दुमजली जागांचा वापर व्यावसायिक आणि रहिवाशी वापरासाठी

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पुणे मेट्रोपोलिटन रिजन डेव्हलपमेंट अ‍ॅथॉरिटी – पीएमआरडीए) वाघोली आणि नेरे दत्तवाडी येथील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली. या अनधिकृत दुमजली जागांचा वापर व्यावसायिक आणि रहिवाशी वापरासाठी केला जात होता.

महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियम १९६६ च्या कलम ५३ (१) अन्वये संबंधितांना प्रत्येकी दोन वेळा नोटीसा देण्यात आल्या होत्या. मात्र, अनधिकृत बांधकामे सुरू ठेवल्याने कारवाई करण्यात येणार होती. ही कारवाई ३ एप्रिल २०१८ रोजी प्रस्तावित करण्यात आली होती. मात्र, संबंधित बांधकामधारकाने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. पीएमआरडीएकडील कागदपत्रांच्या आधारे ६ सप्टेंबरला उच्च न्यायालयाने अनधिकृत बांधकामधारकाचा अर्ज फेटाळून लावला. त्यानंतर पीएमआरडीएकडून तत्काळ अनधिकृत बांधकामधारकावर कारवाई करण्यात आली आहे. पीएमआरडीएच्या अनधिकृत बांधकाम निष्कासन पथक क्रमांक एक आणि दोनकडून  ही कारवाई पार करण्यात आली आहे. पीएमआरडीएचे पोलीस निरीक्षक राजकुमार शेरे, उपअभियंता राजेंद्र मेदनकर, सूर्यकांत कापसे, श्रीधर फणसे यांच्यासह लोणीकंद आणि हिंजवडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक व कर्मचारी यांच्या बंदोबस्ताच्या नियंत्रणाखाली ही कारवाई पार करण्यात आली आहे, अशी माहिती पीएमआरडीएकडून देण्यात आली आहे.

अनधिकृत बांधकामांना नोटीसा

पीएमआरडीए क्षेत्रातील अनधिकृत बांधकामधारकांना महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम (महाराष्ट्र रिजनल अ‍ॅण्ड टाऊन प्लॅनिंग अ‍ॅक्ट- एमआरटीपी) कायद्याअंतर्गत नोटीसा दिलेल्या आहेत. तसेच अनधिकृत बांधकामधारकांची यादी ‘पीएमआरडीए जीओव्ही डॉट इन’ या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. शासन निर्णय तीन मे २०१८ नुसार अनधिकृत बांधकामांची नोंदणी होऊ  शकत नाही. याबाबत दुय्यम निबंधकांनाही अनधिकृत बांधकामांची यादी देण्यात आली आहे. अनधिकृत सदनिका स्वस्त दरात नागरिकांना उपलब्ध करून फसवणूक होते. त्यामुळे नागरिकांनी सदनिका व गाळे खरेदी करताना माहिती घेऊन व्यवहार करावेत, असे आवाहन पीएमआरडीएकडून करण्यात आले आहे.