News Flash

विवाह नोंदणी संकेतस्थळावरून ओळख करून महिलेची ४२ लाखांची फसवणूक

विवाह नोंदणी संकेतस्थळावरून ओळख झालेल्या व्यक्तीने एका महिलेची ऑनलाईन व्यवहारातून ४२ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

| July 27, 2015 03:30 am

विवाह नोंदणी संकेतस्थळावरून ओळख झालेल्या व्यक्तीने एका महिलेची ऑनलाईन व्यवहारातून ४२ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या महिलेस लंडन येथून वाढदिवसाचे गिफ्ट पाठून ते घेण्यासाठी सीमा शुल्क विभागाकडे वेळोवेळी पैसे भरायला सांगून हे पैसे उकळले आहेत. याप्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत लिना प्रकाश भंडारी (वय ४२, रा. गुलटेकडी) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भंडारी यांच्या पतीचा व्यवसाय आहे. त्यांच्या पतीचे निधन झाल्यानंतर त्या तो व्यवसाय सांभाळतात. त्यांनी काही महिन्यांपूर्वी एका विवाहविषयक संकेतस्थळावर नाव नोंदविले होते. या संकेतस्थळावरून त्यांची लंडन येथील रोमन बिजूस नावाच्या व्यक्तीसोबत ओळख झाली. त्यातून त्यांच्यात बोलणे, व्हॉट्स अॅपवरून चॅटिंग सुरू झाले. भंडारी यांचा वाढदिवस असल्यामुळे रोमन नावाच्या व्यक्तीने त्यांना काही गिफ्ट पाठवत असल्याचे सांगितले. या गिफ्टमध्ये काही दागिने, आयफोन, काही महागडय़ा वस्तू घेतल्या असून त्या ताब्यात घेण्यासाठी सीमा शुल्क भरावे लागेल, असे त्या व्यक्तीने भंडारी यांना सांगितले. त्यानुसार भंडारी यांना एका तरुणीचा फोन आला. तिने त्यांना गिफ्ट आले असून त्यासाठी पैसे भरण्यास सांगितले. त्यानुसार सुरुवातीला १५ व ७२ हजार रुपये भरले. पण त्यांना एका व्यक्तीने फोन करून त्या गिफ्टमध्ये पैसे असून त्यासाठी आणखी रक्कम भरण्यास सांगितले. गिफ्ट आणि पैशाच्या आमिषाने भंडारी या महिलेने सुरुवातीला दोन लाख भरले. त्यांना सतत यासाठी पैसे भरायला लावून ४२ लाख ९२ हजार रुपयांची फसवणूक केली. त्यांना अखेर हे गिफ्ट न मिळाल्यामुळे त्यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यांनी याप्रकरणी स्वारगेट पोलिसांकडे तक्रार दिली. याप्रकरणी पोलीस निरीक्षक राम राजमाने हे अधिक तपास करीत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 27, 2015 3:30 am

Web Title: cheating of rs 42 lacs
टॅग : Cheating
Next Stories
1 मध्यावधी निवडणुकांचे ‘पिल्लू’ आम्ही सोडलेले नाही -अजित पवार
2 ‘आता प्रयत्न शल्यचिकित्सा सेवांसाठी’ – डॉ. रवींद्र कोल्हे
3 राज्यातील शाळांमध्ये ‘बायोमेट्रिक’ हजेरी होणार
Just Now!
X