काँग्रेसने कर्नाटकमधील विधानसभेची निवडणूक बहुमतात जिंकली आहे. येथे एकूण १३५ उमेदवार निवडून आल्यामुळे काँग्रेसचा सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, निवडणूक जिंकली असली तरी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी कोणाची नियुक्ती करावी, असा प्रश्न काँग्रेससमोर उभा ठाकला आहे. कारण येथे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यात स्पर्धा रंगली आहे. दोन्ही नेते राज्याचे नेतृत्व करण्यास उत्सुक असून कोणीही माघार घेत नाहीये. याच पार्श्वभूमीवर या दोन्ही नेत्यांमध्ये जमेच्या बाजू काय आहेत? त्यांच्याकडे मुख्यमंत्रीपद दिल्यास काँग्रेस पक्षाला त्याचा काय फायदा होऊ शकतो, हे जाणून घेऊ या.

सिद्धरामय्या यांची बलस्थाने, कमकुवत बाजू

जमेच्या बाजू

मिळालेल्या माहितीनुसार कर्नाटकमधील काँग्रेसच्या एकूण १३५ आमदारांपैकी साधारण ९० आमदार सिद्धरामय्या यांच्या बाजूने आहेत. त्यामुळे सिद्धरामय्या हे शिवकुमार यांच्या तुलनेत मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीच्या अधिक समीप असल्याचे म्हटले जात आहे. सिद्धरामय्या हे एक अनुभवी राजकारणी आहेत. त्यांना राज्यातील राजकारणाची चांगली जाण आहे. तसेच त्यांना कुरूबा आणि मुस्लीम समुदायाचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा आहे.

हेही वाचा >>> Karnataka : भाजपा आमदाराचा पराभव होताच अल्पसंख्याकांना दिली धमकी; प्रीथम गौडा म्हणाले, “आता त्यांचा देवच त्यांना…”

सिद्धरामय्या राज्यात प्रसिद्ध

मात्र सिद्धरामय्या २०१८ साली कर्नाटकमध्ये काँग्रेसचे सरकार आणू शकले नाहीत. हे त्यांचे एक अपयशच म्हणावे लागेल. याच कारणामुळे पक्षश्रेष्ठी त्यांच्याकडे नकारात्मक दृष्टीने पाहण्याची शक्यता आहे. मात्र सिद्धरामय्या यांच्याकडे मुख्यमंत्रीपद न सोपवणे हे काँग्रेससाठी धोकादायक ठरू शकते. कारण राज्यातील कुरूबा आणि मुस्लीम मतदार त्यांच्या बाजूने आहेत. तसेच सिद्धरामय्या हे कर्नाटकमध्ये चांगलेच प्रसिद्ध असून त्यांच्यावर काँग्रेसचे अनेक आमदार अवलंबून आहे. सिद्धरामय्या यांचे नाव पुढे करून अनेक आमदार निवडून आलेले आहेत. त्यामुळे त्यांना मुख्यमंत्रीपद नाकारणे काँग्रेसला महागात पडू शकते.

शिवकुमार यांच्या तुलनेत सिद्धरामय्या यांना मुख्यमंत्री करणे काँग्रेससाठी जास्त सोयीस्कर आहे. कारण सिद्धरामय्या यांच्या बाजूने शिवकुमार यांच्या तुलनेत अधिक आमदार आहेत. त्यामुळे अल्पसंख्याक समाजाचेही अनेक आमदार त्यांच्याच बाजूने आहेत.

हेही वाचा >>> कर्नाटकमध्ये काँग्रेसच्या मोठ्या विजयानंतर ममता बॅनर्जींचा सूर बदलला; काँग्रेसला पाठिंबा देण्याबाबत केले मोठे भाष्य

डी. के. शिवकुमार यांना मुख्यमंत्री केल्यास काय होणार?

शिवकुमार यांच्या जमेच्या बाजू

डी. के. शिवकुमार हे कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांनी या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे नेतृत्व केले आहे. त्यांच्याच नेतृत्वाखाली काँग्रेसने येथे बहुमताचा आकडा पार केला आहे. येथे कठीण काळात त्यांनी पक्षाची धुरा सांभाळलेली आहे. यासह त्यांना लिंगायत आणि वोक्कालिगा समाजाच्या मतदारांनी पाठिंबा दिलेला आहे. विशेष म्हणजे काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी तसेच काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांचा शिवकुमार यांनाच पाठिंबा असण्याची शक्यता आहे. शिवकुमार यांनी दिवंगत नेते अहमद पटेल यांच्यासोबत काम केलेले आहे. पटेल हे गांधी घराण्याच्या जवळचे आणि विश्वासू नेते होते. याच कारणामुळे शिवकुमार यांचे पारडे जड होऊ शकते.

शिवकुमार यांच्या कमकुवत बाजू

शिवकुमार यांनी या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे नेतृत्व केले असले तरी त्यांना आमदारांचा पाठिंबा नाही. त्यांच्याकडे आकडे नाहीत. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करण्यात आलेला आहे. तसेच बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी त्यांच्यावर सीबीआयने गुन्हा दाखल केलेला आहे. याच कारणामुळे काँग्रेस हायकमांड त्यांना मुख्यमंत्रीपदाची संधी नाकारू शकते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचा >>> निष्ठावंतांना डावलल्यानेच कर्नाटकात पराभव, भाजप आमदाराचा पक्षाला घरचा आहेर

…तर काँग्रेसला आगामी निवडणुकीत फायदा होऊ शकतो

दरम्यान, भ्रष्टाचाराचे आरोप असल्याचे कारण देत शिवकुमार यांना डावलणे काँग्रेसला राजकीय दृष्टीने महागात पडू शकते. कारण या निवडणुकीत लिंगायत मतदारांचे अधिक प्रमाण असलेल्या भागात काँग्रेसने २०१८ च्या तुलनेत २८ हून अधिक जागांवर विजय मिळवला आहे. शिवकुमार यांची मुख्यमंत्रीपदी नियुक्ती केल्यास काँग्रेसकडे लिंगायत समाजाचे मतदार आकर्षित होऊ शकतात. याचा आगामी निवडणुकीसाठी काँग्रेसला फायदा होऊ शकतो.