राज्यातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त विधानानंतर मोठ्या प्रमाणावर टीका होऊ लागल्याने भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे. “मला पवार साहेबांबाबत असं बोलायचं नव्हतं,” अशा शब्दांत त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.

पाटील म्हणाले, “मला पवार साहेबांबद्दल चुकीचं बोलायचं नव्हतं. पण तुम्ही मोदींवर, शाहांवर बोलता ते चालतं. देवेंद्र फडणवीस यांना टरबूज्या म्हणता ते चालतं, मला चंपा म्हणतात ते चालतं का?”

“मी कुठल्याही ट्रोलिंगला घाबरत नाही. सत्ताधारी पक्षातील ओबीसी नेत्यांकडून याबाबत भीती निर्माण केली जाते आहे. कालच्या ओबीसी मेळाव्यात यासंदर्भात बोलताना मला कुणाचा अनादर करायचा नव्हता. पण तुम्ही मोदींबद्दल आणि माझ्याबद्दल बोलतात ते चालतं का? मी उद्धव ठाकरेंबद्दलही बोलतो. त्याबद्दल कधी शिवसेना बोलली नाही, राजकारणात असं बोललं जातं. मी माझी बाजू मांडली, माझ्या दृष्टीने हा विषय संपला, त्यांना यावर बोलायचं असेल तर बोलू दे!” असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

“राजकारणात येण्यापूर्वी मला पवार मोठे नेते वाटायचे, मात्र राजकारणात आल्यावर कळाले ते खूप छोटे नेते आहेत. त्यांचा अभ्यास नसतो,” अशा शब्दांत चंद्रकांत पाटील यांनी काल एका मेळाव्यात शरद पवार यांच्यावर टीका केली होती.

ज्यांचे विचार एक नाहीत ते मांडीला मांडी लावून बसलेत

“ज्यांचा झेंडा एक नाही, ज्यांचे विचार एक नाहीत ते मांडीला मांडी लावून बसले आहेत, महाराष्ट्राच्या इतिहासात असं पहिल्यांदाच होत आहे. अजित पवार महाराष्ट्राच्या प्रश्नावर कधी बोलत नाहीत पण त्यांना यावर बोलायला वेळ कसा मिळाला? या सरकारमध्ये प्रचंड गोंधळ आहे, शाळांच्या बाबतीत एकमुखाने निर्णय होत नाही, मुलांच्या मनाशी हे सरकार खेळत आहे. यावर काही बोलले तर ट्रोल करण्यासाठी त्यांची पेड टीम तयार आहे. ट्रोलला आम्ही घाबरत नाही,” अशा शब्दांत त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली.

राज ठाकरेंनी भूमिका बदलल्याशिवाय युती शक्य नाही – पाटील

राज ठाकरे तळमळीने व्यक्त होतात मात्र आमचं परप्रांतीय धोरण ते स्वीकारणार नाही. त्यांनी आपली भूमिका बदलली पाहिजे. मराठी माणसाला नोकरी मिळालीच पाहिजे, हे धोरण बदलल्याशिवाय त्यांना यश मिळणार नाही. धोरण बदलल्याशिवाय त्यांच्यासोबत युती होऊ शकत नाही, असंही यावेळी पाटील यांनी स्पष्ट केलं.