजपच्या वतीने नुकतीच ज्ञानेश्वर म्हात्रे यांची भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना यांचे अधिकृत उमेदवार म्हणून घोषणा करण्यात आली आहे. गेल्या निवडणुकीत ६ हजारांहून अधिक मते मिळवणारे ज्ञानेश्वर म्हात्रे हे दुसऱ्या क्रमांकावर होते. यंदा त्यांना भाजपने अधिकृत उमेदवारी दिल्याने ही लढत तुल्यबळ होणार हे निश्चित आहे. मात्र, पक्षाला उमेदवार आयात करावा लागल्याने भाजपमधील जुन्याजाणत्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे.

बदलापूर येथे राहणारे ज्ञानेश्वर म्हात्रे हे बदलापुरातील शिवभक्त विद्यामंदीर शाळेचे संचालक असून येथे मुख्याध्यापक पदावर कार्यरत आहेत. यासह अंबरनाथ तालुक्यातील सिंड्रेला इंग्लिश स्कुल, शंभूराजे प्राथमिक विद्यामंदीर, एम. के. पाटील विद्यामंदीर या शाळांमध्ये ते संचालक म्हणूनही काम पाहतात. शिवसेनेची पार्श्वभूमी असलेले ज्ञानेश्वर म्हात्रे यांचे बंधू वामन म्हात्रे हे कुळगाव बदलापूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष आणि बाळासाहेबांची शिवसेनेचे शहरप्रमुख आहेत. वामन म्हात्रे यांनी यापूर्वी विधानसभा निवडणुकही लढवली होती. राजकीय पार्श्वभूमी असल्याने त्यांच्या विस्ताराला संधी होती. त्याच माध्यमातून शिवसेनाप्रणित शिक्षक सेनेच्या माध्यमातून त्यांनी कामाला सुरूवात केली.

हेही वाचा – भाजप आणि शिंदे गटाच्या नेत्यांची विद्यापीठांमधील नियुक्त्यांसाठी मोर्चबांधणी

भाजपची उमेदवारी कशी?

कोकण शिक्षक मतदारसंघाची २०१७ वर्षात झालेल्या निवडणुकीत ज्ञानेश्वर म्हात्रे निवडणूक रिंगणात होते. शिक्षक सेनेच्या माध्यमातून त्यांना ६ हजार ८८७ इतकी मते मिळाली होती. पराभव झाला असला तरी ज्ञानेश्वर म्हात्रे दुसऱ्या स्थानी होते. मात्र त्यानंतर म्हात्रे यांनी आपली जनसंपर्क मोहूम राबवली. तब्बल सहा वर्षे म्हात्रे यांनी शिक्षक सेना आणि राज्य मुख्याध्यापक संघाच्या माध्यमातून कोकण विभाग पिंजून काढला. या काळात शिक्षक मतदारांची नोंदणीही म्हात्रे यांनी करून घेतली. मधल्या काळात इतर उमेदवारांपेक्षा म्हात्रे यांनी आपल्या प्रचारात सातत्य ठेवले. त्यात भाजपची ही फळी या काळात मागे पडली. नियोजनबद्ध कार्यक्रमाचा अभाव आणि मतदार नोंदणी मागे पडलेल्या भाजपाकडे तुल्यबळ उमेदवार नव्हता. त्यामुळे म्हात्रे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे बोलले जाते.

२०१७ या वर्षात झालेल्या कोकण विभागीय शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाचे बाळाराम पाटील यांचा विजय झाला होता. त्यावेळी पाटील यांना ११ हजार ८३७ मते मिळाली होती. तत्कालिन आमदार रामनाथ मोते, शिक्षक परिषदेचे वेणूनाथ कडू या दोन उमेदवारांमुळे ठाणे जिल्ह्यातील मतांमध्ये फुट पडली. त्याचा थेट फायदा बाळाराम पाटील यांना झाला. त्यामुळे त्यांचा विजय सोपा झाला असे बोलले जाते. बाळाराम पाटील यांच्याशी लढत देण्याकरिता तेवढाच तगडा उमेदवार रिंगणात असावा या हेतूने भाजप व शिंदे गटाने आर्थिकदृष्ट्या तगड्या म्हात्रे यांना उमेदवारी दिल्याची चर्चा आहे.

हेही वाचा – राज्यातील शेतकरी नेत्यांना राष्ट्रीय नेते होण्याचे लागले वेध

भाजपला यंदा विश्वास का?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यंदाच्या निवडणुकीत भाजपला विजयाची खात्री आहे. ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या रुपाने हा मतदारसंघ पुन्हा मिळवण्यासाठी भाजपची तयारी सुरू आहे. ३७ हजार मतांपैकी ठाणे जिल्ह्यात सुमारे १५ हजार मते आहेत, तर पालघर जिल्ह्यात ६ हजार मते आहेत. रायगड जिल्ह्यात १० हजार मते आहेत. भाजप ठाणे, पालघर जिल्ह्यातील फुट टाळण्यासाठी प्रयत्नशील आहे. यातून भाजपच्या विजयाचा मार्ग सोपा होईल, अशी भाजपला आशा आहे. मात्र गेल्या निवडणुकीप्रमाणे झालेली बंडखोरी, शिक्षक परिषदेची भूमिका यावरही निकालाची गणिते अवलंबून आहेत.