अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या श्री क्षेत्र पंढरपूरचे आध्यात्मिक महत्त्व तर निर्विवाद आहेच, पण धार्मिक पर्यटनाच्या नकाशावर राज्याचे नाव अधोरेखित करणाऱ्या पंढरपूरचा स्थापत्त्यशास्त्रीय अभ्यास अद्याप अधिकृतपणे झालेला नाही. ही उणीव दूर करीत पुणेकर संशोधक वैशाली लाटकर यांनी संशोधन प्रकल्प म्हणून अभ्यास केला असून लवकरच तो पूर्णत्वास जात आहे.

‘आर्किटेक्चरल स्टडिज ऑफ पंढरपूर’ असा हा संशोधन प्रकल्प आहे. वैशाली लाटकर या कॉन्झर्वेशन आर्किटेक्ट म्हणून कार्यरत असून गेल्या पाच वर्षांपासून त्या पंढरपूरचा स्थापत्त्यशास्त्रीय अभ्यास करत आहेत. या पाच वर्षांत पंढरपूरमधील शेकडो जुन्या वास्तू, मंदिरे, मठ, फड आणि घाट यांचा अभ्यास त्यांनी स्थापत्त्यशास्त्रदृष्टय़ा केलेला आहे.

लाटकर म्हणाल्या,की पंढरपूरचे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व आपल्या परिचयाचे आहे. पण या ठिकाणी यादवकाळापासूनच्या वास्तू आढळतात. कित्येक मंदिरे, मठ, वाडे, घाट आणि फड यांना अनेक वर्षांचा इतिहास आहे. तो जसा लिखित स्वरुपात आढळतो त्यापेक्षाही त्या काळाचे थेट साक्षीदार म्हणजे तत्कालीन वास्तू असतात. अनेकदा वास्तुवैभव लिखित पुराव्यांपेक्षा अधिक काही बोलू शकते. वास्तूसंवर्धकतज्ज्ञ या नात्याने काम

करताना मी प्रामुख्याने पंढरपुरातील स्वातंत्र्यपूर्व काळातील वास्तूंचा विचार केला आहे. त्यामध्ये मंदिरे, मठ, फड, जुने वाडे, घाट अशा वास्तूंचा समावेश आहे. फड ही वास्तू फक्त पंढरपूरमध्येच आढळते. पुराण वाङ्मयात येथील वास्तूंचे खूप संदर्भ आढळतात. तेथील वास्तूंमध्ये अनेक जुन्या वस्तू आणि हस्तलिखिते यांचे जतन केले आहे. हे सारे आपल्या सांस्कृतिक वैभवाचे स्रोत आहेत. मात्र ते कायम दुर्लक्षित राहिलेले आहेत. त्या वास्तूंचा अभ्यास स्थापत्त्याच्या अंगाने होणे गरजेचे आहे असे मला वाटले. त्यादृष्टीने मी हा अभ्यास सुरू केला.

विकासाच्या प्रक्रियेत आपल्या वारसा स्थळांचे कसे आणि कशा प्रकारे जतन केले पाहिजे आणि ते दीर्घकालीन उपयुक्ततेच्या दृष्टिकोनातून टिकवले गेले पाहिजे, याचा शास्त्रशुद्ध अभ्यास करण्याच्या पद्धती आहेत. विकासाच्या प्रक्रियेमध्ये कोणत्याही स्वरूपाची बाधा न आणतादेखील आपण आपले वास्तूवैभव जतन करू शकतो. केवळ डागडुजी म्हणजे संवर्धन किंवा जतन नव्हे. त्यापलीकडे जाऊन वास्तूवैभव जपता येते याची जाणीव अशा स्वरूपाच्या अभ्यासातून पुढे यावी, ही अपेक्षा असल्याचे वैशाली लाटकर यांनी सांगितले.