scorecardresearch

सांगलीत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत जिल्हा परिषदेची रंगीत तालीम

सांगली, तासगाव, आटपाडी, शिराळा, इस्लामपूर, पलूस आणि विटा बाजार समितीच्या निवडणुक प्रक्रिया सध्या सुरू आहे. निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत सोमवारअखेर आहे.

Sangli, Agricultural Produce Market Committee elections, Zilla Parishad election , political parties
सांगलीत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत जिल्हा परिषदेची रंगीत तालीम

दिगंबर शिंदे

सांगली : जिल्ह्यातील सांगलीसह सात बाजार समिती निवडणुकीच्या निमित्ताने आपल्या गडाची मजबुती करण्याचे प्रयत्न राजकीय नेत्यांचे असले तरी मिनी मंत्रालय अशी ओळख असलेल्या जिल्हा परिषदेसाठी ताकद अजमावण्याचाच प्रयत्नही राजकीय पक्षांकडून सुरू आहे. स्थानिक पातळीवर आघाडीच्या माध्यमातून या निवडणुका लढविण्याची मानसिकता राजकीय पक्षांची असली तरी यासाठी आघाडी धर्म खुंटीला टांगून रणनीती निश्चित केली जात आहे.

सांगली, तासगाव, आटपाडी, शिराळा, इस्लामपूर, पलूस आणि विटा बाजार समितीच्या निवडणुक प्रक्रिया सध्या सुरू आहे. निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत सोमवारअखेर आहे. यामुळे ग्रामीण भागातील राजकीय वातावरण ढवळून निघत आहे. या सात बाजार समितीसाठी 24 हजार 528 मतदार असून ग्रामपंचायत सदस्य, विकास सोसायटीचे संचालक मतदार आहेत, तर ज्यांच्या नावे १० हजार चौरस फूट म्हणजेच १० गुंठे जमिन आहे, आणि सातबारा उतार्यासह शेतकरी असल्याचा दाखला ज्याच्याकडे उपलब्ध आहे अशांना निवडणुकीत उभे राहण्याची संधी असल्याने इच्छुकांची संख्या वाढणार आहे. मात्र, ज्यांचे ग्रामपंचायत व विकास सोसायटीमध्ये प्राबल्य आहे अशांनाच निवडून येण्याची संधी असल्याने राजकीय नेत्यांना उमेदवार निश्चितीमध्ये महत्व आहे.

हेही वाचा.. भाजपच्या ओबीसी अपमान प्रचाराच्या मुकाबल्यासाठी काँग्रेसही मैदानात

सात बाजार समितीमध्ये सांगली बाजार समितीची आर्थिक उलाढाल सर्वाधिक म्हणजे वार्षिक हजार कोटींच्या घरात असल्याने या निवडणुकीकडे सर्वच राजकीय पक्षांचे विशेषत: काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपचे लक्ष लागले आहे. मिरज, जत आणि कवठेमहांकाळ असे तीन तालुके कार्यक्षेत्र असल्याने राजकीय पैसही मोठा आहे. मागील निवडणुकीमध्ये ेडॉ. पतंगराव कदम यांच्या नेतृत्वाखालील पॅनेल सत्तेवर आले होते. मात्र, राज्यपातळीवरील राजकीय हालचालीमुळे भाजपच्या वळचणीला किंबहुना खासदार संजयकाका पाटील यांच्या गटाकडे ही समिती गेली होती. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर निवडणुका लांबल्याने अख्खे संचालक मंडळच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामील झाले. याचे बक्षिस म्हणून अतिरिक्त कारभाराची संधी या संचालक मंडळाला मिळाली होती.

हेही वाचा… कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांवरून जळगावमध्ये नेतेमंडळींची कसोटी

आता होत असलेल्या निवडणुकीमध्ये आ. जयंत पाटील, आ. डॉ. विश्वजित कदम, खा. संजयकाका पाटील यांचे एक पॅनेल होण्याची तर विरोधात वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील, जतचे माजी आमदार विलासराव जगताप यांचे एक पॅनेल होण्याची शययता दिसत आहे. तर कवठेमहांकाळची भूमिका माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांच्यावर निश्चित होणार असली तरी त्यांची भूमिका निर्णायक ठरण्याची चिन्हे आहेत. एकेकाळी सांगली बाजार समितीच्या त्रिभाजनाचा मुद्दा अगदी सर्वोङ्ख न्यायालयापर्यंत गाजला होता. यावेळी याची चर्चा फारशी होत नसली तरी मागील संचालक मंडळाच्या अनेक वादग्रस्त विषयावरून रान उठविले जाण्याची चिन्हे आहेत. आटपाडीमध्ये माजी आमदार राजेंद्र देशमुख यांच्या नेतृत्वाखालील भाजप प्रणित आघाडी आपले वर्चस्व अबाधित ठेवण्याच्या प्रयत्नात राहील, मात्र, तासगाव बाजार समितीमध्ये आमदार विरूध्द खासदार गट अशी लढत होण्याची शययता आहे. त्यादृष्टीने मोर्चेबांधणी सुरू आहे. आतापर्यंत तासगाव समिती राष्ट्रवादीच्या पर्यायाने आर.आर. आबा गटाच्या ताब्यात राहीली असली तरी अनेक अवैध कारणामुळे चर्चेत आली आहे. यामुळे यावेळची निवडणुक कशी लढवली जात याची उत्सुकता आहे. इस्लामपूरमध्ये बाजार समितीसाठी आ. जयंत पाटील म्हणतील त्याला राष्ट्रवादीची उमेदवारी निश्चित असली तरी यावेळी जिल्हा बँकेचे संचालक राहूल महाडिक यांनीही कोणत्याही स्थितीत निवडणुक लढविण्याचा निर्धार केला असून इस्लामपूरमधील भाजपची नेते मंडळी त्याला कितपत साथ देतात हेही महत्वाचे ठरणार आहे. शिराळा, विटा याठिकाणी मात्र, एवढी चुरस सध्या तरी दिसत नाही.

हेही वाचा… काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची गृहजिल्ह्यातील आंदोलनाकडे पाठ!

सांगली, इस्लामपूर आणि तासगाव बाजार समिती निवडणुका राजकीय दृष्ट्या अधिक संवेदनशील ठरतील. सांगलीत एका पंगतीला तर तासगावमध्ये विरोधात अशी भूमिका भाजपची असेल का? जतमध्ये खासदारांचा वरचष्मा नको म्हणून भाजपची काँग्रेसला साथ राहील का? मिरज तालुययात वर्चस्व असलेल्या वसंतदादा गटातील दोन नेत्यांचा कोणाला पाठिंबा राहील हे येत्या काही दिवसातच कळेल, मात्र, या निमित्ताने मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणार्या जिल्हा परिषद निवडणुकीची रंगीत तालीम ठरणार आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-04-2023 at 13:27 IST

संबंधित बातम्या