केंद्रीय लोकसेवा आयोगाची (यूपीएससी) नागरी मुख्य परीक्षा आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) राज्य कर निरीक्षक, सहायक कक्ष अधिकारी या दोन पदांची मुख्य परीक्षा  नियोजित वेळापत्रकानुसार एकाच दिवशी होती, त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी एमपीएससीने दोन्ही परीक्षांच्या वेळापत्रकात बदल केला आहे.

नागरी मुख्य सेवा परीक्षेची यूपीएससीकडून आधी जाहीर करण्यात आलेली तारीख २१ जूनला सुधारित वेळापत्रक जाहीर करून बदलण्यात आली. यूपीएससी नागरी मुख्य सेवा परीक्षा आणि एमपीएससीच्या दोन्ही परीक्षा एकाच दिवशी येत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. या पाश्र्वभूमीवर, एमपीएससीने वेळापत्रकात बदल करण्याचा निर्णय घेतला.

महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा (राज्य कर निरीक्षक) येत्या २० ऑक्टोबरला, महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा (सहायक कक्ष अधिकारी) २७ ऑक्टोबरला होणार आहे. नागरी मुख्य सेवा परीक्षा आणि आयोगाच्या परीक्षा एकाच दिवशी होत असल्याने विद्यार्थ्यांची संधी वाया जाऊ नये, यासाठी वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे, असे आयोगाचे सचिव सुनील अवताडे यांनी परिपत्रकात नमूद केले आहे.