पुणे शहरात आज दिवसभरात नव्याने १०७३ रुग्ण आढळल्याने ७२ हजार ५७६ एवढी रुग्ण संख्या झाली आहे. तर आज दिवसभरात २७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आज अखेर १ हजार ७१० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. करोनावर उपचार घेणार्‍या ११४५ रुग्णांची तब्येत ठणठणीत असल्याने, त्या सर्वांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आज अखेर ५६ हजार २४५ रुग्ण करोना मुक्त झाले असल्याची माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागा मार्फत देण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात आज दिवसभरात नव्याने ९७८ जण करोना बाधित रुग्ण आढळले असून २० जणांचा मृत्यू झाला आहे. तर ७०५ जण आज करोनामुक्त झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील बाधित रुग्णांची एकूण संख्या ३५ हजारांच्या उंबरठ्यावर असून ३४ हजार ४४७ वर पोहचली आहे. पैकी २४ हजार ३७७ जण करोनामुक्त झाले आहेत. महानगर पालिकेच्या रुग्णालयातील सक्रिय रुग्णांची संख्या ५ हजार ९४ एवढी आहे अशी माहिती महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.