बँकांच्या विशेष उपाययोजना; नागरिकांना पैसे काढण्यास अडचणी नाहीत

पुणे : केंद्र आणि राज्य सरकारने टाळेबंदी लागू करण्याआधीच करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी शहरासह जिल्ह्य़ात संचारबंदी लागू केली. गेल्या  महिनाभरापासून पुण्यात टाळेबंदी लागू आहे. मात्र, या काळात आतापर्यंत सर्व बँकांची एटीएम पूर्ण क्षमतेने कार्यान्वित आहेत. याबाबत बँकांनी विशेष उपाययोजना केल्या असल्याने नागरिकांना एटीएममधून पैसे काढण्यात अडचण येत नसल्याचे दिसून येत आहे.

राज्यातील पहिला करोनाचा रुग्ण पुण्यात सापडला. त्यानंतर जिल्हा प्रशासन, महापालिका प्रशासन यांनी एकत्रितपणे प्रतिबंधात्मक उपाय योजण्यास सुरुवात केली. करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता केंद्र आणि राज्य सरकारने टाळेबंदी घोषित करण्यापूर्वी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी शहरासह जिल्ह्य़ात जमावबंदी आणि संचारबंदी जाहीर केली. त्यानुसार दूध, भाजीपाला, किराणा माल, बँका, औषध विक्री अशा अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना बंद करण्यात आल्या.

काही दिवसांनंतर शहरासह जिल्ह्य़ातील बँकांच्या वेळांमध्येही बदल करण्यात येऊन सकाळच्या सत्रातच बँका कार्यान्वित राहतील, असा निर्णय घेण्यात आला. या सर्व काळात बँकांची एटीएम, मात्र पूर्ण क्षमतेने कार्यान्वित आहेत. एटीएममधील पैसे संपल्यानंतर किंवा संबंधित एटीएममधील पैसे संपत आल्यानंतर तातडीने यंत्रात पैशांचा भरणा बँकांकडून करण्यात येत आहे.

‘टाळेबंदी लागू केल्यानंतर बँकांच्या व्यवहारांवर मर्यादा आल्या. तसेच देशभरात सर्वत्र संचारबंदी घोषित करण्यात आल्यानंतर बँकांची एटीएम पूर्ण क्षमतेने कार्यरत ठेवण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले होते. त्यानुसार बँकांनी कार्यवाही सुरू केली. एटीएममधील पैसे संपल्यानंतर तातडीने एटीएम यंत्रात पैसे भरण्यात येत आहेत. याबाबतचे नियोजन सर्व बँकांनी केले आहे. परिणामी, आतापर्यंत तरी एटीएममध्ये पैसे नसल्याच्या तक्रारी प्राप्त झालेल्या नाहीत,’ अशी माहिती प्रमुख जिल्हा व्यवस्थापक (लीड डिस्ट्रिक्ट मॅनेजर – एलडीएम) आनंद बेडेकर यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.

अनेक बँकांनी एटीएममध्ये पैसे भरण्याचे काम त्रयस्थ यंत्रणेला दिले आहे. बहुतांशी बँकांना त्यांच्या शहरातील एटीएममधील पैसे संपल्यानंतर किंवा पैसे संपत आल्यानंतर तशा प्रकारचा संदेश प्राप्त होतो. त्यानुसार संबंधित भागात जाऊन एटीएम यंत्रात पैशांचा भरणा करण्यात येत आहे. पैसे भरणारी गाडी, तिचा वाहन क्रमांक, किती व्यक्ती पैसे भरणा करण्यासाठी जात आहेत, याबाबतची माहिती पोलीस यंत्रणेला दिली जात आहे. पोलीस यंत्रणेकडूनही बँकांना सहकार्य मिळत असून टाळेबंदी सुरू असेपर्यंत असेच सहकार्य मिळणे अपेक्षित आहे.

– आनंद बेडेकर, प्रमुख जिल्हा व्यवस्थापक, पुणे</strong>