दांडेकर पूल परिसरात कालव्याची भिंत कोसळल्यानंतर सिंहगड रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. महापालिका प्रशासनाने तातडीने कालव्याची भिंत दुरुस्तीचे काम हाती घेतले. या भागात असणारी दुरुस्ती यंत्रणा, मदतकार्य करण्यास अडथळे येऊ नये म्हणून सिंहगड रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. स्वारगेटहून सिंहगड रस्त्याच्या दिशेने जाणारी वाहतूक ठप्प झाली. सिंहगड रस्ता वाहतुकीसाठी बंद झाल्यानंतर मध्य भागात गुरुवारी दुपारी मोठी वाहतूककोंडी झाली. तसेच कर्वेनगर, राजाराम पूल, एरंडवणे भागातील डीपी रस्ता भागातील वाहतूक संथगतीने सुरू होती.

कालव्याच्या भिंती कोसळल्यानंतर वेगाने वाहणारे पाणी दांडेकर पूल चौकात आले. त्यामुळे सिंहगड रस्ता दुतर्फा वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. सारसबागेकडून सिंहगड रस्त्याकडे तसेच राजाराम पुलाकडून स्वारगेटकडे जाणारा रस्ता बंद करण्यात आल्यानंतर वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली. पर्वती उड्डाणपूल आणि टिळक रस्त्यावरील पूरम चौकात वाहतुकीचा ताण वाढला. टिळक रस्ता, बाजीराव रस्त्यालगतच्या छोटय़ा गल्ल्यांमध्ये कोंडी झाली. सर्वाधिक कोंडी सदाशिव पेठेतील हत्ती गणपती चौक, टिळक रस्त्यावरील महाराष्ट्र मंडळ चौक, स. प. महाविद्यालय चौक , दांडेकर पूल भागातील मांगीरबाबा चौक, राजेंद्रनगर, म्हात्रे पूल भागात झाली. दुपारनंतर वाहतूककोंडी कमी झाली. सुरुवातीला या भागातील अनेक रहिवाशांना कोंडीमागचे कारण समजले नाही. पोलिसांनी कोंडी सोडवण्यासाठी तातडीने प्रयत्न केले. दुपारनंतर य्वाहतूक सुरळीत झाली, असे वाहतूक शाखेच्या नियोजन विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील  यांनी सांगितले.

कालवा फुटल्यानंतर सिंहगड रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला. त्यामुळे पर्वती पायथा ते राजाराम पूल दरम्यानची दुतर्फा वाहतूक बंद ठेवण्यात आली. वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आल्याने दांडेकर पूल परिसरातील मांगीरबाबा चौक, राजेंद्रनगर, म्हात्रे पूल तसेच टिळक रस्ता भागात कोंडी झाली.

– तेजस्वी सातपुते, वाहतूक शाखेच्या पोलीस उपायुक्त