संसदेच्या नुकत्याच पार पडलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात काँग्रेससह विरोधी पक्षांनी गोंधळ घातला. परिणामी, अधिवेशनाचे कामकाज होऊ शकले नाही. त्याचा निषेध करण्यासाठी देशभरातील भारतीय जनता पक्षाचे खासदार, आमदार, पदाधिकारी, केंद्रीय व राज्यातील मंत्री यांनी आपापल्या कार्यक्षेत्रात एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्याचे योजिले होते. मात्र, भाजपचे खडकवासला मतदारसंघाचे आमदार भीमराव तापकीर आणि मावळचे आमदार बाळा भेगडे यांनी गुरुवारी दुपारीच शासकीय बैठकीत काजू कतली, वेफर्स, सॅन्डविचचा नाश्ता केल्यामुळे त्यांच्या या उपवासाची चर्चा पुण्यात रंगली होती.
विधान भवन सभागृह येथे खरीप हंगाम २०१८ आणि जलयुक्त शिवार अभियान आढावा बैठक पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी साडेदहा वाजता आयोजित करण्यात आली होती. आमदार भीमराव तापकीर, संजय उर्फ बाळा भेगडे, सुरेश गोरे, राहुल कूल, जिल्हाधिकारी सौरभ राव, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे, कृषी विभागाचे विभागीय सहसंचालक विजयकुमार इंगळे या वेळी उपस्थित होते. बैठक सुरू असताना नेहमीप्रमाणे उपस्थित मान्यवरांसाठी नाश्ता आला. बैठकीतील नाश्त्यामध्ये सॅन्डविच, काजू कतली, वेफर्स असे खाद्यपदार्थ देण्यात आले होते. आमदार तापकीर आणि भेगडे यांच्यासमोरही नाश्त्याच्या बशा ठेवण्यात आल्या. नाश्ता आल्यानंतर दोघांनीही बशीतील पदार्थाचा आस्वाद घेतला. पक्षातर्फे गुरुवारी उपवास पाळला जात आहे, हे त्यांच्या लक्षातही आले नाही आणि नंतर त्याबाबतची चर्चा दिवसभर पुण्यात रंगली. विधानभवन येथील बैठक साडेदहा वाजता आयोजित करण्यात आली होती. मात्र, पालकमंत्री बापट स्वत: पावणे बाराच्या सुमारास बैठकस्थळी हजर झाले. त्यानंतर बैठकीला सुरूवात झाली. बैठक सुरू झाल्यानंतर आमदार तापकीर आणि भेगडे सभागृहात दाखल झाले. बैठक सुरू असतानाच उपस्थित मान्यवरांना नाश्ता देण्यात येत होता. एकीकडे पक्षाचे कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी, मंत्रिगण यांनी दिवसभर उपवास केला आणि पक्षाच्या दोन आमदारांना त्याचा विसर पडला. त्यामुळे समाजमाध्यमांवर याबाबत अनेक संदेश पाठवले जात होते.
दरम्यान नागपुरातील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना उपोषणाच्या काळातही तंबाखू, गुटखा, सिगरेटचा विरह सोसता आला नाही. उपोषणनाटय़ातील काही असे गंमतीदार प्रसंग समाजमाध्यमांतून सर्वदूर पोहोचले आणि भाजपच्या उपोषणाचे गांभीर्यच संपून गेले.
काँग्रेसच्या एकदिवसीय उपोषणाआधी छोले भटुरेवर ताव मारणाऱ्या काँग्रेस (पान नेत्यांवर भाजपने जोरदार टीका केली होती. आता भाजपच्या उपोषणात सहभागी झालेल्या आमदारांच्या सँडविच-वेफर्सवर ताव मारतानाच्या चित्रफिती समोर आल्याने भाजपची पंचाईत झाली आहे. असे काही घडू नये म्हणून, भाजपच्या नेत्यांनी अगोदरच सर्व सहभागी आमदार-पदाधिकाऱ्यांना खबरदारीच्या सूचना दिल्या होत्या. उपोषणाआधी किंवा उपोषणकाळात कुठेही काहीही खाऊ नका, कुठे चित्रीकरण केले जात नाही ना याची खात्री करून घ्या, प्रकृतीमुळे उपोषण करणे शक्य नसेल तर सहभागीच होऊ नका, असेही सांगण्यात आले होते. पण काही उत्साहींनी या साऱ्या सूचना मोडीत काढत तंबाखू खाल्ली, सिगारेट फुंकल्या, खर्राही खाल्ला आणि नेमकी हीच दृश्ये कॅमेऱ्यांमध्ये कैद होऊन समाजमाध्यमांवर सर्वदूर पोहोचली.
‘ना खाऊंगा, ना खाने दूंगा’ ही पंतप्रधान मोदी यांनी वेगळ्या संदर्भात केलेली घोषणा पचविणे भाजपमधील अनेकांना जड जात असल्याचेच या दोन-तीन तासांच्या उपोषण नाटय़ातून दिसते, अशी मार्मिक खिल्ली उडवत मुंबईतील काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजपच्या टीकेची खणखणीत परतफेड केली.
भाजपच्या उपोषणाला असे काहीसे गालबोट लागले असले, तरी राज्यात अनेक प्रमुख शहरांत उपोषणाचा जोरदार ‘उत्सव’ साजरा करण्यात आला. अनेक उपोषणस्थळी मंडप उभारण्यात आले होते. छायाचित्रणाचीही व्यवस्था करण्यात आली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विलेपार्ले येथील उपोषण कार्यक्रमात खासदार पूनम महाजन, मुंबई भाजपचे अध्यक्ष आशीष शेलार, अभिनेता खासदार परेश रावल, आमदार पराग अळवणी यांच्यासह सहभागी झाले, तर प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी औरंगाबादेत उपोषण करून विरोधकांचा निषेध नोंदविला. केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांनी राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते जलपान करून आपल्या उपोषणाची सांगता केली.
अण्णा हजारे यांची टीका
सामाजिक समस्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आजवर तब्बल १६ वेळा उपोषणे करणारे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी भाजपच्या या उपोषण आंदोलनाची जोरदार खिल्ली उडविली. ‘‘उपोषण हा राजकारणाचा भाग नाही, तर परिवर्तनाचे साधन आहे. ते वापरणाऱ्यांचे चारित्र्य, आचारविचार शुद्ध असावे लागतात, जीवन निष्कलंक असावे लागते, आणि त्यागाची जोड असावी लागते. दोन तासांचे उपोषण हा कसला आत्मक्लेश, यातून वेगळा संदेश जातो हे दुर्दैव आहे,’’ अशा शब्दांत अण्णा हजारेंनी भाजपच्या उपोषणावर कोरडे ओढले. त्यापाठोपाठ भाजपच्या उपोषणात सहभागी झालेल्यांच्या ‘खाद्यजत्रां’चे चित्रीकरणच समाजमाध्यमांवरून प्रसृत होऊ लागले आणि या आंदोलनाचे गांभीर्य संपले.
पत्ताच नाही!
मुंबई : संसदेचे कामकाज न झाल्याबद्दल गुरुवारी भाजपने देशभर पूर्वप्रसिद्धीसह उपोषण केले असले तरी मुंबईतील मिरा भाईंदरच्या पदाधिकाऱ्यांना मात्र असे काही आंदोलन पक्षाने जाहीर केले आहे, याचा पत्ताच नव्हता! भाजपच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडे उपोषणाबाबत चौकशी केली असता त्यांना याबाबत माहितीच नसल्याचे दिसून आले. भाजपचे जिल्हाध्यक्षही संपर्क क्षेत्राबाहेर होते.