एकीकडे पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयामधील जागा रिक्त राहात असताना आणि संलग्न महाविद्यालयांची संख्या कमी कशी करायची अशी चिंता विद्यापीठासमोर असताना पुणे विद्यापीठाकडे संलग्नतेसाठी नव्या ५८ महाविद्यालयांचे प्रस्ताव आले आहेत.
पुणे विद्यापीठाशी सध्या विविध विद्याशाखांची ७४० महाविद्यालये संलग्न आहेत. एकीकडे राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियानातील तरतुदींनुसार (रूसा) एका विद्यापीठाशी दोनशे पेक्षा अधिक महाविद्यालये संलग्न असू नयेत. मात्र, पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांचा फुगलेला आकडा पुढील वर्षी अधिकच वाढण्याची शक्यता आहे. जागा रिक्त राहात असल्याची ओरड विद्यापीठाच्या क्षेत्रातील अनेक महाविद्यालयांकडून केली जात आहे. मात्र, तरीही नगर, नाशिक आणि पुणे जिल्ह्य़ातून तब्बल ५८ नव्या महाविद्यालयांनी संलग्नतेसाठी प्रस्ताव पाठवले आहेत. पुणे विद्यापीठाच्या पुढील वर्षांसाठी आखण्यात आलेल्या बृहत आराखडय़ामध्ये विविध विद्याशाखांच्या ३६ महाविद्यालयांचा समावेश करण्यात आला आहे. मात्र, विद्यापीठाकडे आलेले प्रस्ताव हे बृहत आराखडय़ापेक्षा अधिक आहेत.