27 September 2020

News Flash

रेल्वे वीजबचतीच्या मार्गावर

लोहमार्गालगतच्या जागेत सौरऊर्जा प्रकल्पांचे नियोजन

पुणे रेल्वे स्थानक इमारतीच्या छतावर सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे.

वर्षांकाठी सव्वाशे कोटी रुपये वाचवणार; लोहमार्गालगतच्या जागेत सौरऊर्जा प्रकल्पांचे नियोजन

पुणे : पर्यावरणपूर्वक धोरण आणि विजेच्या खर्चात बचत करण्याच्या उद्देशाने मध्य रेल्वेकडून सौरऊर्जा प्रकल्पाच्या उभारणीवर भर देण्यात येत आहे. राज्यातील विविध स्थानकांवर सध्या कार्यान्वित करण्यात आलेल्या आणि भविष्यात नियोजित करण्यात आलेल्या सौरऊर्जा प्रकल्पांच्या माध्यमातून वीज खर्चात वर्षांला तब्बल सव्वाशे कोटी रुपयांच्या बचतीचे उद्दिष्ट  ठेवण्यात आले आहे. लोहमार्गालगत मोकळ्या असलेल्या रेल्वेच्या जागेतही पुढील काळात सौरऊर्जा प्रकल्पांची उभारणी केली जाणार असल्याचे मध्य रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले.

मध्य रेल्वेच्या पाच विभागांमध्ये आणि चार कार्यशाळांमध्ये छतावरील सौरऊर्जा प्रकल्पांची योजना आखण्यात आली आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, पुणे रेल्वे स्थानक आणि वेगवेगळ्या ठिकाणच्या ईएमयू कारशेडसह इतर इमारतींच्या छतावर तसेच फलाटांच्या छतांवर एकूण ४.२ मेगावॉट क्षमतेच्या सौर यंत्रणेची उभारणी पूर्ण करण्यात आली आहे. हे प्रकल्प कार्यान्वित झाले असून, त्यातून वर्षांला ४.१ कोटी रुपयांची बचत होत आहे. इतर प्रकल्पांचे काम सुरू असून, तेही लवकरच कार्यान्वित केले जाणार आहेत. त्यातून १२ दशलक्ष युनिट विजेची निर्मिती केली जाणार असून, वार्षिक ७.३७ कोटी रुपयांच्या बचतीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

छतांवरील प्रकल्पांसह रेल्वेच्या जागांवरही व्यापक प्रमाणात सौरऊर्जा प्रकल्पांची उभारणी केली जाणार आहे. लोहमार्गालगत मोकळ्या असलेल्या जागांचाही त्यात समावेश करण्यात येणार आहे. १०९ मेगावॉट क्षमतेच्या या प्रकल्पांसाठी जागांची निश्चिती झाली आहे. लोहमार्गालगतच्या जागेसह विविध ठिकाणी रेल्वेचे मोकळे भूखंड असून, त्यांचीही सौरऊर्जा प्रकल्पासाठी निश्चिती करण्यात आली आहे. या प्रकल्पांना येत्या काळात गती देण्यात येणार आहे. या सर्व प्रकल्पांतून भविष्यात वर्षांला मध्य रेल्वेच्या वीज खर्चात सव्वाशे कोटींच्या आसपास बचत होऊ शकणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 7, 2020 12:55 am

Web Title: central railway planning of solar power projects near railway track area zws 70
Next Stories
1 प्रवाशांनी पाठ फिरविल्याने रिक्षातून पार्सल सेवेचा प्रस्ताव
2 धरणे निम्मी भरली
3 प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या रद्द, विनंती केली तरच बदलीचे निर्देश 
Just Now!
X