फलकांच्या माध्यमातून काकडे यांची ‘खिल्ली’

प्रस्थापितांच्या विरोधातील वातावरणामुळे भारतीय जनता पक्षाला गुजरातमध्ये सत्ता मिळणार नाही, असा दावा करून सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला घरचा अहेर देणारे पुण्यातील पक्षाचे सहयोगी खासदार संजय काकडे हे भाजपला स्पष्ट बहुमत मिळाल्यामुळे तोंडघशी पडले आहेत. तसेच अंदाज चुकल्यामुळे फलकाच्या माध्यमातून काकडे यांची खिल्लीही पुणेकरांनी उडविण्यास सुरुवात केली आहे.

गुजरात विधानसभा निवडणुकीत सत्ता भारतीय जनता पक्षाला का काँग्रेसला मिळणार, याबाबत अंदाज व्यक्त केले जात असतानाच भारतीय जनता पक्षाचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी गुजरातमध्ये भाजपला सत्ता मिळणार नाही, असे भाकात केले होते. प्रस्थापितांच्या विरोधातील वातावरणामुळे भाजप गुजरात निवडणुकीत पराभूत होईल, असा दावा काकडे यांनी केला आहे. तसेच अन्य पक्षांशी हातमिळवणी करूनही भाजपला तेथे सत्ता मिळविता येणार नाही. निवडणुकीच्या कालावधीत विकासाच्या मुद्दय़ावर भर देण्यात आला नाही. या सर्व बाबी विचारात घेता निवडणूक जिंकणे अडचणीचे ठरेल,’ असे काकडे यांनी म्हटले होते.

दरम्यान, पुणे महापालिका निवडणुकीनंतर मतमोजणीच्या काही दिवस आधी त्यांनी भाजपला शहरात ९२ जागा मिळतील, असा अंदाज व्यक्त केला होता. महापालिका निवडणुकीत भाजपला ९८ जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे त्यांनी केलेल्या या भाकिताला महत्त्व प्राप्त झाले होते. सोमवारी गुजरात निवडणुकीचे निकाल पुढे येण्यास सुरुवात झाल्यानंतर भाजपला स्पष्ट बहुमत मिळणार असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे काकडे तोंडघशी पडल्याचे स्पष्ट झाले आणि त्यांची खिल्ली उडविण्यासही सुरुवात झाली.

महापालिका निवडणुकीपूर्वी व्यक्त केलेला अंदाज आणि गुजरात निवडणुकीच्या भाकितावरून शहराच्या मध्यवर्ती भागात काही फलक लावण्यात आले आहेत. कावळ्याचे चित्र असलेला एक फलक लावून ‘इव्हरी डे इज नॉट काक-डे’ असा सूचक उल्लेख असलेला फलक शहराच्या मध्यवर्ती भागात लागले आहेत.