27 February 2021

News Flash

नवोन्मेष : नादसप्तक अकादमी

शीतल पंडित आणि अक्षय पंचवाडकर या दोघांनी मिळून नादसप्तक अकादमीची स्थापना केली.

(संग्रहित छायाचित्र)

प्रथमेश गोडबोले

शीतल पंडित आणि अक्षय पंचवाडकर या दोघांनी मिळून नादसप्तक अकादमीची स्थापना केली. त्या माध्यमातून गज़ल, भावगीत, भक्तिगीत, चित्रपटगीत, लावणी, अभंग, लोकगीत, सुगम संगीत असे संगीताचे विविध प्रकार शिकवले जातात. त्याबरोबरच पूर्वी गुरुकुल पद्धतीच्या माध्यमातून विकसित झालेले अभिजात संगीत सध्याच्या धकाधकीच्या जीवनात घरबसल्या शिकता येण्यासाठी ऑनलाइन क्लासेसही सुरू करण्यात आले आहेत.

या माध्यमातून देशातील तसेच परदेशातील विविध शहरांमधील विविध वयोगटांतील विद्यार्थ्यांना ज्ञानदान केले जाते. पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात आणि राष्ट्रपती भवनासह देशभरात एक हजारपेक्षा अधिक कार्यक्रम या दोघांनी केले आहेत. या क्षेत्रातील अनुभवाच्या जोरावर अकादमीचा प्रवास सुरू आहे.

शीतल पंडित आणि अक्षय पंचवाडकर यांनी नादसप्तक अकादमी २०१६ मध्ये स्थापन केली. शीतल संगीत विशारद आहे, तर अक्षय तबला विशारद आहे. शीतल तिसऱ्या वर्षांपासून गाणे शिकत आहे. शीतलचे आजोबा संगीत शिक्षक म्हणून कार्यरत होते, तर आई कल्पना देशपांडे सोलापुरातील ह. दे. प्रशालेत संगीत शिक्षिका म्हणून काम करत आहेत. त्यामुळे घरातूनच तिला गाण्याचा वारसा मिळाला. अक्षयचे आजोबाही संगीत शिक्षक म्हणून कार्यरत होते. प्रसिद्ध गायक गिरीश पंचवाडकर हे अक्षयचे वडील. या दोघांकडून त्याला संगीत, तबल्याचा वारसा मिळाला आहे. गिरीश पंचवाडकर यांचे मार्गदर्शन शीतल आणि अक्षय या दोघांना नेहमीच मिळत असते. शीतल लहानपणापासून गाणे शिकत असल्याने तिने अनेक कार्यक्रमांमध्ये, स्पर्धामध्ये भाग घेतला आहे. त्यामुळे नातेवाईक, मित्रमंडळी आणि परिचयाच्या लोकांकडून आम्हाला किंवा आमच्या मुलांना गाणे शिकायचे आहे, तुम्ही शिकवाल का?, अशी विचारणा व्हायची. त्यातूनच आपल्याकडील विद्या, ज्ञान वाटण्याच्या हेतूने क्लासेस सुरू करण्याची कल्पना सुचली आणि नादसप्तक अकादमी स्थापन केली.

‘पुणे सांस्कृतिक राजधानी म्हणून प्रसिद्ध आहे, त्यामुळे पुण्यात गाणे, तबला शिकवण्याचे क्लासेस मोठय़ा संख्येत आहेत. तसेच या क्षेत्रातील अनेक नामवंतांच्या संस्था आहेत. तरीदेखील पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्र आणि भारतभर कार्यक्रम केल्याचा अनुभव गाठीशी असल्याने क्लास सुरू करताना फारशी अडचण आली नाही. सुरुवातीला दहा विद्यार्थ्यांपासून क्लासची सुरुवात झाली. आतापर्यंत पाच ते ६१ अशा विविध वयोगटांतील विद्यार्थ्यांनी नादसप्तक अकादमीच्या माध्यमातून ज्ञान मिळवले आहे. सध्या ७० विद्यार्थी अकादमीच्या माध्यमातून सुगम संगीताचे ज्ञान घेत आहेत’, असे शीतल सांगतात.

प्रतिभा पाटील राष्ट्रपती असताना राष्ट्रपती भवनामध्ये प्रतिभाताईंच्या उपस्थितीत दोघांनाही आपली कला सादर करण्याची संधी मिळाली होती. शीतल गांधर्व महाविद्यालयातून संगीत विशारद झाली असून, पंडित दत्तूसिंह गहेरवार यांच्याकडून तिने मार्गदर्शन घेतले आहे. म्युझिक मस्ती गप्पा गाणी (एमटू जीटू) या सहय़ाद्री वाहिनीवरील कार्यक्रमात तिने मुलाखत व सादरीकरणही केले आहे. रोटरी क्लब, महाराष्ट्र कामगार कल्याण, अमृतलता, आंतरविद्यापीठ स्पर्धा, मोहम्मद रफी गीत स्पर्धा, महाराष्ट्र संगीतरत्न अशा विविध संस्था आणि राज्यस्तरीय स्पर्धामधून तिने पारितोषिके पटकावली आहेत. अखिल भारतीय मराठी साहित्यसंमेलन आणि अखिल भारतीय मराठी नाटय़संमेलनात कला सादर केली आहे. आकाशवाणी, दूरदर्शनवरही सादरीकरण केले आहे. तसेच ताकधिनाधिन, महाराष्ट्र संगीत रत्न, अमृतलता, महाराष्ट्र साहित्य परिषद अशा मोठय़ा व्यासपीठांवर शीतलने कला सादर केली आहे. अक्षय यांनी पं. देवेंद्र अयाचित यांच्याकडून तबलावादनाचे प्रशिक्षण घेतले आहे. आर्ट ऑफ लिव्हिंगकडून घेण्यात आलेल्या तालनिनाद या गिनिज बुक ऑफ वर्ल्डमध्ये त्यांनी सहभाग घेतला होता. शीतल आणि अक्षय यांनी ज्येष्ठ भावगीत गायक गजाननराव वाटवे, गीतकार जगदीश खेबूडकर, प्रसिद्ध संगीतकार व गायक श्रीधर फडके, ज्येष्ठ लावणी गायिका सुलोचना चव्हाण, अभिनेते राहुल सोलापूरकर, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आदींच्या उपस्थितीत कला सादर करून त्यांची वाहवा मिळवली आहे. शीतल आणि अक्षय यांनी आतापर्यंत एक हजारपेक्षा अधिक कार्यक्रम केले आहेत. पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्र, दिल्ली, चेन्नई, इंदूर, झाशी, भोपाळ, बंगळुरू, गुडगाव, लखनऊ, अहमदाबाद अशा विविध शहरांमध्ये त्यांनी सुगम संगीताचे कार्यक्रम केले आहेत. हा अनुभव नादसप्तक अकादमी सुरू केल्यानंतर त्यांना उपयोगी पडला. गिरीश पंचवाडकर यांच्या मार्गदर्शनाखाली दोघांनीही त्यांच्याबरोबर सुधीर फडके यांच्या जन्मशताब्दी वर्षांनिमित्त लिम्का बुक ऑफ रेकॉर्डसाठी नुकताच एकशेएक गीतांचा कार्यक्रम सोलापूर येथे सादर केला.

अकादमीच्या माध्यमातून सुगम संगीतातील गज़्‍ाल, भावगीत, भक्तिगीत, चित्रपटगीत, लावणी, नाटय़गीत, अभंग, लोकगीत आणि हिंदी व मराठी चित्रपटगीते असे विविध प्रकार शिकवले जातात. तसेच ज्यांना शक्य नाही, अशांसाठी घरी जाऊनही शिकवणी घेतली जाते. तर, अक्षय शास्त्रोक्त पद्धतीने तबला शिकवतात. त्याबरोबरच मंच सादरीकरणाची तयारी देखील करून घेतली जाते. अकादमीच्या विद्यार्थ्यांचे पुरेसे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर विविध व्यासपीठांवर सादरीकरणाची संधी दिली जाते. तसेच अनेक वेळा सुगम संगीतामधील प्रसिद्ध व्यक्तींकडून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, त्यांचे अनुभव ऐकण्याची संधी मिळते. याबरोबरच शीतल या सुगम संगीताचे ऑनलाइन क्लासेसही घेतात. पुणे, मुंबईसह देशातील विविध शहरे आणि सिंगापूर, अमेरिकेतूनही अनेक विद्यार्थी ऑनलाइन क्लासच्या माध्यमातून सुगम संगीत शिकत आहेत.

शनिवार पेठ आणि वारजे अशा दोन ठिकाणी अकादमीच्या शाखा आहेत. सुगम संगीताबरोबरच स्वरसंवादिनी (हार्मोनियम), कथक यांचेही क्लासेस गेल्या वर्षीपासून सुरू केले आहेत. अकादमीच्या आणखी शाखा उघडून विस्ताराचा आमचा मानस आहे. आतापर्यंत मिळालेल्या स्वानुभवावर आणि गुणवत्तेच्या जोरावर हा प्रवास यशस्वीरीत्या सुरळीत सुरू आहे, असेही शीतल सांगतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 15, 2018 2:27 am

Web Title: article about naadsaptak tabla academy
Next Stories
1 तब्बल ७ तासानंतर साडेचार वर्षांची आलिया आई वडिलांच्या कुशीत !
2 आरोपपत्र दाखल न झाल्याने दाभोलकर हत्या प्रकरणातील तीन आरोपींना जामीन मंजूर
3 माझ्या घरासह सगळ्यांनाच पाण्याचं नियोजन करावं लागणार-गिरीश बापट
Just Now!
X